तुमची फोटो गॅलरी म्हणजे खाजगी डायरी- ती भामट्यांच्या हातात पडण्यापासून जपा! !

सायबर सुरक्षा-लेख-क्र-४

तुमची फोटो गॅलरी म्हणजे खाजगी डायरी- ती भामट्यांच्या हातात पडण्यापासून जपा! ! मुख्य फोटो
मुख्य फोटो

"आजकाल बँक अकाउंटपेक्षा मोबाईलची गॅलरी हॅक होणे जास्त महागात पडू शकते..."

एक केस नुकतीच आलेली की, एकीने कुणालाही फोन हातात दिला नाही तरी तिच्या गॅलरीतले फोटो बाहेर गेले आणि "विचित्र" प्रकारे मॉर्फिंग करून तिलाच ब्लॅकमेल केलं जात होत. अब्रू आणि पैसा दोन्ही संकटात.

तेव्हा लक्षात आलं की, मोबाईलमधील फोटो गॅलरी कशा प्रकारे जपावी हेच अनेकांना माहित नाहीय. त्यामुळे या भागात मी त्याबद्दल डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप सगळं सांगतो. अर्थात ज्यांना हे माहित आहे त्यांना दंडवत आहेच पण अनेक ज्येष्ठ नागरिक, तरुणी, गृहिणी यांना माहीतच नाहीय त्यांच्यासाठी ही पोस्ट !

तर तुम्ही मोबाईलमध्ये फोटो काढलेले नंतर "गुगल फोटोज" मध्ये जाऊन पडतात. जिथं ते सेफ असतात (क्लाउड लॉकर टाईप) असं मानलं जातं. मात्र १००% तिथं फोटो सेफ आहेत असं म्हणता येणार नाही.

गुगल फोटोज या सुविधेचे फायदे आणि तोटे दोन्ही सांगतो. 🔒 गुगल फोटोज 'सुरक्षित' का मानले जाते? कारण : गुगल तुमच्या फोटोंचे रक्षण करण्यासाठी जागतिक दर्जाची सुरक्षा यंत्रणा वापरते.

🔒 डेटा एन्क्रिप्शन (Encryption) : तुमचे फोटो जेव्हा फोनमधून गुगलवर जातात आणि तिथे स्टोअर होतात, तेव्हा ते 'एन्क्रिप्टेड' (कोड भाषेत) असतात. त्यामुळे मध्येच कोणी ते चोरू शकत नाही.

🔒 इतरांना एंट्री नाही : तुमचे फोटो फक्त आणि फक्त तुमच्या जीमेल (Gmail) आयडीशी लिंक असतात. तुम्ही स्वतः लॉगिन केल्याशिवाय ते जगातील इतर कोणालाही दिसत नाहीत.

🔒 सर्व्हर सिक्युरिटी : गुगलचे सर्व्हर हॅक करणे कोणत्याही सामान्य हॅकरसाठी अवघड गोष्ट आहे. मग 'धोका' कुठे आहे? ते हॅक कसं होऊ शकतं? 👉 गुगलची स्वतःची सुरक्षा मजबूत असली, तरी तुमच्या स्वतःच्या काही चुकांमुळे तुमचे फोटो इतरांच्या हाती लागू शकतात. याला आपण 'गुगल हॅक होणे' नाही, तर 'अकाउंट सुरक्षित न ठेवणे' म्हणूया.

👉 जर तुमच्या जीमेलचा पासवर्ड सोपा असेल (उदा. नाव व पुढे १२३, मोबाईल नंबर), तर हॅकर्स तो सहज ओळखू शकतात आणि तुमच्या ईमेलचा आणि नंतर गुगल फोटोजचा ॲक्सेस मिळवू शकतात.

👉 फिशिंग स्कॅम (Phishing): तुम्हाला एखादी खोटी लिंक आली आणि तुम्ही तिथे तुमचा जीमेल पासवर्ड टाकला, तर हॅकरला तुमच्या फोटोंचा ऍक्सेस मिळतो.

👉 जर तुम्ही तुमचा जीमेल आयडी मित्राच्या, ऑफिसच्या किंवा सायबर कॅफेमधील कॉम्प्युटरवर लॉगिन करून तसाच सोडला, तर तुमचे फोटो त्यांना दिसू शकतात.

👉 'पार्टनर शेअरिंग' (Partner Sharing) : गुगल फोटोजमध्ये नकळतपणे जर तुमच्याकडून 'पार्टनर शेअरिंग' चालू झाले, तर तुमचे सगळे फोटो समोरच्या व्यक्तीला आपोआप दिसू लागतात.

आजकाल आपण बँकेचे डिटेल्स, पासवर्ड्स किंवा वैयक्तिक गोष्टींचे स्क्रीनशॉट्स (SS) काढतो, त्यामुळे हे फोटो गुगलवर जाणे कितपत सुरक्षित आहे, हा विचार करणे सुजाणपणाचे लक्षण आहे.

तर गॅलरीतले फोटो गुगल फोटोजमध्ये जाऊ नयेत यासाठी काय करावं लागेल ?

मोबाईलमध्ये काढलेले फोटो आपोआप गुगल फोटोज (Google Photos) वर जाऊ नयेत असं वाटत असेल, तर तुम्हाला तुमच्या फोनमधील 'बॅकअप' (Backup) चा पर्याय बंद करावा लागेल. हे बंद करण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा: तुमच्या मोबाईलमधील Google Photos ॲप ओपन करा.

वरच्या उजव्या कोपऱ्यात तुमच्या प्रोफाइल फोटोवर (किंवा नावाच्या अक्षरावर) क्लिक करा.

तिथे Photos settings (फोटोज सेटिंग्स) हा पर्याय निवडा.

सर्वात वर असलेल्या Backup (बॅकअप) या पर्यायावर क्लिक करा.

आता तिथे समोर दिसणारे Backup चे बटन बंद (Turn Off) करा. झालं काम ! मात्र एक महत्त्वाची टीप : बॅकअप बंद केल्यावर तुमचे फोटो गुगल क्लाउडवर सुरक्षित राहणार नाहीत. त्यामुळे भविष्यात फोन हरवला किंवा खराब झाला, तर ते फोटो परत मिळवणे कठीण होईल. याची कृपया नोंद घ्या. मग आता काही जणांना गुगल फोटोज सुविधा तर हवी आहे पण ते फोटो भामट्याकडे जाऊ नयेत वाटत. यासाठी काय करावे ?

जर तुम्हाला बॅकअप चालू ठेवायचा असेल (जेणेकरून फोन हरवला तरी फोटो मिळतील), तर तुमचे गुगल अकाउंट लोखंडी तिजोरीपेक्षाही जास्त सुरक्षित करण्यासाठी खालील गोष्टी नक्की करा:

✅ Two-Factor Authentication (2FA) चालू करा: हे सर्वात महत्त्वाचे आहे. यामुळे तुमच्या जीमेलचा पासवर्ड कोणाला माहिती पडला, तरी तुमच्या मोबाईलवर 'ओटीपी' (OTP) किंवा 'येस/नो' चे नोटिफिकेशन आल्याशिवाय कोणीही तुमचे फोटो पाहू शकणार नाही. ईमेलच्या सेटिंगमध्ये तुम्हाला 2FA मिळेल.

✅ स्ट्रॉन्ग पासवर्ड ठेवा: पासवर्डमध्ये अक्षरे, अंक आणि चिन्हे (@, #, $) यांचा वापर करा.

✅ स्क्रीनशॉट सुरक्षित ठेवा: बँक डिटेल्स, पासवर्ड किंवा अत्यंत खाजगी स्क्रीनशॉट्स गुगल फोटोजमध्ये ठेवण्याऐवजी, ते Google Photos मधील 'Locked Folder' (लॉक्ड फोल्डर) मध्ये टाका. या फोल्डरमधील फोटो गुगल क्लाउडवर जात नाहीत आणि ते तुमच्या फोनच्या फिंगरप्रिंट लॉकशिवाय उघडत नाहीत.

डॉ. डीडी क्लास : थोडक्यात सांगायचे तर: गुगल फोटोज हे सुरक्षित आहे, जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीमेल अकाउंटची सुरक्षा मजबूत ठेवता. जर तुम्हाला पूर्ण प्रायव्हसी हवी असेल, तर तुम्ही महत्त्वाच्या फोटोंचा बॅकअप मॅन्युअली पेनड्राइव्ह किंवा कॉम्प्युटरमध्ये घेऊ शकता आणि गुगल बॅकअप बंद ठेवू शकता.

शेवटी एकच सांगतो, घराला कुलूप लावता, मग मोबाईलच्या फोटो गॅलरीला उघडे का सोडता? डिजिटल सुरक्षेची सुरुवात स्वतःपासून करा. स्मार्टफोन वापरताय? मग गॅलरी सुरक्षित ठेवून 'स्मार्ट नागरिक' बना !"

लास्ट बट नॉट द लिस्ट : पोस्टमध्ये वापरलीय ती प्रतिकात्मक (Conceptual) इमेज आहे. हॅकर प्रत्येकवेळी अशाच पद्धतीने फोटो चोरतो असे नाही. पण मोबाईल, क्लाऊड किंवा ऍप्सची सुरक्षा गंडली तर तुमचे वैयक्तिक फोटो इतरांच्या हाती जाऊ शकतात. ©️ ®️ डॉ. धनंजय देशपांडे.(dd) - Cyber Security Consultant - 3 Times National Award winner - 3 Times State Award winner - HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State - अतिथी स्तंभ लेखक- अमृत महाराष्ट्र • सायबर सुरक्षा-लेख क्र. १ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा- सीबीआयच्या नावाखाली होतोय घाबरवणारा सायबर फ्रॉड-

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2007

सायबर सुरक्षा-लेख क्र. २ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

सायबर क्राईमच्या राजधानीवर छापा- पकड्लेल्यामध्ये शेकडो भारतीय तरुण गुन्हेगारी विश्वात खळबळ-

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2123

सायबर सुरक्षा-लेख क्र. ३ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

कारमध्ये dashcam हवाच !- तो खर्च वाढवत नाही तर वाचवतो

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2258

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 15-07-2026 News publication date | Time: 11:37 AM News publication time | Views: 57 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 15-07-2026 News publication date | Time: 11:37 AM News publication time | Views: 57 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement