ताणतणावातून येणारा हार्टअटॅक टाळायचाय?..मग ३ मिनिट वेळ काढून वाचा!

सायबर सुरक्षा-लेख-क्र-६

ताणतणावातून येणारा हार्टअटॅक टाळायचाय?..मग ३ मिनिट वेळ काढून वाचा! मुख्य फोटो
मुख्य फोटो

आजचा लेख तसा थेट सायबर सुरक्षा या विषयाशी निगडीत नाही,पण हा आणि असे अनेक विषय सतत आपल्या मनावर,हृदयावर परिणाम करतात. त्याचा परिणाम कसा होतो,ही मात्र आजच्या या लेखातून आपल्याला समजणार आहे.

हार्ट अटॅक संदर्भात काय काय काळजी घ्यावी हे मला माझे डॉक्टर (जगदीश हिरेमठ, पूना हॉस्पिटल) यांनी सांगितले. त्याबद्दल मागेच एक पोस्ट केली. जी हजारो लोकांपर्यंत पोचली व त्याप्रमाणे अनेकजण उपाय करून सुरक्षित जीवन जगत आहेत. आज त्याचाच पुढचा विचार मांडतोय.

मुळात अटॅक का येतो? याचे शरीरशास्त्रीय कारण बाजूला ठेवून मानसिकबाबत सांगतो. की अटॅक येण्यासाठी आपला "ताण" घेण्याचा स्वभाव मुख्यतः कारणीभूत असतो. आता ताण कशाकशामुळे येतो हे स्वभावावर अवलंबून असते. माझ्यापुरते सांगतो. खूप काही लक्षात ठेवण्याची मला सवय होती. म्हणजे अगदी दहा वर्षांपूर्वी कुणी भेटला असेल तर त्यावेळी अंगावर ड्रेस काय होता, बोलणं काय झालं? असं सगळं आठवायचो. त्यावेळी ते छान वाटायचं पण शेवटी मेंदूला देखील काही लिमिट असते न ? त्याची हार्ड डिस्क ओव्हरलोडमुळे करप्ट होणारच. आणि ते करप्ट होणं म्हणजेच ताणाला प्रवेश करू देणं.

डॉ. हिरेमठ म्हणाले होते, "मिस्टर धनंजय देशपांडे, का हे सगळं लक्षात ठेवता? गरज नसते त्याची. कामापुरते ठेवून बाकी विसरायला शिका. काही बिघडत नाही. समजा समोरून ओळखीचा आला आणि तुम्हाला ओळखच लागत नाहीये तर सरळ त्याला सांगा, की बाबारे मी विसरलो. जरा सांगतो का आपण कुठे भेटलो? असं म्हटल्याने तुमची इज्जत जात नाही. फार तर समोरचा दोन मिनिट नाराज होईल. तर त्याबद्दल मनापासून माफी मागा. समंजस असेल तर तो रागावणार नाही. सो सिम्पल"

आईन्स्टाईनना कोणीतरी प्रश्न विचारला,” आवाजाचा वेग नेमका (अचूक) किती?” आईन्स्टाईन म्हणाले, ”लक्षात नाही. जे कधीही आणि कुठल्याही तऱ्हेने आवश्यक असेल तेंव्हा समजू शकते ते लक्षात कशाला ठेऊ???” हे व्रत मी नंतर ९९% जपलं. इथल्या अनेकांना याचा अनुभव आलाच असेल. हज्जार वेळा सॉरी म्हणूया पण उगीच डोक्यात का साठवून ठेवू? असं ठरवलं तर अटॅक येण्याच्या ताणांपैकी एक कारण आपण संपवलेलं असत.

आता अजून एक गंमत सांगतो. आपण अनेकदा ट्राफिक जाममध्ये अडकतो. आपल्यासारखेच इतरही अडकलेले असतात. आणि दोन तीन मिनिट होतात न होतात तोच कुणीतरी हॉर्न वाजवायला सुरुवात करतो. त्याचे पाहून दुसरा मग तिसरा असे सगळीकडून हॉर्न सुरु होतात. नकळत आपणही त्यात सामील होतो आणि एक प्रकारचा "हॉर्न ऑर्केस्ट्रा" रस्त्यावर सुरु होतो. अशावेळी एक विचार करा की, तुमच्या हॉर्न वाजवण्याने समोरचं ट्रफीफ थोडेच मोकळे होणार आहे? ज्या अडचणीमुळे जाम झालेय ते कारण दूर झाल्याशिवाय जाम मोकळा होत नाहीच. मग ती दहा पंधरा मिनिट आपण जर जागेवर शांतपणे (गाडी पुढे पुढे घुसवत न नेता) थांबलो. आणि गाडी पण बंद केली तर दोन फायदे होतात. एक तर पेट्रोल वाचत आणि दुसरं म्हणजे या कोलाहलाचा मेंदूवर परिणाम होत नाही. आपल्या पुढचा पण अगतिक असतो मग तुमच्या हॉर्नमुळे वेगळं काय घडणार ? अशावेळी आपण असे पॅनिक का होतो? आपल्याला वाटते की आपल्या स्पीडने दुनिया का चालत नाही.

पण गंमत पहा, कधी सरकारी ऑफिसात जातो तेव्हा तिथला कारभार पाहून म्हणतो की, किती स्लो काम करतात हे? मात्र तो सरकारी माणूस मनातून तुम्हाला म्हणत असतो की, इतकी घाई कसली आहे तुम्हाला? शांत जगा न. पळून कुठे ऑलिम्पिकला जायचंय का? घरी पण अशाच गमती घडतात. खरेतर विज्ञानाने आपल्या जीवनात अनेक गोष्टी आणून आपला वेळ वाचवला आहे. पूर्वी कपडे धुण्यासाठी खूप वेळ जायचा. आता वॉशिंग मशीन आले. त्यामुळे कष्ट कमी व वेळेत बचत झाली. मग बचत झालेली वेळ आपण आनंदी राहण्यासाठी नाही वापरत. तर आपण अजून जास्त बिझी होत गेलोय. पूर्वी आवडीच्या हॉटेलात जाऊन खाण्याचा आनंद घ्यायचो. आता एका कॉलवर घरपोच डिश येतात. मग वेळ वाचला न ? पण तरी डिलिव्हरी बॉयला पाच मिनिट जरी उशीर झाला तर लगेच आपण पुन्हा कॉल करून त्याच्यावर चिडतो. गाडी काढून पेट्रोल जाळून हॉटेलात जाऊन खाण्यापेक्षा तर कमी वेळेत डिलिव्हरी बॉय नक्की येतो पण त्याचा पाच मिनिट लेट पण आपल्याला चालत नाही.

अजून एक उदाहरण, लिफ्टजवळ आपण असतो, लिफ्ट वर गेलेली असते त्यावेळी आपण तिथलं बटन दाबतो. मात्र दहा पाच सेकंद जात नाहीत तोवर पुन्हा आपण तेच बटन दाबतो. काहीजण तर चार पाच वेळा दाबतात. एकदा दाबल्यावर यंत्रणेला कळत न की कुणीतरी हाक मारत आहे. चारदा बटन दाबल्याने वेगळा काय फरक पडणार? पण हे आपण लक्षात घेत नाही.

डॉ. डीडी क्लास : आपल्यातील "बेसब्री" जास्त वाढत जातेय. आणि त्यातूनच ताण जन्माला येत आहेत. ग्यानबाची मेख तिथं आहे. जेम्स ग्लीक यांनी त्यांच्या "फास्टर" पुस्तकात म्हटलं आहे की, आपण ग्रीन सिग्नलचे म्हणजे "जल्दबाजी"चे रुग्ण होत आहोत. त्यातून चिडचिड वाढतेय व ताण येऊन परिणामी अटॅककडे आपण जातोय.

पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात एक प्रार्थना म्हटली जाते. "जे चुकीचे भोवती घडते ते बदलण्याची शक्ती दे आणि ते बदलू शकत नसेल तर ते सहन करण्याची शक्ती दे"

जगण्याचे किती सुंदर सूत्र आहे हे ! जरा थांबू. जरा विसावू. थोडं जगूया रे !!

©️ ®️ डॉ. धनंजय देशपांडे.(dd)

Cyber Security Consultant

- 3 Times National Award winner

- 3 Times State Award winner

- HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State

- अतिथी स्तंभ लेखक- अमृत महाराष्ट्र

सायबर सुरक्षा-लेख क्र. १ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

सीबीआयच्या नावाखाली होतोय घाबरवणारा सायबर फ्रॉड-

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2007

सायबर सुरक्षा-लेख क्र. २ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

सायबर क्राईमच्या राजधानीवर छापा- पकड्लेल्यामध्ये शेकडो भारतीय तरुण गुन्हेगारी विश्वात खळबळ-

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2123

सायबर सुरक्षा-लेख क्र.३ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

कारमध्ये dashcam हवाच !- तो खर्च वाढवत नाही तर वाचवतो

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2258

सायबर सुरक्षा-लेख-क्र-४ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

तुमची फोटो गॅलरी म्हणजे खाजगी डायरी- ती भामट्यांच्या हातात पडण्यापासून जपा!

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2403

सायबर सुरक्षा-लेख-क्र-५ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

ना ओटीपी दिला ना लिंक क्लिक केली तरी तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2565

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 29-07-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 94 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 29-07-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 94 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement