भारतीय कुटुंब... माणूस घडवण्याचा प्रवास!

माझिया मना- लेख क्रमांक-५

भारतीय कुटुंब... माणूस घडवण्याचा प्रवास! मुख्य फोटो
भारतीय कुटुंब... माणूस घडवण्याचा प्रवास! अतिरिक्त फोटो

आजकाल आपण ऐकतो की माणसापेक्षा पैशांचे महत्त्व वाढत चालले आहे. आपण करिअर, पैसा, यश, स्पर्धा याबद्दल खूप भरभरून बोलतो. पण या सगळ्याच्या पायाशी उभं असणारं "कुटुंब" मात्र अनेकदा दुर्लक्षित राहतं. खरं तर जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा त्याच्याकडे पदवी, पैसा किंवा अनुभव नसतो; पण आपल्याकडे एक कुटुंब असतं. कुटुंबातल्या प्रत्येकाशी आपली ओळख व्हायला लागते आणि हाच कुटुंब व्यवस्थेचा त्याचा पहिला टप्पा असतो.

भारतीय कुटुंब व्यवस्थेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे "आपलेपणा". इथे प्रत्येकाला कुणीतरी ऐकून घेणारं असतं. दिवसभर कितीही ताण आला, कितीही चुका झाल्या, कितीही अपयश आलं तरी घरी परतल्यावर दोन शब्द बोलायला, मन मोकळं करायला माणसं असतात. आज मानसशास्त्र सांगतं की, मनातल्या भावना दाबून ठेवण्यापेक्षा त्या व्यक्त करणं मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठी थेरपिस्ट कडे जाऊन पैसे भरून सेशन करावं लागतं. ही थेरपी पूर्वी कुटुंबातून मिळत असे. आजही एकत्र कुटुंब नसले तरी कुटुंबातल्या काही नियमांमुळे घरातला रोजचा चहाचा कप, जेवणाच्या टेबलवरच्या गप्पा किंवा आई-वडिलांशी, भावंडांशी केलेला साधा संवादही अनेकदा मोठ्या समुपदेशनाचं काम करतो.

आपण कुटुंबाचा एक भाग आहोत, पण त्याच वेळी कुटुंबही आपल्यामुळे घडत असतं. मुलं आई-वडिलांकडून बोलणं, वागणं, संकटांना सामोरं जाणं, इतरांचा आदर करणं हे शिकतात. त्यामुळे मुलांना चांगले संस्कार द्यायचे असतील, तर त्यांच्यासमोर चांगलं वागणं हीच सर्वात प्रभावी पद्धत आहे.

भारतीय कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी मोठमोठे त्याग करण्याची गरज नाही. काही छोट्या सवयी पुरेशा आहेत. दिवसातून किमान एक वेळ सर्वांनी एकत्र जेवणं, मोबाईल बाजूला ठेवून दहा मिनिटं मनापासून संवाद साधणं, प्रत्येकाच्या मताला किंमत देणं, "धन्यवाद", "माफ करा" आणि "तुझा अभिमान वाटतो" हे शब्द घरात सहज वापरणं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांसाठी वेळ काढणं. नाती वेळेने जपली जातात; आणि त्यातून आत्मविश्वासही जपला जातो.

कुटुंब म्हणजे फक्त एकाच छताखाली राहणारी माणसं नव्हेत. कुटुंब म्हणजे एकमेकांच्या आनंदात मनापासून आनंदी होणारी आणि संकटात खंबीरपणे उभी राहणारी माणसं. मतभेद असू शकतात, पण मनभेद होऊ नयेत. कारण जिथे संवाद संपतो, तिथून दुरावा सुरू होतो आणि तिथून कुटुंब हळूहळू वेगळे होऊ लागते.

आपण आज सुशिक्षित झालो आहोत, मोठ्या कंपन्यांमध्ये काम करत आहोत, व्यवसाय करत आहोत, आपल्या छोट्याशा कुटुंबाची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी झटत आहोत, समाज बदलण्याची स्वप्नं पाहतो. पण समाजाची सुरुवात घरापासूनच होते. प्रत्येकाने आपल्या कुटुंबात थोडा अधिक संवाद, थोडी अधिक कृतज्ञता आणि थोडं अधिक प्रेम जपलं, तर भारतीय कुटुंब व्यवस्था केवळ टिकणार नाही, तर पुढच्या पिढीसाठीही प्रेरणादायी ठरेल. ह्या सरावासाठी दोन छोट्या गोष्टी करायला सुरुवात करावी. पहिली गोष्ट म्हणजे दिवसातून एक वेळ एकत्र जेवायला बसा आणि दिवसभरात काय घडलं हे सांगा. दुसरी गोष्ट म्हणजे आपला मोबाईल घरात गेल्यावर एका बॉक्समध्ये ठेवा आणि फोन आल्यावर किंवा मेसेज करतानाच तिथे जाऊन मेसेज करा आणि पुन्हा तिथेच ठेवा. मोठ्या बदलाची सुरुवात ही छोट्या छोट्या कृतीतून नक्की होऊ शकते. हे करताना काही अडचणी आल्यास आम्हाला नक्की कळवा.

शेवटी एकच, घर हे फक्त राहण्याचं ठिकाण नसतं; ते माणूस घडवण्याचं विद्यापीठ असतं. आणि या विद्यापीठात आपण सगळेच विद्यार्थीही आहोत आणि शिक्षकही.

—डॉ. मीताली मोरे

औद्योगिक मानसशास्त्रज्ञ आणि करिअर मार्गदर्शक

अमृत मानस मित्र समिती सदस्य.

माझिया मना- लेख-क्र.१ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

'आनंद' हा योगायोग आहे की सवय?

https://amrutmaharashtra.org/news.php?id=1953

माझिया मना- लेख-क्र.२ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती घडवूया ..

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2036

माझिया मना- लेख-क्र.३ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

मानसिक आरोग्याचे वाढते संकट : भारतीय गुरुकुल परंपरा, प्राणायाम आणि ध्यान हा शाश्वत मार्ग

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2163

माझिया मना- लेख.क्र.४ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

कृतज्ञता : आनंदी राहण्याचा उत्तम उपाय

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2298

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 17-07-2026 News publication date | Time: 02:08 PM News publication time | Views: 64 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 17-07-2026 News publication date | Time: 02:08 PM News publication time | Views: 64 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 2 Comments

P
Preeti khade
17-07-2026 07:03 PM

50

S
Sharad Godbole
17-07-2026 04:54 PM

छान लेख.अमृत महाराष्ट्र चे अभिनंदन. खरोखरच आपल्या कुटुंबासाठी व सर्व समाजा साठी उद्बोधक लेख

Write a Comment
0 / 50 words
Advertisement