सायबर सुरक्षेविषयी जागरूक करणारा लेख-
सध्याचे युग हे सोशल मीडियाचे आहे. इंटरनेटच्या महाजालामुळे फक्त सोशल मीडियाच नाही तर अनेक गोष्टी ‘ऑनलाईन’ झाल्या आहेत. पैसे देणे, भरणे, नेट बँकिंग, ऑनलाईन शॉपिंग, होम डिलिव्हरी अशा अनेक सुविधा आता सहजपणे उपलब्ध आहेत. यामुळे आर्थिक व्यवहार करणे अगदी जलद झाले आहे, परंतु त्याचबरोबर अशा व्यवहारात जोखीमही तितकीच आहे. या प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग वाईट गोष्टींसाठीसुद्धा होत आहे. अशा वेळी आपण काय खबरदारी घ्यायची? काय काय उपाययोजना करायच्या? अशा अनेक गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे. थोडक्यात आपण ‘इंटरनेट साक्षर’ होणे गरजेचे आहे. यासाठीच अमृत महाराष्ट्राच्या माध्यमातून दर बुधवारी याविषयी एक लेख प्रकाशित होणार आहे. हे लेख डॉ. धनंजय देशपांडे यांच्या माध्यमातून दिले जातील. डॉ. धनंजय देशपांडे हे सायबर सिक्युरिटी आणि एकंदर सोशल मीडिया या विषयातील तज्ज्ञ आहेत. या लेखमालिकेतील हा प्रथम लेख-
हल्ली अनेकांना "सीबीआय"चे नाव घेत ईमेल येत आहेत, ज्यात "तुम्ही तुमच्या अकाउंटचा गैरवापर केला आहे / न्यूडिटी वर्क / चाईल्ड अब्युजिंग / अश्लील व्हिडीओ बनवणे / पाहणे" असे विविध चार्जेसच्या नावाखाली "लीगल नोटीस" पाठवून घाबरवून टाकून जाळ्यात ओढले जात आहे. सर्वसामान्य माणूस अशा नोटिशीला घाबरणे स्वाभाविक आहे. आणि मग नोटिशीत घाबरवले जाते की, या गुन्ह्यासाठी तीन वर्षांपासून ते आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते किंवा अटक होऊ शकते. याबाबत तुमचे काही म्हणणे असल्यास चोवीस तासांच्या आत खालील ईमेलवर उत्तर पाठवा, अन्यथा तुम्हाला अटक निश्चित आहे. आणि मग सामान्य माणूस घाबरून त्यांना रिप्लाय करायला जातो आणि तिथेच फसतो. कारण तिथून भामट्याचा खेळ सुरू होतो; तुम्हाला धमकावत फोनवर घेतले जाते आणि ऑडिओ अथवा व्हिडीओ कॉलद्वारे सतत जणू हिप्नोटाईज केल्यासारखे जागीच खिळवून ठेवून मग आर्थिक लूटमार केली जाते.
तर मंडळीनो.... असाच मेल आमच्या एका मित्राच्या मिसेसना आला. त्यांनी माझ्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांना जे सांगितले तेच इथं सर्वांसाठी सांगतो आहे. सोबतचा त्या मेलचा स्क्रीनशॉट बारकाईने वाचा आणि आता त्याबद्दल तुमचा हा सायबर दोस्त डीडी काय सांगतो ते पहा!
हा ईमेल 100% फेक आहे. घाबरू नका. ही एक कॉमन सायबर स्कॅम/एक्सटॉर्शन ईमेल आहे. CBI किंवा कोणतीही सरकारी एजन्सी अशी नोटीस पाठवत नाही. हे फेक का आहे हे ओळखण्यासाठी मी ५ मोठे पुरावे सांगतो.
१. ईमेल आयडी
indian_bong@rediffmail.com वरून CBI कधीच मेल पाठवत नाही.
खऱ्या सरकारी मेल्स cbi.gov.in किंवा gov.in डोमेनवरून येतात. Rediffmail = पर्सनल मेल.
२. 'To' पत्ता चुकीचा
नोटीस तुम्हाला आली असेल तर 'To' मध्ये तुमचा ईमेल हवा. इथे cybercrime1028@rediffmail.com आहे. म्हणजे हे मास फॉरवर्ड केलेले आहे.
३. भाषा आणि धमकी
“२४ तासात उत्तर द्या नाहीतर कारवाई” - असं यात म्हटलं आहे. तर CBI अशी धमकी देत नाही. खरे समन्स/नोटीस पोस्टाने किंवा पोलिसांमार्फत येतात, त्यावर केस नंबर, FIR नंबर आणि कोर्ट स्टॅम्प असतो.
४. व्याकरण आणि फॉर्मॅट
यात म्हटलं आहे की “you are found guilty of” - तर कोर्टात सिद्ध होण्याआधी CBI कोणालाही guilty ठरवत नाही.
“Penalties range from 3 years to life imprisonment (physical or digital)” - “digital imprisonment” असा प्रकारच नसतो.
५. सही आणि पद
“Executive Officer (CBI)” असं पद CBI मध्ये नसतं. नाव, बॅच नंबर, ऑफिस सील काहीच नाही.
तर आता तुम्ही काय करावं?:
अशा ईमेलला रिप्लाय करू नका - उत्तर दिलंत तर ते पैसे मागतील. कोणतीही लिंक/अटॅचमेंट उघडू नका. रिपोर्ट करा: https://cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा किंवा 1930 या हेल्पलाइनवर कॉल करा. ईमेल ज्यांनी पाठवला त्याला ब्लॉक आणि डिलीट करा. अशा ईमेल्स लोकांना घाबरवून पैसे उकळण्यासाठी पाठवल्या जातात. तुम्ही एकटे नाही आहात - दररोज हजारो लोकांना अशा फेक नोटिशी येतात.
डॉ. डीडी क्लास: आलेला मेल फेक आहे की खरी हे ओळखण्यासाठी वरती बाकी माहिती दिलेली आहेच. आता शेवटी अजून काही हिंट्स देतो. आलेल्या ईमेलचे डोमेन तपासा: सरकारी नोटीस नेहमी .gov.in किंवा .nic.in वरूनच येते. Gmail, Rediffmail, Yahoo = लगेच लाल झेंडा. घाई/धमकी: “२४ तासात उत्तर द्या”, “अटक होईल”, “अकाउंट ब्लॉक” - हे शब्द आले की ९९% स्कॅम आहे हे समजून जा. खरी प्रक्रिया: CBI, पोलिस, कोर्ट कधीच ईमेल/व्हॉट्सॲपवरून समन्स पाठवत नाही. एकतर रजिस्टर पोस्ट किंवा प्रत्यक्ष अधिकारी घरी येतो.
आणि अजून एक म्हणजे तुमचा ईमेल आयडी त्यांच्याकडे गेलाच कसा? हा प्रश्न आता उरत नाही कारण इतक्या ठिकाणी आपण तो दिलेला असतो. तिथून कुठूनतरी तो लीक होतो! असो.
तर मंडळी, नेहमी सांगतो तेच आता सांगतो. तुमच्या ईमेल आयडीचा पासवर्ड नियमितपणे बदलत राहा. आळस करू नका. तसेच ईमेल अकाउंटसाठी Two-step verification ही प्रोसेस पूर्ण करून अकाउंट अधिक सुरक्षित ठेवा. (हे कसे करायचे ते टेक्नोसॅव्ही लोकांना माहित असतेच म्हणून इथं सांगत नाही. मात्र ज्यांना माहित नाही त्यांनी AI अथवा गुगलला जरी विचारलं तरी स्टेप बाय स्टेप प्रोसिजर कळून जाईल!)
सावध राहा.... इतरांनाही ही पोस्ट पाठवून सावध करा!
Ⓒ डॉ. धनंजय देशपांडे (dd)
- Cyber Security Consultant
- 3 Times National Award winner
- 3 Times State Award winner
- HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State
Comments 1 Comments
Sharad Godbole
अमृत महाराष्ट्र ने सिनीयर लोकांसाठी उपयुक्त उपक्रम चालू केल्याबद्दल धन्यवाद
Write a Comment