माझिया मना-लेख क्र.- ९
सकाळ होते आणि दिवस सुरू होतो. उठल्या उठल्या हातात फोन येतो आणि त्याच क्षणापासून मन धावायला लागतं. आज हे काम करायचं आहे, त्याला फोन करायचा आहे, मुलांचं बघायचं आहे, ऑफिसची तयारी करायची आहे, घर सांभाळायचं आहे आणि या सगळ्याच्या मध्ये कुठेतरी मनात आणखी एक यादी सुरू असते. “तो किती पुढे गेला… ती किती प्रसिद्ध झाली… त्याचं किती छान चाललंय… मी अजून इथेच का?”
आपण शरीराने एका ठिकाणी असतो, पण मन मात्र भूतकाळात, भविष्यकाळात आणि इतरांच्या आयुष्यात सतत फिरत असतं. ते आता सोशल मीडियामुळे खूप सोप्प झालं आहे. कोण कुठे फिरायला गेलं? कोणी काय नवीन वस्तू घेतल्या? कोणी आपल्या कपाटातल्या १०० साड्या दाखवते, तर कोणी नवीन महागडी गाडी घेऊन 'माय न्यू फॅमिली मेंबर' म्हणत व्हिडिओ काढतात. आपल्याला अशा वेळी खरं तर काय करावं हे कळत नाही. असं वाटतं आपलंच आयुष्य सगळ्यात बोर आहे. सगळ्यांच आयुष्य किती छान चाललं आहे, त्यांना कोणत्याही तक्रारी नाहीत. त्यांच्यासारखं आयुष्य जगावंसं वाटतं. त्यावर एक छान पर्याय तुम्हाला ह्या लेखाच्या माध्यमातून देणार आहोत.
कधीतरी एक क्षण शांत बसा आणि स्वतःच्या मनाला हळूच म्हणा, “माझ्या मना… थोडं थांबशील का?” बाकीचे सगळे विचार सोडून दे. तू कुठून सुरुवात केली होतीस आणि आता तू कुठे आहेस, ह्या काळात काय बदल झाला? तुझ्याकडे कोणती गोष्ट नव्हती जी आज तुझ्याकडे आहे. तुझ्या वयाबरोबरच तुझा अनुभव पण वाढत चालला आहे. तू अजून अजून जास्त प्रगल्भ होत आहेस. हा सगळा प्रवास तू खूप छान पार केला आहेस. कालपेक्षा तुझा आज किती छान आहे आणि आजपेक्षा तुझा उद्या अजून छान असणार आहे, यात शंका नाही. असं म्हणत स्वतःलाच स्वतःच्या पाठीवर थाप देऊन शाबासकी द्या.
आपण इतके इतरांशी तुलना करण्यात व्यस्त झालो आहोत की स्वतःचा प्रवासच विसरून गेलो आहोत. हा एक छोटासा प्रश्न कधी कधी आपल्याला “मला काहीच येत नाहीये” या भावनेपर्यंत घेऊन जातो आणि मग सुरू होतो self-doubt. आपण केलेल्या चांगल्या गोष्टीही दिसेनाशा होतात. आपला प्रवास छोटा वाटू लागतो. आपली मेहनत कमी वाटते. दुसऱ्यांच्या यशाच्या प्रकाशात आपलं स्वतःचं आयुष्य फिकं वाटू लागतं. पण तेव्हा तुमच्या मनाला खरं तर थोडी विश्रांती घ्यायची गरज आहे. इथे आपल्याला जाणवतं की समोरच्याचा प्रवास वेगळा आहे, तुमच्याकडे जे आज आहे ते त्याच्याकडे नसेल.
तो आज काय करतोय ते पाहून “आज मला जमत नाही” हे मान्य करणंही योग्य असतं. कारण थांबणं म्हणजे मागे जाणं नाही. कधी कधी थांबणं म्हणजे स्वतःची नव्याने ओळख करून घेणं असतं.
आता हा सराव करूया. सतत इतरांच्या आयुष्यातला कंटेंट कंज्युम न करता दिवसभरात फक्त दहा मिनिटं शांत बसून स्वतःला विचारून बघा, “आज माझं मन कशामुळे थकलं आहे?” “मी कोणाशी तुलना करतोय?” “मला खरंच काय हवं आहे?” कदाचित सगळी उत्तरं लगेच मिळणार नाहीत.
पण प्रश्न विचारायला सुरुवात झाली की मनाची धावपळ थोडी कमी होते. मन एका जागी शांत राहतं. श्वासाकडे लक्ष दिलं जातं. एका लयीत श्वास घेतला की मन पण शांत होताना जाणवतं आणि स्वतःलाच बरं वाटायला लागतं.
आयुष्य खूप सुंदर आहे. ते त्याच पद्धतीने जगलं तर सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होतात, हे अनुभवून बघूया.
—डॉ. मीताली मोरे
औद्योगिक मानसशास्त्रज्ञ आणि करिअर मार्गदर्शक
अमृत मानस मित्र समिती सदस्य.
माझिया मना- लेख-क्र.१ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
'आनंद' हा योगायोग आहे की सवय?
https://amrutmaharashtra.org/news.php?id=1953
माझिया मना- लेख-क्र.२ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती घडवूया ..
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2036
माझिया मना- लेख-क्र.३ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
मानसिक आरोग्याचे वाढते संकट : भारतीय गुरुकुल परंपरा, प्राणायाम आणि ध्यान हा शाश्वत मार्ग
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2163
माझिया मना- लेख.क्र.४ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
कृतज्ञता : आनंदी राहण्याचा उत्तम उपाय
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2298
माझिया मना- लेख.क्र.५ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
भारतीय कुटुंब... माणूस घडवण्याचा प्रवास!
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2460
माझिया मना- लेख क्रमांक-६
"आमचं मस्त चाललंय!"
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2635
माझिया मना- लेख क्रमांक-७
आपल्या आयुष्यातील "ह्युमन लायब्ररी"
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2782
माझिया मना- लेख क्रमांक-८
स्वतःचा स्वतःशी संवाद (Self Talk)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment