टेक्नोफरन्सचा अदृश्य पिंजरा

डिजिटल डिटॉक्स- लेख क्र.-२

टेक्नोफरन्सचा अदृश्य पिंजरा मुख्य फोटो
मुख्य फोटो

तुम्ही पक्ष्यांच्या दुकानात पिंजऱ्यात बंदिस्त झालेले पक्षी पाहिले आहेत का? जन्मतः पंख लाभलेले, आकाशात मुक्तपणे विहार करण्याची क्षमता असलेले हे पक्षी काही काळाने त्या छोट्याशा पिंजऱ्यालाच आपले विश्व समजू लागतात. उडण्याची नैसर्गिक ओढ कुठेतरी हरवून जाते आणि लोखंडी गजांआडचे मर्यादित जगच त्यांना स्वाभाविक वाटू लागते. आजूबाजूला नजर टाकली, तर आपणही काहीसे तसेच होत चाललो आहोत का, असा प्रश्न पडतो.बस स्टॉप , मॉल , रेल्वेस्टेशन सगळी कडे लोक मोबाईल मध्ये डोकं घालून बसलेली दिसतील.एकेकाळी मुलांच्या खेळण्याच्या आवाजाने गजबजणारी मैदाने आता ओस पडताना दिसतात. बऱ्याचदा मैदान बाहेर गाड्यांवर बसून मुले मोबाईलमध्ये गेम खेळताना दिसतात. एवढेच काय, घरातही एकाच खोलीत बसलेले कुटुंबीय वेगवेगळ्या स्क्रीनच्या जगात रमलेले असतात. तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले, अंतर कमी झाले, असे आपण अभिमानाने म्हणतो; पण त्याच वेळी माणूस मात्र माणसापासून दूर जात असल्याचे वास्तवही नाकारता येत नाही. आपल्या नात्यांमध्ये, संवादामध्ये आणि एकत्र घालवायच्या क्षणांमध्ये तंत्रज्ञानाने निर्माण केलेला हा अदृश्य पिंजरा म्हणजेच 'टेक्नोफरन्स' (Technoference). 'टेक्नोफरन्स' म्हणजे Technology चा Interference. म्हणजेच तंत्रज्ञानामुळे मानवी संवादात, नात्यांमध्ये किंवा दैनंदिन व्यवहारात निर्माण होणारा व्यत्यय. आपण एखाद्याशी बोलत असताना सतत मोबाईलकडे पाहणे, जेवताना मध्येच Notifications तपासणे, घरात मुलांशी खेळण्याऐवजी सोशल मीडियावर वेळ घालवणे किंवा जोडीदारासोबत असतानाही सतत स्क्रीनमध्ये गुंतून राहणे—ही टेक्नोफरन्सची काही दैनंदिन उदाहरणे आहेत. या सवयी सुरुवातीला क्षुल्लक वाटतात; पण हळूहळू त्या संवादाची गुणवत्ता कमी करतात, भावनिक जवळीक कमी करतात आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतात. आपण किती नकळत या अदृश्य पिंजऱ्यात अडकत जातो, हे आपल्या लक्षातही येत नाही. ऑफिसमधून घरी परतताना बसमध्ये, ट्रेनमध्ये किंवा कॅबमध्ये हात आपोआप मोबाईलकडे जातो. प्रवासात आजूबाजूला काय घडते, निसर्ग कसा बदलतो किंवा आपल्या शेजारी बसलेला माणूस कोण आहे, याचे भानही राहत नाही. घरी पोहोचल्यावरही परिस्थिती फार वेगळी नसते. मोबाईल खिशातून बाहेर येतो आणि पुन्हा स्क्रीनचे जग सुरू होते. जेवणाच्या टेबलावर गप्पांचा फड रंगण्याऐवजी प्रत्येकाच्या हातात वेगळी स्क्रीन असते. घरातील संवाद कमी होतात आणि 'एकत्र असणे' हे केवळ शारीरिक उपस्थितीपुरतेच उरते. टेक्नोफरन्सचा सर्वाधिक परिणाम नातेसंबंधांवर होतो. लहान मुलांना आई-वडिलांचा वेळ, त्यांच्याशी होणारा संवाद आणि नजरेचा स्पर्श हवा असतो; पण पालक सतत मोबाईलमध्ये गुंतलेले असतील, तर मुलांना दुर्लक्षित असल्याची भावना निर्माण होऊ शकते. अनेक संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की, पालक वारंवार फोनकडे लक्ष देत असतील, तर मुलांमध्ये चिडचिड, हट्टीपणा आणि लक्ष वेधून घेण्याची वर्तणूक वाढू शकते. दाम्पत्याच्या नात्यातही हेच घडते. एकमेकांसोबत असतानाही वारंवार मोबाईल तपासणे, संभाषणाच्या मध्यात नोटिफिकेशन्सना प्रतिसाद देणे किंवा सोशल मीडियाला जोडीदारापेक्षा अधिक वेळ देणे यामुळे भावनिक जवळीक कमी होऊ लागते. मित्रांमध्येही प्रत्यक्ष भेटीतील संवाद कमी होऊन "एकत्र असूनही वेगळे" अशी परिस्थिती निर्माण होते. या समस्येवर उपाय म्हणून तंत्रज्ञानाचा त्याग करण्याची गरज नाही; गरज आहे ती त्याच्याशी असलेल्या आपल्या नात्याचा समतोल साधण्याची. कोणीही आपल्याशी बोल्ट असेल तर तेव्हा मोबाईल बघू नये हा साधा नियम परिणामकारक आहे. या शिवाय घरात दररोज काही वेळ 'नो-फोन टाइम' ठरवता येईल. जेवताना, कुटुंबीयांशी बोलताना किंवा मित्रांना भेटल्यावर मोबाईल बाजूला ठेवण्याची सवय लावता येईल. अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करणे आणि दिवसातून काही वेळ प्रत्यक्ष संवादासाठी राखून ठेवणे हे छोटे बदल मोठा फरक घडवू शकतात. तंत्रज्ञानाच्या अदृश्य पिंजऱ्यात आपण इतके रुळलो आहोत की, प्रत्यक्ष संवादाचा, निसर्गाचा, कुटुंबाचा आणि मित्रांच्या सहवासाचा आनंद विसरू लागलो आहोत. म्हणूनच आज पुन्हा एकदा स्वतःला आठवण करून देण्याची गरज आहे 'आकाशी झेप घे रे पाखरा' ही सुधीर फडके यांच्या अजरामर गीतातील हाक आजही तितकीच समर्पक वाटते. टेक्नोफरन्सच्या अदृश्य पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी, स्क्रीनच्या चौकटीपलीकडचे जग पुन्हा अनुभवण्यासाठी आणि नात्यांच्या मोकळ्या आकाशात मुक्तपणे विहार करण्यासाठी हीच हाक आज प्रत्येकाने ऐकण्याची गरज आहे. - विनय मधुकर जोशी (( अतिथी स्तंभलेखक- अमृत महाराष्ट्र) • संगणक अभियंता • खगोलशास्त्र आणि भारतीय विद्येचे अभ्यासक • डिजिटल माध्यमांचा परिणाम याविषयी जनजागृतीत सहभाग ई-मेल:- vinayjoshi23@gmail.com डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-१ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा- https://amrutmaharashtra.org/news.php?id=2081

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 05-07-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 73 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 05-07-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 73 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

S
Sharad Godbole
05-07-2026 07:27 PM

खुप सुंदर लेखमाला आज खरंच ह्या प्रयत्नांची गरज आहे.आपण आपल्या घरा पासून तर सुरुवात करुया. समाज सुधारेल तेंव्हा सुधारेल आपण तर सुरुवात करुया हा संकल्प करुन. अमृत महाराष्ट्र चे अभिनंदन

Write a Comment
0 / 50 words
Advertisement