'आनंद' हा योगायोग आहे की सवय?

आनंद शोधू नका, तुम्हीच आनंद निर्माण करा- माझिया मना- लेख-१

'आनंद' हा योगायोग आहे की सवय? मुख्य फोटो
मुख्य फोटो

सध्याच्या जगात सर्वात मोठी समस्या असेल तर ती मानसिक समस्या. कोणताही वयोगट घ्या, ती व्यक्ती कोणत्या ना कोणत्या मानसिक ताणाने ग्रासलेली आहे. भारतातही ही समस्या हळूहळू गंभीर होत चालली आहे. विद्यार्थी, नोकरदार, अधिकारी वर्ग, पोलीस कर्मचारी अशा सर्वच स्तरातील व्यक्तींना प्रचंड मानसिक ताण आहे, ज्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढतच आहे. ही परिस्थिती दिवसेंदिवस वाईटच होत आहे, पण नुसती समस्या आहे असे म्हणून उपयोग नाही, त्यावर उपाय शोधणेही आपल्याच हातात आहे. समस्येच्या पलीकडे जाऊन त्या समस्येचे समाधान शोधणे हेच तर अमृत सारख्या संस्थेचे ध्येय आहे. जगात अशी कोणतीही समस्या नाही, ज्यावर उपाय नाही. याच सकारात्मकतेने अमृत महाराष्ट्रवर आता मानसिक आरोग्य विषयावर एक लेखमालिका सुरू करत आहोत - ‘माझिया मना’. यात काही सकारात्मक उपाय तर आहेतच, पण तुमचे आयुष्य तणावविरहित कसे ठेवावे,याबद्दलची माहितीही आहे. थोडक्यात तुमच्या तणावग्रस्त मनावर ही ‘शब्दफुंकर’. या लेखमालिकेतील हा पहिला लेख-


आपण अनेकदा म्हणतो, "हे मिळालं की मी आनंदी होईन...", "ती समस्या सुटली की मी खुश होईन..." किंवा "सगळं व्यवस्थित झालं की आयुष्य छान वाटेल." पण खरंच आनंद असा कुठेतरी पुढे आपली वाट पाहत उभा असतो का? खरं तर आनंद हा योगायोग नसतो, तर आनंदी राहणं ही एक सवय असते. आयुष्यात प्रत्येकालाच काही ना काही अडचणी असतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाची काळजी असते, तर तरुणांना करिअरची धडपड, पालकांना मुलांच्या भविष्याची काळजी असते आणि ज्येष्ठांना आरोग्याच्या समस्या. पण या सगळ्यात आपण काही लोक बघतो जे नेहमी आनंदी आणि समाधानी असतात. ते कसे? कारण ते परिस्थिती बदलण्याची वाट पाहत नाहीत; ते परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतात आणि तेच सगळ्यात सोपं आहे. आनंदी माणूस फक्त स्वतःसाठीच नाही, तर आपल्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि समाजासाठीही एक सकारात्मक ऊर्जा असतो. घरातील एक हसतमुख व्यक्ती संपूर्ण घराचे वातावरण बदलू शकते. आनंदी मनामुळे तणाव कमी होतो, आरोग्य सुधारते आणि नाती अधिक घट्ट होतात. एका संतवचनात म्हटले आहे, "जैसी दृष्टी तैसी सृष्टी." आपण जगाकडे ज्या नजरेने पाहतो, तसंच जग आपल्याला दिसू लागतं. दररोज आपल्या आयुष्यात काही ना काही चांगल्या गोष्टी घडत असतात, पण आपण अनेकदा फक्त समस्या आणि कमतरतांकडे लक्ष देतो. एखाद्या मित्राचा फोन, मुलांचे हसू, कुटुंबासोबतचा वेळ, मिळालेली एक संधी किंवा दिवसाचा समाधानी शेवट हे सगळे आनंदाचे छोटे-छोटे क्षण असतात. आनंदी लोक याच क्षणांकडे लक्ष केंद्रित करत असतात. आनंदी राहणं ही एक सवय आहे. ती सवय एकदा लागली की आयुष्यात खूप समाधान, सुख आणि शांती अनुभवता येईल. आजपासून एक छोटा प्रयोग करून पाहूया.

✔ सकाळी उठल्यावर तुम्हाला मिळालेल्या तीन गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करूया.

✔ दिवसातून एकदा कोणाचे तरी मनापासून कौतुक करूया.

✔ स्वतःची तुलना इतरांशी करण्याऐवजी कालच्या स्वतःशीच करूया.

✔ एखाद्याला मदत करण्याची संधी शोधूया.

✔ रात्री झोपण्यापूर्वी दिवसातील एक चांगली गोष्ट आठवूया.

हे साधे उपाय वाटतात, पण त्यातून मनाची विचार करण्याची दिशा बदलते आणि हळूहळू आनंदाची आणि आनंदी राहण्याची सवय लागते. लक्षात ठेवा, आनंद हा मोठ्या यशामध्ये किंवा भविष्यातील एखाद्या घटनेत तर असतोच, पण तो आपल्या दैनंदिन विचारांमध्ये, कृतींमध्ये आणि दृष्टिकोनामध्येही असतो. परिस्थिती नेहमी आपल्या हातात नसते, पण आनंदी राहण्याचा निर्णय मात्र आपल्याच हातात असतो. आज स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा— "आज आनंदी राहण्यासाठी मी काय करू शकतो?" कदाचित त्या एका छोट्या उत्तरातूनच तुमच्या आनंदी आयुष्याची सुरुवात होईल. "आनंद शोधू नका, तुम्हीच आनंद निर्माण करा." कारण आनंद हा योगायोग नसून, जगण्याची एक सुंदर सवय आहे. तुम्हालाही आनंदी राहायला आवडेल ना? तर तुमच्या साहाय्यासाठी लवकरच येत आहे अमृत या संस्थेचा नाविन्यपूर्ण उपक्रम - अमृत मानस मित्र.

-डॉ. मीताली मोरे (औद्योगिक मानसशास्त्रज्ञ आणि करिअर मार्गदर्शक) (अमृत मानस मित्र समिती सदस्य)

- क्रमशः

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 19-06-2026 News publication date | Time: 01:00 PM News publication time | Views: 315 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 19-06-2026 News publication date | Time: 01:00 PM News publication time | Views: 315 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement