संस्कृत सप्ताह लेख क्र. - ४
आजची पिढी वेगळी आहे. तिचे शिकण्याचे माध्यम वेगळे आहे, संवादाची भाषा वेगळी आहे आणि जगाकडे पाहण्याची दृष्टीही वेगळी आहे. ती प्रश्न विचारते, प्रयोग करते, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करते आणि माहिती क्षणात जगभरातून मिळवते.
मग या नव्या पिढीपर्यंत संस्कृत पोहोचवायची असेल तर एक प्रश्न आपण प्रामाणिकपणे विचारला पाहिजे—संस्कृत आपण ज्या पद्धतीने शिकवतो, ती पद्धत आजच्या विद्यार्थ्याला किती जवळची आहे?
संस्कृत कठीण आहे, जुनी आहे, केवळ परीक्षेसाठी आहे किंवा केवळ धार्मिक संदर्भात उपयोगी आहे—अशा काही गैरसमजुती आजही आढळतात. या प्रतिमेला बदलण्याची गरज आहे.
संस्कृत शिकणे आनंददायी, आधुनिक आणि सर्जनशील अनुभव बनवायला हवा.
आजचा विद्यार्थी reels पाहतो; मग संस्कृतचे reels का निर्माण होऊ नयेत? तो podcasts ऐकतो; मग संस्कृत podcasts का नसावेत? तो games खेळतो; मग संस्कृत शब्दसंपदेवर आधारित games का तयार होऊ नयेत?
संस्कृत कथा animationच्या माध्यमातून सांगता येतील. कालिदासाची पात्रे डिजिटल storytellingमधून विद्यार्थ्यांपर्यंत नेता येतील. संस्कृत सुभाषितांचे short videos तयार करता येतील. विद्यार्थ्यांनी स्वतः संस्कृतमध्ये content निर्माण करावा, अशी स्पर्धा घेता येईल.
‘संस्कृतमध्ये माझी ओळख’, ‘माझे गाव संस्कृतमध्ये’, ‘माझा आवडता वैज्ञानिक’, ‘माझे स्वप्न’, ‘माझी कविता’ अशा विषयांवर विद्यार्थ्यांना संस्कृतमध्ये अभिव्यक्त होण्याची संधी देता येईल.
संस्कृत शिकवताना केवळ भाषेची रचना न शिकवता तिच्यामागची विचारपरंपरा विद्यार्थ्यांना अनुभवता आली पाहिजे. योग, आयुर्वेद, पर्यावरण, गणित, खगोलशास्त्र, नाट्य, काव्य, तत्त्वज्ञान अशा विविध ज्ञानशाखांशी संस्कृतचा संबंध त्यांना दाखवता आला तर विषय अधिक अर्थपूर्ण बनेल.
याहून महत्त्वाचे म्हणजे संस्कृत आणि career यांचा संबंध नव्याने स्पष्ट करण्याची गरज आहे.
आज संस्कृतच्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापन आणि संशोधनाबरोबरच भाषांतर, publishing, content creation, tourism, yoga, Ayurveda, cultural studies, Indian Knowledge Systems, digital humanities, computational linguistics आणि AI यांसारखी क्षेत्रे उपलब्ध आहेत.
‘संस्कृत शिकल्यावर पुढे काय?’ या प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे असले पाहिजे.
महाराष्ट्रात संस्कृत विद्यार्थ्यांसाठी career guidance cells, internship programmes, translation projects, digital content labs आणि interdisciplinary courses निर्माण करता येतील.
‘एक विद्यार्थी—एक संस्कृत कौशल्य’ अशी संकल्पनाही राबविता येईल. एखाद्याला संभाषण, एखाद्याला भाषांतर, एखाद्याला काव्य, एखाद्याला निवेदन, एखाद्याला डिजिटल content creation—अशा विविध कौशल्यांशी संस्कृत जोडता येईल.
संस्कृत ही केवळ संस्कारांची भाषा आहे, हे अर्धसत्य आहे. ती सर्जनशीलतेची, ज्ञानाची आणि भविष्यातील नव्या संधींची भाषाही होऊ शकते.
नव्या पिढीला संस्कृत सांगताना आपण केवळ ‘ही आपली प्राचीन भाषा आहे’ असे म्हणू नये. त्याऐवजी असे म्हणायला हवे—
‘ही तुमचीही भाषा आहे; तुम्ही तिला तुमच्या काळानुसार नवे रूप देऊ शकता.’
जेव्हा तरुणाई संस्कृतकडे वारशाच्या नजरेनेच नव्हे, तर शक्यतांच्या नजरेने पाहू लागेल, तेव्हा संस्कृतचा खरा भविष्यप्रवास सुरू होईल.
संस्कृतला पुस्तकातून बाहेर काढून जीवनात, प्रयोगशाळेत, डिजिटल विश्वात आणि Careerच्या नव्या वाटांवर नेणे—हीच आजच्या पिढीसमोरची आपली सर्वांत मोठी जबाबदारी आहे.
- डॉ.मंजूषा कुलकर्णी
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखिका
संस्कृत विदुषी
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment