घटना थोडी जुनी आहे, पण अनेक माध्यमांतून ती दाखवली गेली नाही, म्हणून तुमच्यासाठी ती सविस्तरपणे घेऊन आलो आहोत.
KK Park हे म्यानमार-थायलंड सीमेवरील अत्यंत कुप्रसिद्ध सायबर स्कॅम आणि मानवी तस्करीचे केंद्र म्हणून जगभर ओळखले जाते. येथे हजारो लोकांना खोट्या नोकरीच्या आमिषाने नेऊन ऑनलाइन फसवणूक करण्यास भाग पाडले जात असल्याचे संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि अनेक तपासांमध्ये समोर आले आहे. २०२५ मध्ये म्यानमार सैन्याने KK Park वर मोठी कारवाई केली. हजारो लोकांची सुटका झाल्याचे आणि अनेक सायबर स्कॅमची पायाभूत साधने जप्त केल्याचे अधिकृत अहवाल व विविध विश्वसनीय स्रोतांमध्ये नमूद आहे. त्या ठिकाणी अडकलेले अनेक भारतीय नागरिक भारतात परत आणण्यात आले. अनेकांना नोकरीच्या खोट्या जाहिराती दाखवून तिथे नेण्यात आले होते आणि त्यांना जबरदस्तीने "Pig Butchering" प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीत काम करायला लावले जात होते. त्यांना पकडून भारतात सोडण्यासाठी भारतीय विमानांद्वारे त्यांची पाठवणी करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. केके पार्कवर म्यानमार सैन्याने आंतरराष्ट्रीय दबावामुळे छापा टाकला. त्यानंतर त्यातील जगभरात सायबर गुन्हे आणि फोन कॉल करणारे हजारो "गुलाम" मुक्त झाले. त्यातील शेकडो भारतीय सायबर क्रिमिनल गुलामांना भारतीय वायुसेनेच्या विमानांनी भारतात परत आणले. मात्र हे लोक "सायबर क्रिमिनल" होते का? इथेच सर्वात मोठा गैरसमज आहे. हे सर्वजण गुन्हेगार नव्हते. मोठ्या संख्येने लोक दुबई, थायलंड, मलेशिया इत्यादी देशांतील आकर्षक नोकरीच्या जाहिरातींना बळी पडले, त्यांचे पासपोर्ट काढून घेण्यात आले आणि मारहाण, छळ व धमक्या देऊन ऑनलाइन फसवणूक करण्यास भाग पाडले गेले. म्हणून त्यांना "सायबर क्रिमिनल" म्हणण्यापेक्षा "सायबर गुलाम" किंवा "मानवी तस्करीचे बळी" म्हणणे अधिक अचूक आहे. "सायबर फसवणूक करणारे सर्वच लोक स्वेच्छेने गुन्हेगार नसतात. अनेकांना परदेशात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून म्यानमारमधील स्कॅम सेंटरमध्ये नेले जाते. त्यांचे पासपोर्ट काढून घेऊन त्यांना धमकावून ऑनलाइन फसवणूक करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे कोणतीही परदेशातील नोकरी स्वीकारण्यापूर्वी तिची खातरजमा करा. आकर्षक पगाराच्या ऑनलाइन जाहिरातींना लगेच बळी पडू नका." म्यानमारचे 'KK Park': जगातील सर्वात मोठ्या सायबर गुलामगिरीचा अड्डा मानला जातो. सायबर फसवणुकीचे फोन, WhatsApp मेसेज, गुंतवणुकीच्या ऑफर्स किंवा ऑनलाइन प्रेमसंबंधातून होणाऱ्या फसवणुकीमागे नेहमीच एखादा स्वेच्छेने काम करणारा गुन्हेगार असतोच असे नाही. अनेकदा या फसवणुकीमागे मानवी तस्करीचा एक भीषण चेहरा लपलेला असतो. म्यानमारमधील KK Park हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण मानले जाते. थायलंड-म्यानमार सीमेवरील या भागात हजारो युवकांना भारतासह अनेक देशांतून "उच्च पगाराची परदेशातील नोकरी" देण्याचे आमिष दाखवून आणले जाते. एकदा ते तिथे पोहोचले की त्यांचे पासपोर्ट काढून घेतले जातात, बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद केले जातात आणि त्यांना अक्षरशः कैद्यांसारखे ठेवले जाते. यानंतर त्यांना ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. बनावट सोशल मीडिया प्रोफाइल तयार करणे, प्रेमाच्या जाळ्यात अडकवणे, शेअर मार्केट किंवा क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवणे, बनावट वेबसाइट तयार करणे आणि जगभरातील लोकांना करोडो रुपयांचा गंडा घालणे – हेच त्यांचे रोजचे काम असते. काम करण्यास नकार दिल्यास मारहाण, उपाशी ठेवणे, विजेचे धक्के देणे अशा अमानुष शिक्षाही दिल्या जातात. या प्रकाराला जगभरात "Pig Butchering Scam" असे नाव दिले गेले आहे. यात फसवणूक करणारे आधी व्यक्तीचा विश्वास जिंकतात, मैत्री किंवा प्रेमाचे नाते निर्माण करतात आणि नंतर मोठ्या गुंतवणुकीच्या नावाखाली तिची आयुष्यभराची कमाई लुबाडतात. आंतरराष्ट्रीय दबावानंतर म्यानमारमधील अधिकाऱ्यांनी अशा अनेक स्कॅम केंद्रांवर कारवाई केली. हजारो लोकांची सुटका करण्यात आली, त्यामध्ये शेकडो भारतीय युवकांचाही समावेश होता. त्यांना भारतात सुरक्षित परत आणण्यात आले. चौकशीत अनेकांनी सांगितले की ते स्वतःही मानवी तस्करीचे बळी होते आणि त्यांना जबरदस्तीने सायबर फसवणूक करण्यास भाग पाडले जात होते. डॉ. डीडी क्लास: या संपूर्ण घटनेतून एक महत्त्वाचा धडा मिळतो—परदेशात मोठा पगार, मोफत व्हिसा, तातडीची नोकरी किंवा सोशल मीडियावरून आलेल्या आकर्षक ऑफर्स यांची खातरजमा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका. अशा आमिषांमागे मानवी तस्करीचे जाळेही असू शकते. सायबर गुन्हे हे आता केवळ संगणक किंवा मोबाईलपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. त्यामागे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्या, मानवी तस्करी आणि आधुनिक गुलामगिरीचे जाळे कार्यरत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे, संशयास्पद नोकरीच्या ऑफर्स टाळणे आणि कोणताही ऑनलाइन आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी खातरजमा करणे हीच आजची सर्वात मोठी गरज आहे. "सायबर गुन्हेगारांपासूनच नव्हे, तर सायबर गुलामगिरीपासूनही स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचवा. जागरूक राहा... सुरक्षित राहा." ⓒ डॉ. धनंजय देशपांडे (dd) - Cyber Security Consultant - 3 Times National Award winner - 3 Times State Award winner - HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State ( अतिथी स्तंभ लेखक- अमृत महाराष्ट्र )
या प्रचंड उद्योगांच्या मागील तपशील ओपन मॅगझिनने विस्ताराने छापले आहेत! (ICRR Cyber Crime) https://openthemagazine.com/world/the-pig-butchers-of-kk-park
• सायबर सुरक्षा विषयी डॉ. देशपांडे यांचा अमृत महाराष्ट्रमधील आधीचा लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा- https://amrutmaharashtra.org/news.php?id=2007
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment