डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-६
जरा आठवून पाहुयात... आपण हाताने पूर्ण पानभर शेवटचं कधी लिहिलं होतं? एखादी चिठ्ठी, पत्र, डायरीचं पान किंवा अगदी किराण्याची यादी? कदाचित आठवायलाही थोडा वेळ लागेल. एक काळ होता, जेव्हा शाळेच्या वह्या, वैयक्तिक डायऱ्या, पत्रं, शुभेच्छापत्रं आणि खरेदीच्या याद्या आपल्या हस्ताक्षराने भरलेल्या असायच्या. एखाद्या पदार्थाची रेसिपी आवडली की ती वहीत उतरवली जायची. पुस्तकातलं एखादं सुंदर वाक्य, आवडत गाणं कविता, सुविचार किंवा एखाद्या व्याख्यानातील महत्त्वाच्या टिपणी आवर्जून लिहून ठेवल्या जायच्या. दूरध्वनी क्रमांक, पत्ते, खर्चाचा हिशेब, दिवसाचं नियोजन सगळं काही कागदावर उमटायचं. प्रत्येकाच्या हस्ताक्षरात त्याचं वेगळेपण आणि व्यक्तिमत्त्व दिसायचं.
आज चित्र पूर्णपणे बदललं आहे. रेसिपी यूट्यूबवर Save होते, लेख Bookmark होतात, टिपणं Notes अॅपमध्ये जातात, शुभेच्छा व्हॉट्सअॅपवर पाठवल्या जातात आणि खरेदीची यादीही मोबाईलमध्येच तयार होते. दिवसातून शेकडो शब्द आपण लिहितो,पण त्यातील बहुतेक एकही शब्द हाताने लिहिलेला नसतो.
आणि मग अचानक एखादा अर्ज भरताना, शुभेच्छापत्र लिहिताना किंवा एखादी नोंद हाताने करायची वेळ आली, की वेगळीच अडचण जाणवते.ज्ञ', 'क्ष', 'श्र' किंवा 'त्त'—नेमकं कसं लिहायचं, याचा क्षणभर विचार करावा लागतो.accommodate', 'receive', 'separate', 'necessary' अशा शब्दांचं स्पेलिंग आठवण्यासाठी आपण नकळत मोबाईलकडे पाहतो.कारण आतापर्यंत प्रत्येक वेळी मोबाईलने Auto Correct केलं असतं किंवा Predictive Text ने पुढचा शब्द सुचवला असता. नकळत लिहिण्याची जबाबदारी आपण आपल्या बोटांकडून कीबोर्डकडे आणि मेंदूकडून मोबाईलकडे सोपवली आहे.त्यामुळे एक प्रश्न निर्माण होतो—डिजिटल तंत्रज्ञानामुळे आपण लिहिणंच विसरत चाललो आहोत का?
पण हस्ताक्षराचा प्रश्न केवळ अक्षरं विसरण्यापुरता मर्यादित नाही. हाताने लिहिणं म्हणजे फक्त कागदावर शब्द उमटवणं नव्हे. लिहिताना मेंदू विचार करतो, डोळे अक्षरांवर लक्ष ठेवतात, हाताची बोटं आणि स्नायू अचूक हालचाल करतात आणि त्याच वेळी स्मरणशक्तीही सक्रिय होते. म्हणजेच, एका साध्या कृतीत शरीर आणि मेंदूची अनेक यंत्रणा एकत्र काम करत असतात. म्हणूनच हाताने लिहिणं कमी झाल्याचा परिणाम केवळ हस्ताक्षरावरच नाही, तर शिकण्याच्या आणि लक्षात ठेवण्याच्या पद्धतीवरही होतो.
हाताने लिहिताना मेंदूचे अनेक भाग एकाच वेळी कार्यरत असतात. मोटर कॉर्टेक्स हाताच्या हालचाली नियंत्रित करतो, व्हिज्युअल कॉर्टेक्सअक्षरांचा आकार ओळखण्यास मदत करतो, हिप्पोकॅम्पस माहिती स्मरणात ठेवण्याचं काम करतो, तर प्रीफ्रंटल कॉर्टेक्स विचार, नियोजन आणि लक्ष केंद्रित ठेवण्यात मदत करतो. त्यामुळे प्रत्येक अक्षर लिहिताना मेंदूला अनेक स्तरांवर काम करावं लागतं.
टायपिंगमध्येही मेंदू हेच भाग वापरतो, पण प्रक्रिया काहीशी वेगळी असते. प्रत्येक अक्षराचा आकार स्वतः तयार करण्याऐवजी फक्त संबंधित कळ दाबायची असते. त्यामुळे हाताच्या सूक्ष्म हालचाली (fine motor control), अक्षरनिर्मिती आणि डोळे-हात समन्वय यांचा सराव तुलनेने कमी होतो. म्हणूनच संशोधकांच्या मते, हस्ताक्षरात मेंदू अधिक व्यापक आणि सखोल पद्धतीने सक्रिय असतो याच कारणामुळे गेल्या काही वर्षांत हस्ताक्षरावर अनेक संशोधनं झाली आहेत. त्यातून असं दिसून आलं आहे की, एखादी गोष्ट हाताने लिहिताना ती अधिक चांगल्या प्रकारे समजते, लक्षात राहते आणि तिच्यावर विचार करण्याची प्रक्रिया अधिक सखोल होते. टायपिंग करताना बोटं वेगाने शब्द उमटवत असतात; पण हाताने लिहिताना प्रत्येक शब्दासाठी थोडा वेळ घ्यावा लागतो. त्यामुळे आपण माहिती जशीच्या तशी उतरवण्याऐवजी तिचा अर्थ समजून घेऊन आपल्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करतो.
याचा सर्वाधिक परिणाम आजच्या मुलांमध्ये दिसून येतो. अनेक लहान मुलं टचस्क्रीनवर बोटं सहज फिरवतात; पण पेन्सिल योग्य पद्धतीने पकडणं, अक्षरांना वळण देणं किंवा काही ओळी सलग लिहिणं त्यांना अवघड जातं. हस्ताक्षराचा सराव कमी झाल्यामुळे बोटांची सूक्ष्म हालचाल (fine motor skills), संयम आणि एकाग्रतेच्याही विकासावर परिणाम होऊ शकतो.
याचा अर्थ असा नाही की टायपिंग चुकीचं आहे. आजच्या काळात कॉम्पुटर, मोबाईल आणि कीबोर्डशिवाय शिक्षण, कार्यालयीन कामकाज किंवा संवाद यांची कल्पनाही करता येणार नाही. प्रश्न तंत्रज्ञानाचा नाही, तर संतुलनाचा आहे. जर आपल्या दैनंदिन आयुष्यात हाताने लिहिण्याचं प्रमाण जवळजवळ शून्यावर आलं, तर त्याचे परिणाम नकळत दिसू लागतात. म्हणूनच दिवसातून काही मिनिटं का होईना, हाताने लिहिण्याची सवय जपणं आवश्यक आहे.
त्यासाठी फार काही मोठं करण्याची गरज नाही. दिवसातून एक पान डायरी लिहा, खरेदीची यादी मोबाईलऐवजी कागदावर लिहा, एखादी कविता, श्लोक किंवा आवडतं गाणं उतरवा, बैठकीतील महत्त्वाच्या नोंदी स्वतःच्या हाताने करा. मुलांनाही अधूनमधून वहीत लिहिण्यास, चित्र काढण्यास आणि स्वतःच्या हस्ताक्षरात शुभेच्छापत्र तयार करण्यास प्रोत्साहन द्या. अशा छोट्या सवयी केवळ हस्ताक्षरच सुधारत नाहीत, तर मेंदूलाही नियमित व्यायाम देतात.
समर्थ रामदासांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगितलं होतं—"दिसामाजी काहीतरी ते लिहावे." त्या काळी हा सल्ला ज्ञान, चिंतन आणि स्वाध्यायासाठी होता. आज डिजिटल युगात त्याला आणखी एक अर्थ प्राप्त झाला आहे.
- विनय मधुकर जोशी
• संगणक अभियंता
• खगोलशास्त्र आणि भारतीय विद्येचे अभ्यासक
• डिजिटल माध्यमांचा परिणाम याविषयी जनजागृतीत सहभाग
• अमृत महाराष्ट्र अतिथी स्तंभलेखक
ई-मेल:- vinayjoshi23@gmail.com
डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-१ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
भद्रं पश्येम अक्षभि - आम्ही डोळ्यांनी नेहमी मंगलकारक आणि शुभ पाहावे.
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2081
डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-२ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
टेक्नोफरन्सचा अदृश्य पिंजरा
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2189
डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-३ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
बहुतेक फोन आलाय ..?
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2329
डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-४ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
शुभरात्री... की शुभस्क्रोलिंग?
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2497
डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-५ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
आपल्या मेंदूला स्मरण ठेवण्याचे ‘स्मरण’ करा !!
'डिजिटल अम्नेशियाने ग्रासतोय का आपला मेंदू?
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment