बाप: एका अथांग समुद्राचे नाव
पितृ देवो भव: बापाच्या अथांग अस्तित्वाची ओळख जय जय राम कृष्ण हरी..!! आपल्या संस्कृतीत जे जे श्रेष्ठ आहे, त्यांना पितृस्थानी स्वीकारण्याची परंपरा आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली भगवद्गीतेला ‘बाप ग्रंथ’ असे माउलीच्या प्रेमाने संबोधतात. वारकरी संप्रदायातही श्री विठ्ठलाला पितृस्थानी मानले गेले आहे. आपल्या शास्त्रांमध्ये पाच जणांना पितृस्थानी ठरवले आहे: जन्मदाता, भयत्राता, विद्यादाता, उपनयन करणारा आणि पालनपोषण करणारा.
जीवाचे रान करून स्वतःची पर्वा न करता मुलांच्या भवितव्याचा विचार करणे हा बापाचा स्वभाव असतो. पण दुर्दैवाने, आज त्याच बापाला उपेक्षित आयुष्य जगावे लागत आहे. परीक्षेत जास्त गुण मिळवणाऱ्या हुशार मुलाचे कौतुक होते, त्याचा फोटो वर्तमानपत्रात येतो; पण त्या मुलाला घडवण्यासाठी रात्रीचा दिवस करणारा बाप दुर्लक्षितच राहतो. अलीकडे चित्रपट आणि नाटकांतून बापाची प्रतिमा अनेकदा रागीट, व्यसनी, तापट किंवा रंगेल अशी दाखवली जाते. काही अपवाद असतीलही, पण सर्वच बाप असे असतात का?
घराचे मांगल्य म्हणजे आई, तर घराचे अस्तित्व म्हणजे बाप! आई नसणाऱ्या मुलाला पोरके म्हणण्याची सवय जगाला आहे, पण खरं तर बाप नसल्यावर येणारे पोरकेपण तितकेच भीषण असते. आई थोर आहेच, यात शंका नाही, पण बापाला कधीही कमी लेखू नये. घरात मुलांना आणि इतरांना काय हवे-नको ते करून देणारी आई सर्वांना दिसते; पण ते सर्व आणून देण्यासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावणारा बाप कोणाच्या सहज लक्षात येत नाही.
आईकडे अश्रूंचे पाट असतात, पण बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते; मात्र दुःखाच्या प्रसंगी सर्वांचे सांत्वन बापालाच करावे लागते. रडण्यापेक्षा सांत्वन करणाऱ्याच्या मनावर कितीतरी पटीने जास्त ताण असतो. ज्योतीपेक्षा समई जास्त तापते, पण कौतुक मात्र ज्योतीचेच होते. झेंडा फडकताना सर्वांना दिसतो, पण तो उंच फडकत राहावा म्हणून काठीला किती श्रम पडतात, हे कोणी पाहत नाही. आई रोजच्या जेवणाची सोय करते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बापच असतो. आई सर्वांसमोर मोकळेपणाने रडू शकते, पण रात्रीच्या अंधारात उशीत तोंड खुपसून अश्रू ढाळणारा बाप कोणाला दिसत नाही. स्वतःचा बाप वारला, आई वारली, किंवा पत्नी अर्ध्यावर सोडून गेली, तरी घरातील लहान लेकरांना आणि भावंडांना आधार देण्यासाठी बापाला स्वतःचे अश्रू आवरावेच लागतात.
जिजाऊंनी शिवराय घडवले हे निश्चित, पण शहाजीराजांची ओढाताणही विसरता येणार नाही. देवकीने जन्म दिलेल्या कृष्णाला अंधाऱ्या रात्री यमुनेच्या महापुरातून गोकुळात नेणारा वसुदेव पाहिला की कळते, लेकरासाठी बापाला काय काय करावे लागते. राम कौशल्याचा पुत्र होता, पण रामाच्या वनवासाच्या वियोगाने तडफडून प्राण सोडणारा दशरथ एक बापच होता.
मुलांना चांगले कपडे मिळावेत म्हणून स्वतः फाटकी कपडे आणि तुटकी चप्पल वापरणारा बाप, दाढीचा साबण संपला तरी आंघोळीच्या साबणाने काम भागवणारा बाप लेकरांसाठीच धडपडत असतो. मुले सलूनमध्ये आणि मुली ब्यूटी पार्लरमध्ये जातात, त्याचा खर्चही बापच करतो. स्वतः आजारी पडला तरी तो लगेच दवाखान्यात जात नाही; कारण 'डॉक्टरांनी आराम करायला सांगितला तर घराचे काय होईल?' ही काळजी त्याला सतावत असते.
पोरांचे शिक्षण, मुलीचे लग्न यासाठी तो सतत ओढाताण करत असतो. आपली मुले डॉक्टर-इंजिनिअर व्हावीत म्हणून कर्ज काढून, प्रसंगी मजुरी करून तो पैसे पाठवतो. पण सर्वच मुले ही तळमळ समजतात का? काही मुले बापाने पाठवलेल्या पैशांनी मित्रांना पार्ट्या देतात आणि पैसे पाठवणाऱ्या बापाचीच टिंगल करतात.
परीक्षेचा निकाल लागल्यावर सर्वजण आईजवळ जातात, ती कौतुक करते. बापालाही ते सर्व करावेसे वाटते, पण त्याला आपले भाव गुदमरून ठेवावे लागतात. तरीही हळूच खिशातून पेढ्याचा पुडा काढून देणारा बापच असतो. बाळंतपणाच्या वेळी आत स्त्री वेदना सहन करत असते, पण बाहेर अस्वस्थपणे येरझारा घालत, बायको आणि बाळ सुखरूप राहावे म्हणून देवाला साकडं घालणारा बाप किती बेचैन असतो, हे कोणाच्या लक्षात येत नाही.
ठेच लागली की तोंडातून "आई गं!" असा शब्द निघतो; पण पाठीमागून अचानक गाडीचा ब्रेक वाजला किंवा मोठे संकट आले की "बाप रे!" असाच उद्गार निघतो. छोट्या संकटात आई आठवते, पण मोठे वादळ पेलताना बापच आठवतो! घरावर बापाचे छत्र असेल, तो काही करत नसला तरी त्याच्या पदाचा एक वेगळाच दबदबा असतो.
बापाला फक्त एकच हवे असते—आपली मुले आपल्या देखत स्वावलंबी व्हावीत, त्यांनी पायावर ताठ उभे राहावे. जेव्हा एखादा मुलगा बापाची ही इच्छा समजून घरासाठी झटू लागतो, तेव्हा बापाला कृतकृत्य झाल्याचा आनंद होतो. बापाचे मोल खऱ्या अर्थाने त्यालाच कळते, ज्याचा बाप पाठीशी उरलेला नाही. प्रत्येक वस्तूसाठी तरसावे लागते आणि सर्व जबाबदारी अंगावर पडते, तेव्हा मनातून एकच आवाज येतो—"आज माझा बाप असता तर...!"
विशेषतः मुलगी बापाला खूप छान समजून घेते. सासरी असलेली मुलगी फोनवर बापाचा बदललेला आवाज एका क्षणात ओळखते—"बाबा, तब्येत बर नाही का? काळजी घेत जा..." असे प्रेम फक्त मुलगीच दाखवू शकते. बापाच्या समाधानासाठी स्वतःची इच्छा बाजूला ठेवून लग्नाच्या मंडपात उभी राहणारी मुलगी बापाला जपते. मुलांनीही बापाला असेच समजून घ्यावे आणि जपावे, हीच प्रत्येक बापाची किमान अपेक्षा असते. आपल्या संपूर्ण आयुष्याचा त्याग करून मुलांच्या, सुनांच्या आणि नातवंडांच्या सुखाची अपेक्षा करणाऱ्या या बापाची इच्छा आपण सर्वांनी पूर्ण केली पाहिजे. पुंडलिकाप्रमाणे आई-वडिलांची सेवा करून 'पितृ देवो भव' हे वचन सार्थ करूया.
तुकाराम महाराज म्हणतात: तुका म्हणे पाप... माय नावडे जया बाप..!! बापाच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांना सन्मान देणे, हेच आपले आद्य कर्तव्य आहे! लेखन:- हभप श्री. जगताप महाराज वलांडीकर
Comments 1 Comments
Baburao Jambhale
खूपच सुंदर आणि भावूक लेख! बापाचा त्याग आणि कष्टाची जाणीव करून देणारे शब्द मनाला भिडले. मनापासून आभार!"
Write a Comment