आपल्या आयुष्यातील "ह्युमन लायब्ररी"
" शाळेतले गुरू आपल्याला शिस्त आणि नियम वापरून वेगळेवेगळ्या विषयांची ओळख करून देतात, कॉलेज मधले शिक्षक हे विविध विषयांचा वापर नोकरी किंवा व्यवसायात कसा करायचा? हे शिकवतात, तसंच आयुष्यात कोणतीही गोष्टी का? आणि कशी? शिकायची हे शिकवतात, ह्या मुळे आपला अभ्यास तर पक्का होतोच पण माणूस म्हणून आपण हळूहळू घडत असतो. त्यानंतरही आयुष्यात भेटणारा प्रत्येक माणूस आपल्याला काही ना काही शिकवून जातो. ह्यालाच मी ‘ह्युमन लायब्ररी’ असे म्हटले आहे.
गुरुपौर्णिमा आली की आपण आपल्या शिक्षकांना, आई-वडिलांना, संतांना आणि ज्ञान देणाऱ्या व्यक्तींना वंदन करतो. पण कधी विचार केला आहे का, की आपल्या आयुष्यात असे कितीतरी गुरु असतात ज्यांना आपण कधी "गुरु" म्हणून ओळखतच नाही? पण त्यांच्याकडून खूप काही शिकत असतो.
माझ्या मते, आपलं आयुष्य ही एक "ह्युमन लायब्ररी" आहे. या लायब्ररीत पुस्तकं नाहीत, तर माणसं आहेत. प्रत्येक माणूस म्हणजे एक जिवंत पुस्तक. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा आणि त्या प्रत्येक अनुभवातून आपल्याला काही न काही शिकायला मिळतं आणि वापरूनही बघता येतं.
आपल्या अवती भवती अशा कोण व्यक्ती आहेत? ज्यांच्याकडून आपण शिकत असतो.
शेतकऱ्यांकडून आपण संयम शिकतो. बी पेरल्यावर दुसऱ्याच दिवशी पीक मिळत नाही. योग्य वेळ, योग्य मेहनत आणि निसर्गावर विश्वास ठेवावा लागतो. आयुष्यातील अनेक स्वप्नंही अशीच असतात. उद्योजक आपल्याला सांगतो की अपयश म्हणजे शेवट नसतो. व्यवसायात अनेक वेळा तोटा होतो, पण प्रत्येक अपयश पुढच्या यशाची तयारी करत असतं. कामगार आपल्याला कष्टाची प्रतिष्ठा शिकवतो. कोणतंही काम लहान नसतं. प्रामाणिकपणे केलेलं प्रत्येक काम मोठं असतं.
एक गृहिणी आपल्याला व्यवस्थापन शिकवते. मर्यादित साधनांमध्ये घर चालवणं, प्रत्येकाची काळजी घेणं, वेळेचं नियोजन करणं आणि स्वतःपेक्षा इतरांना प्राधान्य देणं हे ती करत असते. घरातले स्वयंपाक घर ही व्यवस्थापनाची सर्वोत्तम शाळा आहे.
ज्येष्ठ नागरिक आपल्याला अनुभवाचं महत्त्व शिकवतात. त्यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिलेले असतात. त्यांच्या एका वाक्यात अनेक वर्षांचं शहाणपण दडलंले असतं. मित्र आपल्याला विश्वास, साथ आणि नात्यांची किंमत शिकवतात. तर कधी कधी मतभेदही आपल्याला समजूतदार बनवतात.
आणि हो... आपले विरोधक किंवा टीका करणारे लोकही आपले गुरु असतात. ते आपल्या चुका दाखवतात. कधी त्यांची टीका योग्य असते, कधी अयोग्य. पण दोन्ही वेळा आपण काहीतरी शिकतो. योग्य टीकेतून सुधारतो आणि अयोग्य टीकेतून मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत होतो. कधी कधी अपयशही आपला गुरु बनतं. यश आपल्याला आनंद देतं, पण अपयश आपल्याला विचार करायला लावतं. ते आपल्याला नम्र बनवतं, पुन्हा उभं राहायला शिकवतं आणि स्वतःकडे नव्या नजरेने पाहायला शिकवतं.
प्रश्न एवढाच आहे की आपण ऐकतो का? आपण निरीक्षण करतो का? आपण शिकण्याची तयारी ठेवतो का?
या गुरुपौर्णिमेला आपण फक्त आपल्या शिक्षकांनाच नव्हे, तर आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून धन्यवाद देऊया. कारण त्यांनी कदाचित आपल्याला पुस्तकातून शिकवलं नसेल, पण त्यांनी त्यांच्या जगण्यातून आपल्याला जगण्याची दिशा दिली आहे. चला, आज एक नवा संकल्प करूया. "प्रत्येक व्यक्तीला भेटताना मी स्वतःला एकच प्रश्न विचारेन या व्यक्तीकडून मी आज काय शिकू शकतो?"कदाचित याच एका प्रश्नामुळे आपलं आयुष्य अधिक समृद्ध, अधिक नम्र आणि अधिक अर्थपूर्ण बनेल.
—डॉ. मीताली मोरे
औद्योगिक मानसशास्त्रज्ञ आणि करिअर मार्गदर्शक
अमृत मानस मित्र समिती सदस्य.
माझिया मना- लेख-क्र.१ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
'आनंद' हा योगायोग आहे की सवय?
https://amrutmaharashtra.org/news.php?id=1953
माझिया मना- लेख-क्र.२ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती घडवूया ..
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2036
माझिया मना- लेख-क्र.३ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
मानसिक आरोग्याचे वाढते संकट : भारतीय गुरुकुल परंपरा, प्राणायाम आणि ध्यान हा शाश्वत मार्ग
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2163
माझिया मना- लेख.क्र.४ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
कृतज्ञता : आनंदी राहण्याचा उत्तम उपाय
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2298
माझिया मना- लेख.क्र.५ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
भारतीय कुटुंब... माणूस घडवण्याचा प्रवास!
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2460
माझिया मना- लेख क्रमांक-६
"आमचं मस्त चाललंय!"
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment