डिजिटल डिटॉक्स लेख क्र.-१
डिजिटल माध्यमांचा आपल्यावर किती आणि कसा परिणाम होत आहे, हे आता प्रकर्षाने जाणवत आहे. आता वेळ आली आहे ती प्रत्येकाने याचा सारासार विचार करण्याची आणि त्यासाठी समाज म्हणून एकत्रित येऊन कृती करण्याची. 'अमृत' ही केवळ एक संस्था नाही, तर अशा सामाजिक प्रश्नांवर विचारमंथन घडवून आणणारे एक माध्यमसुद्धा आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या आणि मन विषण्ण करून टाकणाऱ्या या घटनांमधून आपण निराश न होता, सकारात्मक मानसिकतेने यावर विचार करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने विनय जोशी यांच्या लेखातून आम्ही अशाच काही समस्या आणि त्यावरील विचारमंथन 'अमृत महाराष्ट्र'च्या माध्यमातून करणार आहोत. आजच्या या लेखाच्या अनुषंगाने दर शनिवारी ह्या विषयावर एक लेख आपण प्रसिद्ध करणार आहोत. या विषयाची सुरुवात म्हणून आजचा हा लेख प्रसिद्ध करत आहोत- नुकत्याच घडलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. पोलीस तपास सुरु आहे ,पुढे न्यायालय सत्य काय ते ठरवेल. पण या घटनेने एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा केला आहे...एका वीस-बावीस वर्षांच्या सुशिक्षित तरुणीला एखाद्याचा जीव घेण्याचा विचार इतका सहज कसा वाटू शकतो?यामागे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, मानसिक अशी अनेक कारणे असू शकतात. पण यातून खुना सारख्या गुन्ह्याच झालेले सामान्यीकरण (Normalization) हा मुद्दा प्रकर्षाने अधोरेखित होतो. आपल्या आसपास एखादी गोष्ट सतत आणि साधारण सगळीकडे दिसायला लागली कि ती आपल्याला"नॉर्मल" वाटायला लागते. सिग्नल तोडताना रोज अनेक गाड्या पाहिल्या, की लाल सिग्नल ओलांडणं फारसं चुकीचं वाटेनासं होतं.सार्वजनिक ठिकाणी सर्रास कचरा टाकलेला दिसला, की आपल्याकडून अजून एक कागद टाकताना मन फारसं खंतावत नाही.ऑफिसमध्ये रोज सगळेच दहा-पंधरा मिनिटे उशिरा येत असतील, तर वेळ पाळणारा माणूसही हळूहळू उशिरा यायला लागतो. पण मग या प्रकरणाच्या दृष्टीने पाहिलं तर नक्कीच प्रश्न पडू शकतो आपल्या आसपास कुठे रोज असे गुन्हे होता आहेत ? रोज कोणी कटकारस्थान रचते आहे ? छे !! पण बारकाईनं पाहिलं तर हे सगळं रोज आपल्या दिवाणखान्यात होत आहे. रोज संध्याकाळी आपल्या घरात काय सुरू असते? 'कौटुंबिक मालिका' म्हणून आपण नेमके काय पाहतो? जवळपास प्रत्येक मालिकेत कटकारस्थान, बनावट अपघात, खूनाचे प्रयत्न, सूड, संपत्तीसाठी संघर्ष, फसवणूक. बरं या काही क्राईम पेट्रोलसारख्या खास गुन्हेगारी विश्वाचं दर्शन घडवणाऱ्या मालिका नाहीत.कहानी घर घर कि असं सांगणाऱ्या या कौटुंबिक डेली सोप आहेत. यात तुमच्या आमच्या कुटुंबातल्या सारख्याच सर्वसामान्य सासवा ,सुना, जावा अगदी सहजतेने असे गुन्हे करताना दाखवले जातात.कोणी प्रसादात विष मिसळत आहे,कोणी पाय घसरून पाडण्यासाठी फरशीवर तेल ओतत आहे, कोणी गाडीचे ब्रेक फेल करून ठेवत आहे ,कोणी कड्यावरून ढकलून देतं आहे. कोणा आईचा आत्म्या आपल्या मुलीला जपतो आहे हे दर एपिसोड मध्ये दाखवता यावं म्हणून कुटुंबातील एकूण एक जण त्या लहान मुलीला मारण्याचे वाटेल ते प्रयत्न करत आहेत. कोणी 'देवमाणूस ' तर दर आठवड्याला मुडदे पाडतोय. तथाकथित पौराणिक मालिकांत सुद्धा हेच."सावत्र आईच्या विषप्रयोगातून वाचेल का रेणुका ?" "भैरवीने लावलेल्या आगीतून स्वामी वाचवतील का आपल्या भक्ताला " आणि या सगळ्याला आपण "मनोरंजन" म्हणून स्वीकारत आहोत. मोठी माणसे पाहतात त्या मालिकांइतकाच लहान मुलांचे कार्टून्स हा सुद्धा या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.यातही कटकारस्थान आणि हिंसा जरा वेगळ्या प्रमाणात असते.आपल्याला न आवडणाऱ्या व्यक्तीला बॅटने मारणे , त्याच्या डोक्यात हातोडी घालणे हे "नॉर्मल 'असत हे मुलांना टॉम अँड जेरी न कळत शिकवत असतें.’शिनचॅन'मध्ये मोठ्यांना उलट बोलणे, त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे हे विनोदाचा भाग म्हणून वारंवार दाखवले जाते.Oggy and the Cockroaches मध्ये एकमेकांना मारणे, वस्तू फेकणे, अशा हिंसेला सामान्य म्हणून दाखवले जाते. सतत सगळी कडे हेच.एक मालिका संपली कि दुसरीत पण हेच. एक चॅनल बदलावं तर दुसऱ्यावर पण हेच. कुठलंही नियंत्रण नसलेल्या OTT प्लॅटफॉर्म वरच्या वेब सिरीज विषयी तर न बोललेलं बरं. यातून नकळत दोन मानसिक प्रक्रिया सुरू होतातएक म्हणजे 'सामान्यीकरण' (Normalization) आणि दुसरी 'संवेदनशून्यता' (Desensitization). जे सतत दिसते ते सामान्य वाटू लागते, आणि जे वारंवार दिसते त्याबद्दलचा धक्का हळूहळू कमी होत जातो. अमेरिकन संज्ञापनशास्त्रज्ञ जॉर्ज गर्ब्नर यांनी मांडलेल्या 'Cultivation Theory' नुसार, टीव्ही आणि इतर किंवा माध्यमांवरील विशिष्ट प्रकारचे आशय दीर्घकाळ आणि सातत्याने पहिले तर ते आपल्या वास्तवाविषयीच्या समजुतींवर परिणाम करू लागतात.म्हणजेच आपण जे वारंवार पाहतो, तेच जगाचे वास्तव आहे, अशी नकळत भावना आपल्या मनात तयार होऊ लागते.आपण जे पाहतो, तेच आपण होतो असे नाही; पण आपण जे सतत पाहतो, तेच 'सामान्य' आहे, असे मात्र आपण मानू लागतो. मानसशास्त्रातील 'Availability Heuristic' या संकल्पनेनुसार, ज्या गोष्टी आपण वारंवार पाहतो किंवा ऐकतो, त्या आपल्या मनात सहज उपलब्ध राहतात आणि या गोष्टी आपल्या निर्णयावर प्रभाव टाकू शकतात. आयुष्यात असे क्षण येतात, जेव्हा भावनांचा अतिरेक होतो, ताण असह्य वाटतो, अपमान किंवा राग अनावर होतो. क्षणासाठी विवेक ढळू शकणारे हे क्षण. अशा बेसावध क्षणी आपल्या ,आपल्या मुलाबाळांच्या ,आपल्या कुटुंबियांच्या मनात काय सहज उमटायला हवं ? रोज पडद्यावर पाहिलेली भांडण ,सूड, हिंसा आणि कारस्थाने..???? कि 'दुरितांचे तिमिर जावो' हे माऊलींचं आर्त पसायदान.. कलंक मतीचा झडो असं मागणाऱ्या मोरोपंतांची केकावली.. मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥मना धर्मता नीति सोडूं नको हो असं मनाला निक्षून बजावणाऱ्या समर्थांची अधिकार वाणी... ??? हा विचार आता नक्कीच करावा लागेल. आणि हा विषयी निर्णय घेण्याचा 'रिमोट' सुद्धा आपल्याच हातात आहे ! संध्याकाळी जेव्हा अंधार दाटू लागतो, दिवसभराच्या श्रमांनी थकलेली पावले घराकडे वळतात,अंधारवेळ मनात एक हुरहूर जागवते... अशा वेळी देवापुढे लावलेला छोटासा दीप असेल आणि घरात 'शुभं करोति कल्याणम्...'चे स्वर गुंजत असतील, तर आयुष्यातील कातरवेळीही मनात अंधार दाटत नाही; तेथे विवेकाची दिवेलागण होतच राहते. लेखक- विनय मधुकर जोशी
(अतिथी स्तंभलेखक-अमृत महाराष्ट्र) • संगणक अभियंता • खगोलशास्त्र आणि भारतीय विद्येचे अभ्यासक • डिजिटल माध्यमांचा परिणाम याविषयी जनजागृतीत सहभाग
इ-मेल -vinayjoshi23@gmail.com
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment