आपल्या मेंदूला स्मरण ठेवण्याचे ‘स्मरण’ करा !! 'डिजिटल अम्नेशियाने ग्रासतोय का आपला मेंदू?

डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-५

आपल्या मेंदूला स्मरण ठेवण्याचे ‘स्मरण’ करा !! 'डिजिटल अम्नेशियाने ग्रासतोय का आपला मेंदू? मुख्य फोटो
मुख्य फोटो

लँडलाईन फोनचा काळ आठवतोय? नातेवाईकांचे आणि जवळच्या मित्रांचे फोन नंबर आपल्याला तोंडपाठ असायचे. जिवलगांचे वाढदिवस, महत्त्वाच्या तारखा सहज लक्षात राहायच्या. एखाद्याच्या घरी पहिल्यांदाच जायचं असेल तर पत्ता, रस्त्यातील खाणाखुणा नीट लक्षात ठेवून आपण बिनचूक पोहोचायचो. किराण्याची यादीही अनेकदा न लिहिता लक्षात ठेवली जायची.

पण आज चित्र पूर्ण बदललं आहे. फोन नंबर मोबाईलच्या कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत, खरेदीची यादी Notes अॅपमध्ये आहे, तर वाढदिवसांची आठवण फेसबुक किंवा कॅलेंडर करून देतं. आपल्या स्वतःच्या शहरात एखाद्या नव्या ठिकाणी जायचं असलं तरी घरातून निघतानाच Google Maps सुरू केलं जातं. मोबाईलमध्ये Reminder लावला नाही, तर महत्त्वाची मिटिंग, डॉक्टरांची अपॉइंटमेंट किंवा एखादं बिल भरण्याची तारीख चुकण्याची भीती वाटते. एखादं गाणं ऐकल्यावर त्याचा गायक, गीतकार किंवा चित्रपट आठवायचा प्रयत्न करण्याऐवजी आपल्या मनात पहिला विचार येतो—"गुगलवर शोधूया!"

माहिती लक्षात ठेवण्याऐवजी ती कुठे साठवली आहे, हे लक्षात ठेवण्याची सवय आपल्याला लागली आहे. आणि जेव्हा स्मरणाची जबाबदारी आपण हळूहळू मोबाईल, इंटरनेट आणि डिजिटल साधनांकडे सोपवू लागतो, तेव्हा विसरणं ही आपल्या मेंदूची सवय बनू लागते. यालाच 'डिजिटल अम्नेशिया' (Digital Amnesia) किंवा 'गूगल इफेक्ट' असं म्हटलं जातं.

डिजिटल अम्नेशिया म्हणजे स्मरणशक्ती कमी होण्याचा आजार नाही, तर स्मरण करण्याची सवय कमी होणं होय. एखादी माहिती आपल्या मोबाईलमध्ये, क्लाउडमध्ये किंवा इंटरनेटवर सुरक्षित आहे, याची खात्री असल्यामुळे ती लक्षात ठेवण्यासाठी मेंदू फारसा प्रयत्नच करत नाही. मानसशास्त्रात याला 'Google Effect' असेही म्हटले जाते. २०११ मध्ये कोलंबिया विद्यापीठातील संशोधक बेट्सी स्पॅरो (Betsy Sparrow) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनात असे आढळले की, माहिती स्वतः लक्षात ठेवण्यापेक्षा ती कुठे मिळेल किंवा कुठे साठवलेली आहे, हे लक्षात ठेवण्याकडे आपला मेंदू अधिक कल दाखवतो.

अर्थात, यात तंत्रज्ञानाचा दोष नाही. उलट मोबाईल आणि इंटरनेटमुळे आपल्या मेंदूवरील माहिती साठवण्याचा ताण कमी झाला आहे. हजारो संपर्क क्रमांक, शेकडो फोटो, महत्त्वाची कागदपत्रं, नकाशे, तारखा आणि नोट्स एका छोट्याशा उपकरणात सुरक्षित ठेवणं ही मोठीच सोय आहे. प्रत्येक फोन नंबर किंवा प्रत्येक माहिती पाठ करून ठेवण्याची गरजही आज उरलेली नाही. समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा आपण आठवण्याचा प्रयत्नच करणं सोडून देतो.

आपल्या मेंदूची स्मरणशक्ती ही एखाद्या स्नायूप्रमाणेच असते. जसा स्नायूचा वापर कमी झाला की तो कमकुवत होतो, तसंच स्मरणशक्तीचंही आहे. पूर्वी फोन नंबर, पत्ते, कविता, पाढे, महत्त्वाच्या तारखा किंवा खरेदीची यादी लक्षात ठेवण्यासाठी मेंदूला नियमित व्यायाम मिळायचा. आज त्यातील बहुतेक कामं मोबाईल करत असल्याने आठवण्याचा सरावच कमी झाला आहे. त्यामुळे माहिती पूर्णपणे विसरण्यापेक्षा ती आठवण्यासाठी आपण लगेच मोबाईलकडे धाव घेतो.

कल्पना करूया , एखाद्या ताडतीच्या प्रसंगात अचानक मोबाईलची बॅटरी संपली, इंटरनेट बंद पडलं किंवा फोन हरवला. अशा वेळी आपल्याला घरच्यांचे दोन-तीन फोन नंबर तोंडपाठ सांगता येतील? एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचा नंबर, बँकेचा ग्राहक सेवा क्रमांक किंवा रुग्णालयाचा संपर्क क्रमांक आठवेल? अशा प्रसंगांमध्येच आपल्याला कळतं की आपण माहिती साठवण्याची जबाबदारी किती मोठ्या प्रमाणावर डिजिटल साधनांवर सोपवली आहे.

याचा अर्थ असा नाही की आपण पुन्हा सगळे फोन नंबर तोंडपाठ करावेत किंवा तंत्रज्ञानाचा वापरच बंद करावा. तंत्रज्ञान हे आपल्या स्मरणशक्तीचं पर्याय नसून पूरक साधन असायला हवं. काही महत्त्वाचे फोन नंबर लक्षात ठेवणं, किरकोळ खरेदीची यादी आठवण्याचा प्रयत्न करणं, वाढदिवस रिमाइंडरशिवाय लक्षात ठेवणं, छोट्या अंतरासाठी GPS न वापरणं, साधी गणितं कॅल्क्युलेटरशिवाय करणं अशा छोट्या सवयी आपल्या मेंदूला पुन्हा सक्रिय ठेवू शकतात.

मेंदूलाही नियमित व्यायामाची गरज असते. जसं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी चालणं, धावणं किंवा व्यायाम आवश्यक असतो, तसंच स्मरणशक्ती टिकवण्यासाठीही मेंदूला आव्हानं देणं गरजेचं आहे. एखादं स्तोत्र, कविता, श्लोक किंवा गाणं आवर्जून पाठ करणं, छोट्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणं, मानसिक गणितं करणं किंवा नवीन भाषा शिकणं यामुळे मेंदू सक्रिय राहण्यास मदत होते.आपल्या पूर्वजांनी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पाठांतर, स्वाध्याय आणि पुनरावृत्ती यांना महत्त्व दिलं होतं. आज तंत्रज्ञानाच्या युगात त्या परंपरेचा अर्थ अधिकच वाढला आहे .

आज आपल्या खिशात हजारो जीबीची मेमरी असलेला स्मार्टफोन आहे, पण त्याचबरोबर आपल्या डोक्यात अब्जावधी न्यूरॉन्सनी बनलेला एक अद्भुत संगणकही आहे. त्याचाही नियमित वापर झाला पाहिजे. मोबाईलमध्ये माहिती साठवूया, पण आठवणी, ज्ञान आणि विचारांची धार आपल्या मेंदूतच जपूया. कारण स्मार्टफोन 'स्मार्ट' असू शकतो; पण 'स्मरण' करण्याची खरी क्षमता अजूनही आपल्या मेंदूकडेच आहे.

- विनय मधुकर जोशी

• संगणक अभियंता

• खगोलशास्त्र आणि भारतीय विद्येचे अभ्यासक

• डिजिटल माध्यमांचा परिणाम याविषयी जनजागृतीत सहभाग

• अमृत महाराष्ट्र अतिथी स्तंभलेखक

ई-मेल:- vinayjoshi23@gmail.com


डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-१ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

भद्रं पश्येम अक्षभि - आम्ही डोळ्यांनी नेहमी मंगलकारक आणि शुभ पाहावे.

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2081


डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-२ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

टेक्नोफरन्सचा अदृश्य पिंजरा

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2189


डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-३ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

बहुतेक फोन आलाय ..?

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2329


डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-४ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

शुभरात्री... की शुभस्क्रोलिंग?

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2497

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 26-07-2026 News publication date | Time: 12:09 PM News publication time | Views: 39 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 26-07-2026 News publication date | Time: 12:09 PM News publication time | Views: 39 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement