स्वतःचा स्वतःशी संवाद (Self Talk)

माझिया मना- लेख क्रमांक-८

स्वतःचा स्वतःशी संवाद (Self Talk) मुख्य फोटो
मुख्य फोटो

आपण दिवसभर खूप जणांशी बोलत असतो - घरच्यांशी, मित्रांशी, सहकाऱ्यांशी, ग्राहकांशी आणि

कधी फोनवर, कधी प्रत्यक्ष, तर कधी सोशल मीडियावर. पण या सगळ्यात एक व्यक्ती अशी असते, जिच्याशी आपण सर्वाधिक बोलत असतो आणि तरीही त्या संवादाकडे आपलं लक्ष नसतं. ती व्यक्ती म्हणजे "आपण स्वतः!"

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या मनात सतत विचारांची आणि संवादाची एक अखंड मालिका सुरू असते.

"माझ्याकडून हे होणार नाही." "मी नेहमीच चुका करते." "लोक माझ्यापेक्षा किती पुढे गेले आहेत." "मी पुरेशी चांगली नाही."

हा संवाद जर नकारात्मक असेल, तर आपला आत्मविश्वास हळूहळू कमी होत जातो. आणि गंमत म्हणजे हा संवाद इतर कोणी करत नाही, तो आपणच स्वतःशी करत असतो.

एका विद्यार्थ्याचे उदाहरण घ्या. त्याला परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आणि इथे त्याने जर मनाशी ठरवले, "मी हुशारच नाही," तर पुढच्या परीक्षेपूर्वीच त्याचा आत्मविश्वास संपतो. पण त्याच प्रसंगाकडे तो, "यावेळी कमी गुण आले, पण माझी तयारी अपुरी होती. पुढच्या वेळी वेगळ्या पद्धतीने अभ्यास करेन," असे पाहू लागला, तर ह्याच अपयशातून तो शिकत जातो.

एक गृहिणी दिवसभर घरातील प्रत्येकाची काळजी घेते. पण एखादी छोटी चूक झाली की लगेच स्वतःलाच दोष देते, "माझ्यामुळेच सगळं बिघडलं." त्याऐवजी जर ती स्वतःला म्हणाली, "चुका होतात, पण माझा हेतू नेहमी चांगलाच असतो," तर तिच्या मनावरील ओझं कितीतरी हलकं होईल. खरं तर, हे विचार इतरांच्या मनात येत नाहीत, पण हिच्याच मनातले विचार तिला पुन्हा पुन्हा त्रास देत असतात.

ऑफिसमध्येही हेच घडतं. बॉसने कामात सुधारणा सांगितली की अनेक जण मनाशी निष्कर्ष काढतात की "मी सक्षम नाही." प्रत्यक्षात ती फक्त सुधारण्याची संधी असते. पण आपल्या मनातील आवाज त्याला अपयशाचं शिक्कामोर्तब करतो.

तुमच्या मनावर आणि विचारांवर तुम्ही ताबा मिळवलात की बाहेरच्या गोष्टी सोप्या आणि तुमच्या मनासारख्या घडताना दिसतात. आपलं मन म्हणजे सुपीक जमीन आहे. आपण त्यात कोणती बी पेरतो, त्यावर आपल्या आयुष्याची फळं ठरतात. रोज स्वतःला कमी लेखण्याची बी पेरली आणि त्याचाच विचार करत राहिलात, तर न्यूनगंड येतो; पण जर विश्वासाची बी पेरली, तर आत्मविश्वास फुलतो आणि तो तुमच्या कामाच्या प्रगतीतून दिसूनही येतो.

म्हणून स्वतःशी बोलताना काही गोष्टी मुद्दाम लक्षात ठेवूया:

"मी अजून शिकते आहे."

"आत्ता चूक झाली असेल, पण मी ती लवकरच सुधारेन."

"आजचा दिवस कालपेक्षा थोडा चांगला करायचा."

"मी माझ्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करते आहे."

ही फक्त सकारात्मक वाक्ये नाहीत; ही स्वतःला दिलेली एक मानसिक साथ आहे. लक्षात ठेवा, जगातील प्रत्येक नात्याला संवादाची गरज असते. मग स्वतःशी असलेल्या नात्याला त्याची गरज का असू नये? आज दिवसभरात फक्त पाच मिनिटे स्वतःसाठी काढा. मोबाईल बाजूला ठेवा. शांत बसा आणि स्वतःला विचारा:

"आज मी स्वतःशी कसं बोलले? माझ्या मनात आज कसे विचार आले? मी केलेल्या चुकीच्या कृतीतून मी काय शिकले? मी आज कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या?" हे विचारून स्वतःच्या पाठीवर एक थाप मारून स्वतःच कौतुकही करू शकता.

ह्या छोट्या 'सेल्फ टॉक' मुळे तुमची स्वतःशी एक घट्ट मैत्री होईल आणि तुम्हाला कधीही एकटं वाटणार नाही. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आवाज हा बाहेरचा नसतो, तो आपल्या मनातलाच आवाज असतो.


—डॉ. मीताली मोरे

औद्योगिक मानसशास्त्रज्ञ आणि करिअर मार्गदर्शक

अमृत मानस मित्र समिती सदस्य.


माझिया मना- लेख-क्र.१ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

'आनंद' हा योगायोग आहे की सवय?

https://amrutmaharashtra.org/news.php?id=1953

माझिया मना- लेख-क्र.२ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती घडवूया ..

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2036

माझिया मना- लेख-क्र.३ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

मानसिक आरोग्याचे वाढते संकट : भारतीय गुरुकुल परंपरा, प्राणायाम आणि ध्यान हा शाश्वत मार्ग

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2163

माझिया मना- लेख.क्र.४ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

कृतज्ञता : आनंदी राहण्याचा उत्तम उपाय

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2298

माझिया मना- लेख.क्र.५ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

भारतीय कुटुंब... माणूस घडवण्याचा प्रवास!

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2460

माझिया मना- लेख क्रमांक-६

"आमचं मस्त चाललंय!"

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2635

माझिया मना- लेख क्रमांक-७

आपल्या आयुष्यातील "ह्युमन लायब्ररी"

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2782

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 07-08-2026 News publication date | Time: 11:24 AM News publication time | Views: 22 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 07-08-2026 News publication date | Time: 11:24 AM News publication time | Views: 22 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement