ना ओटीपी दिला ना लिंक क्लिक केली .. तरी तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते

सायबर सुरक्षा-लेख-क्र-५

ना ओटीपी दिला ना लिंक क्लिक केली .. तरी तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते मुख्य फोटो
मुख्य फोटो

खोटं वाटू शकत, अशक्य वाटू शकत पण हे घडणे सुरु झालेय त्यामुळेच या लेटेस्ट सायबर फ्रॉडबद्दल माहिती देण्यासाठी तुमचा हा सायबर सुरक्षा दोस्त आलाय.

तर तुमचे बँक खाते कसे रिकामे होते तर आधी तुमचे SIM कार्ड हायजॅक होऊ शकते, तेही तुमच्या हातात फोन असतानाच! आणि मग लुटलं जाते.

यालाच SIM Swap Scam म्हणतात !

तर हा SIM Swap Scam कसे ओळखाल? त्याची काही लक्षणे आधी सांगतो.

📶 अचानक मोबाईल नेटवर्क गायब होणे

📩 SIM Port संदर्भात अनपेक्षित मेसेज येणे

📞 कॉल आणि SMS अचानक बंद होणे

हि झाली लक्षणे ! पण मग प्रश्न असा येतो...

"कॉल नाही, लिंक नाही, मग पैसे कसे गेले?"

हे पूर्णपणे शक्य आहे.कारण जर हॅकरकडे आधीपासून तुमचा मोबाईल नंबर, बँकेचे नाव, इंटरनेट बँकिंगची काही माहिती किंवा इतर क्रेडेन्शियल्स, किंवा तुमच्या ई-मेलचाही आयडी असेल, कारण कधी अनावधानाने किंवा कधी अतीच सोशल मीडियावर सगळं सांगण्याच्या सवयीने तुम्ही तुमचे हे सगळे डिटेल्स अपलोड केलेले असतात. अगदी पिझ्झा खातोय इथपासून नवी कार घेतली इथपर्यंत सगळं सगळं अनेकजण सोशलवर टाकून जणू आपल्याच पायावर धोंडा पाडून घेत असतात.

तर त्यामुळे तुमची सगळीच कुंडली त्यांच्याकडे असल्याने फक्त SIM Swap करून OTP मिळवणे हे भामट्याना सहज शक्य होते. हा स्कॅम नेमका हॅकर करतो कसा ? कारण ना फोन कॉल ना लिंक ना काही सुगावा तरी बंगळुरू च्या एका तरुणाचे सात लाख रुपये गेले तर नेमकं सिम कॉम्प्रोमाइज कसे होते ?

खरं म्हणजे SIM Swap Scam हा "हॅकिंग" कमी आणि "ओळख (Identity) चोरून मोबाईल कंपनीला फसवण्याचा" प्रकार जास्त आहे. म्हणूनच यात अनेक वेळा ना लिंक असते, ना OTP मागितला जातो, ना कोणता कॉलही येतो.

तुमची सर्व खाजगी ही माहिती डेटा लीक, फिशिंग, बनावट KYC किंवा इतर फसवणुकीतून भामट्याना मिळू शकते. नंतर मग त्या आधारे मोबाईल ऑपरेटरला (म्हणजे ज्या कंपनीचे तुमचे सिम आहे त्या कंपनीला) फसवले जाते हॅकर तुमच्या मोबाईल सेवा देणाऱ्या कंपनीला संपर्क करून सांगतो:

"माझे SIM हरवले आहे" किंवा "नवीन SIM हवे आहे."

नंतर तुमच्या कंपनीचा ऑपरेटर तुमचा नंबर नवीन SIM वर सक्रिय करतो. यालाच SIM Swap म्हणतात.


ज्या क्षणी भामट्याकडे नवीन SIM सक्रिय होते: तुमच्या फोनचे नेटवर्क अचानक गायब होते. कॉल येत नाहीत. SMS येत नाहीत. OTP तुमच्याकडे न येता हॅकरच्या SIM वर जाऊ लागतात. मग बँक खात्यावर हल्ला होतो. आता हॅकर "Forgot Password" पद्धत वापरतो. आणि कन्फर्मेशनसाठी OTP पाठवला जातो तो त्याच्या SIM वर येतो. तुमच्या नाही ! आणि तिथेच नेटबँकिंग / UPI / वॉलेटचा ताबा तो भामटा मिळवतो. आणि पैसे स्वतःच्या वेगळ्याच खात्यात ट्रान्सफर करतो.

त्यामुळे तुम्हाला पत्ता न लागता "चुना" मात्र लागू शकतो !

मग आता यात तुम्ही अडकू नये यासाठी उपाय आहे का ?

तर नक्की आहे ! त्यासाठी खालील गोष्टी लगेच करून घ्या !

🔒 मोबाईलमध्ये असलेले SIM Lock सुरू करा.

🔑 SIM PIN / SIM Code सेट करा.

🚨 संशयास्पद नंबरची काही हालचाल तुम्हाला दिसली (म्हणजे विचित्र मेसेज येणे, मिस्ड कॉल सतत पडणे) तर अशावेळी संचार साथी (Sanchar Saathi) पोर्टलवर त्याबद्दल तक्रार करा.


डीडी क्लास : सिम स्वॅप फ्रॉड हा अतिशय धोकादायक आहे. कारण यात तुमचे संपूर्ण बँक खातेच भामट्याकडे जाते. अर्थात मी सांगितल्याप्रमाणे तुमच्याच खाजगी विविध माहितीवरून तो हे कांड करतो. म्हणून मी नेहमी सावध करत असतो की, हा सोशल मीडिया आहे तिथं खाजगी काहीही टाकू नका ! त्याचे दुष्परिणाम तुम्हालाच भोगावे लागतात. वास्तुशांती केली टाक फोटो, कार घेतली टाक फोटो, पार्टीला चाललोय टाक फोटो, ट्रीपला चाललोय टाक फोटो असं करण्याने तुमचं सगळंच खाजगी जीवन (आर्थिक राहणीमान) भामट्याना समजत. त्यातूनच मग ते ट्रॅप लावतात. आणि महत्वाचं सांगतो, कोणताही सायबर भामटा अचानक असा एका दिवसात आला अन पैसे घेऊन पळाला असं होत नाही. अगदी पद्धतशीरपणे महिना दोन महिने ते तुमच्यावर वॉच ठेवून असतात. तुमचा सगळा डेटा गोळा करत असतात आणि मग ट्रॅप लावला जातो. हनी ट्रॅप सारख्या प्रकरणात तर माझ्याकडे आलेल्या एका केसमध्ये सहा महिन्यापासून हॅकर त्यांच्या मागावर होते हे निष्पन्न झालं आहे. तेव्हा मंडळी काळजी घ्या ! सावध रहा.

लास्ट बट नॉट द लिस्ट : मंडळी.... नको इतकं "सोशल" होऊ नका ! सोसल इतकंच सोशल व्हा ! सुरक्षित राहा इतरांनाही हे पाठवून जागृत करा.


©️ ®️ डॉ. धनंजय देशपांडे.(dd) - Cyber Security Consultant

- 3 Times National Award winner

- 3 Times State Award winner

- HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State

- अतिथी स्तंभ लेखक- अमृत महाराष्ट्र


• सायबर सुरक्षा-लेख क्र. १ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

सीबीआयच्या नावाखाली होतोय घाबरवणारा सायबर फ्रॉड-

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2007

• सायबर सुरक्षा-लेख क्र. २ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

सायबर क्राईमच्या राजधानीवर छापा- पकड्लेल्यामध्ये शेकडो भारतीय तरुण गुन्हेगारी विश्वात खळबळ-

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2123

• सायबर सुरक्षा-लेख क्र.३ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

कारमध्ये dashcam हवाच !- तो खर्च वाढवत नाही तर वाचवतो

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2258

• सायबर सुरक्षा-लेख-क्र-४ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

तुमची फोटो गॅलरी म्हणजे खाजगी डायरी- ती भामट्यांच्या हातात पडण्यापासून जपा!

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2403

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 22-07-2026 News publication date | Time: 11:40 AM News publication time | Views: 34 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 22-07-2026 News publication date | Time: 11:40 AM News publication time | Views: 34 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement