बहुतेक फोन आलाय ..?

डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-३

बहुतेक फोन आलाय ..? मुख्य फोटो
मुख्य फोटो

अमोघ ऑफिसमधील एका महत्त्वाच्या प्रेझेंटेशनवर लक्ष केंद्रित करून काम करत आहे. पण दर पाच-दहा मिनिटांनी त्याचा हात नकळत मोबाईलकडे जातो. त्याला क्षणभर वाटतं, "फोन व्हायब्रेट झाला... कदाचित कॉल किंवा मेसेज आला असेल." पण स्क्रीन पाहिल्यावर कळतं काहीच नाही! बारावीतली उर्वी अभ्यासात गुंतली आहे. अचानक तिला नोटिफिकेशन आल्याचा भास होतो. तीही लगेच मोबाईल हातात घेते. पण तिथेही कोणताही संदेश नसतो. असा अनुभव फक्त अमोघ किंवा उर्वीलाच येत नाही. आपल्यापैकी अनेकांना कधीतरी मोबाईल व्हायब्रेट झाल्याचा प्रत्यक्षात मात्र कोणताही कॉल, मेसेज किंवा नोटिफिकेशन आलेलं नसतं. या मानसशास्त्रीय घटनेला 'फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम' (Phantom Vibration Syndrome) असं म्हटलं जातं. याचाच आणखी एक प्रकार म्हणजे फँटम रिंगिंग सिंड्रोम. यात फोनची रिंग वाजल्याचा किंवा नोटिफिकेशनचा आवाज आल्याचा भास होतो. गर्दीच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये किंवा अगदी शांत वातावरणातही अचानक फोन वाजल्यासारखं वाटतं आणि आपण घाईघाईने मोबाईल तपासतो. मात्र, प्रत्यक्षात कोणताही कॉल किंवा संदेश आलेला नसतो. काही वेळा दाराची बेल, वाहनाचा हॉर्न किंवा इतर एखादा परिचित आवाजही मेंदू मोबाईलच्या रिंगटोनशी जोडून पाहतो. विविध संशोधनांनुसार, स्मार्टफोनचा नियमित वापर करणाऱ्या सुमारे ८० ते ९० टक्के लोकांनी आयुष्यात किमान एकदा तरी असा अनुभव घेतल्याचं सांगितलं आहे.हे ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं, तरी फँटम व्हायब्रेशन आणि फँटम रिंगिंग हे कोणतेही मानसिक आजार नाहीत. मानसशास्त्रज्ञांच्या मते, या दोन्ही घटना संवेदनात्मक भ्रम (Sensory Illusion) किंवा अपेक्षाजन्य भ्रम (Expectation-induced Illusion) आहेत. मोबाईल सतत जवळ बाळगण्याची सवय, वारंवार येणारे कॉल-मेसेज, नोटिफिकेशन्सची अपेक्षा आणि त्यांच्याकडे सतत लक्ष ठेवण्याची मानसिक तयारी यामुळे मेंदू कायम सावध अवस्थेत असतो. त्यामुळे मांडीच्या स्नायूंचा हलका आकुंचन, कपड्यांचा घर्षण किंवा एखादा परिचित आवाजही तो मोबाईलच्या व्हायब्रेशन किंवा रिंगप्रमाणे समजू लागतो. यामागे आणखी एक मनोरंजक कारण आहे. प्रत्येक नोटिफिकेशन, मेसेज किंवा कॉल मेंदूमध्ये डोपामिन या रसायनाचं स्त्रवण वाढवतं. त्यामुळे प्रत्येक सूचना ही जणू एखाद्या छोट्याशा बक्षिसासारखी वाटू लागते. हळूहळू मेंदूला या बक्षिसाची इतकी सवय लागते की तो सतत पुढच्या नोटिफिकेशनची अपेक्षा करू लागतो. ही अपेक्षा कधी इतकी तीव्र होते की प्रत्यक्षात काहीच घडलं नसतानाही फोन व्हायब्रेट झाल्याचा किंवा रिंग वाजल्याचा भास निर्माण होतो. एखाद्या वेळी असा अनुभव येणं ही चिंतेची बाब नाही. मात्र तो वारंवार येऊ लागला, सतत नोटिफिकेशनची वाट पाहणं, प्रत्येक काही मिनिटांनी फोन तपासणं, मोबाईल दूर असला की अस्वस्थ वाटणं किंवा कामात आणि अभ्यासात लक्ष न लागणं अशी लक्षणं दिसू लागली, तर तो मोबाईलवरील वाढत्या मानसिक अवलंबित्वाचा इशारा समजायला हरकत नाही. सुदैवाने यावरचे उपाय अवघड नाहीत. अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करणं, प्रत्येक अॅपला नोटिफिकेशन्स देण्याची परवानगी न देणं, ठरावीक वेळानेच फोन तपासणं, काही वेळ मोबाईल खिशाऐवजी बॅगेत ठेवणं आणि दिवसातील काही तास 'नो-फोन टाइम ' म्हणून राखून ठेवणं या छोट्या सवयी मोठा फरक घडवू शकतात. फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम हा आजार नसला, तरी आपल्या डिजिटल सवयींकडे पुन्हा एकदा पाहण्याची संधी मात्र नक्कीच आहे.

- विनय मधुकर जोशी

• संगणक अभियंता

• खगोलशास्त्र आणि भारतीय विद्येचे अभ्यासक

• डिजिटल माध्यमांचा परिणाम याविषयी जनजागृतीत सहभाग

• अमृत महाराष्ट्र अतिथी स्तंभलेखक ई-मेल:- vinayjoshi23@gmail.com


डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-१ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-  

भद्रं पश्येम अक्षभि - आम्ही डोळ्यांनी नेहमी मंगलकारक आणि शुभ पाहावे.

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2081


डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-२ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-  

टेक्नोफरन्सचा अदृश्य पिंजरा

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2189

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 12-07-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 136 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 12-07-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 136 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement