महायोद्धा : बाजीराव पेशवे (पूर्वार्ध) - अमृत महाराष्ट्र

महायोद्धा : बाजीराव पेशवे (पूर्वार्ध)

पेशवाईवरील लेखमालेतील चौदावा लेख...

महायोद्धा : बाजीराव पेशवे (पूर्वार्ध) मुख्य फोटो
मुख्य फोटो

या लेखमालिकेतील लेखांमध्ये आपण पेशवे घराण्यातील अनेक कर्तृत्ववान पेशव्यांचा परिचय करून घेतला. ऐतिहासिक लढायांचे अवलोकन केले. पेशवेकालीन महाराष्ट्र जाणून घेतला. लेखमालिकेच्या या शेवटच्या टप्प्यात आपण पेशवे घराण्यातील अजेय योद्ध्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तो योद्धा म्हणजे बाजीराव पेशवे. सेनापती म्हणून आणि शासनकर्ता म्हणून त्यांची गुणवैशिष्ट्ये सांगणाऱ्या लेखाचा हा पूर्वार्ध...

नर्मदेपलीकडे जाऊन उत्तर दिग्विजय करणारा वीर म्हणून पहिल्या बाजीराव पेशव्यांचे नाव आदराने घ्यावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया रचला आणि बाजीरावांनी त्यावर कळस चढवला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दक्षिणेतील श्रीरंगपट्टणपासून संपूर्ण मध्य आणि उत्तर भारत बाजीरावांनी मराठ्यांच्या घोड्यांच्या टाचेखाली आणला. रजपूत राजांपासून मुस्लिम नबाब आणि शाह्यांना या बाजीरावांनी नमवले आणि मराठी जरीपटका डौलात उत्तर हिंदुस्थानात फडकवला.

बाजीरावांचा जन्म भाद्रपद पौर्णिमा शके १६२२ अर्थात १८ ऑगस्ट १७०० रोजी झाला. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ हे बाजीरावांचे वडील. वडिलांच्या सान्निध्यात बाजीराव बरेच काही शिकले. बाळाजी विश्वनाथ दिल्लीच्या बादशहाची भेट घ्यायला गेले, तेव्हा १९ वर्षांचे बाजीरावही त्यांच्याबरोबर होते. उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेला हातपाय पसरायच्या शक्यता किती आहेत, याचा अदमास त्या कोवळ्या वयातच बाजीरावांनी घेतला होता. दुर्दैवाने त्यानंतर लगेचच बाळाजी विश्वनाथांचा मृत्यू झाला नि पेशवेपदाची सूत्रे बाजीरावांच्या हातात आली; पण हे इतके सहज घडले नाही. 

शाहू महाराजांच्या दरबारी मंडळींचा बाजीरावांना विरोध होता. छत्रपती शाहूंनी त्यांचे न ऐकता बाजीरावांकडे या पदाचे शिक्के नि कट्यार सोपवली. शाहूंचा हा निर्णय बाजीरावांनीही सार्थ ठरवला. बाजीराव पेशवे यांच्या वेळी परिस्थिती पालटलेली होती. स्वराज्याच्या सीमा वाढल्यामुळे मुघल सह्याद्रीच्या डोंगराळ भागातून महाराष्ट्र, मध्य प्रदेशच्या सपाट भागापर्यंत राज्य पोहोचले होते. त्यामुळे या भागात गनिमी कावा वापरणे कठीण होते. म्हणून बाजीराव पेशव्यांनी तेथे घोडदळाचा वापर करून शत्रूला पराभूत केले. बाजीराव पेशवे हे अतिशय युद्धकुशल सेनापती होते. ते युद्धाचे अपारंपरिक डावपेच वापरत होते. व्यक्तींमधील गुण हेरण्याचे कौशल्य त्यांच्याकडे भरपूर होते. म्हणूनच त्यांनी त्यांच्या हाताखाली शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले आणि इतर अनेक सरदारांना सिद्ध केले. 

बाजीरावांनी युद्धाचे पहिले प्रशिक्षण वडील बाळाजी विश्वनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले. अगदी लहानपणापासून त्यांनी युद्धामध्ये सहभाग आणि युद्धभूमीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. युद्धकाळात ते सैनिकांसमवेतच उघड्यावर राहायचे. त्यांच्याप्रमाणेच जेवण आणि इतर दैनंदिनी ठेवायचे. त्यामुळे सैनिकांचे त्याच्यावर अपार प्रेम होते. प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी आघाडीवर राहून, इतर सैनिकांप्रमाणे धोके पत्करून ते नेतृत्व करायचे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक लढाईत त्यांना प्रचंड यश मिळायचे. कारण जीवन-मरणाच्या रेषेवर नेतृत्व करण्याची एकच पद्धत आहे, ती म्हणजे सैनिकांच्या आघाडीवर राहून नेतृत्व करणे होय. ती बाजीराव पेशवे यांनी प्रत्यक्षात आणली होती.

बाजीरावांच्या वीस वर्षांच्या पेशवेपदाच्या कारकीर्दीत त्यांनी अतुलनीय पराक्रम केला. बाजीरावांच्या लढायांची आजच्या भाषेत टाइमलाइन पाहिली तर त्यांचे युद्धकौशल्य कसे अतुलनीय होते, ते लक्षात येईल. बाजीरावांनी त्यांच्या आयुष्याच्या चौदाव्या वर्षी पहिले युद्ध बघितले. त्यांनी पिलाजी जाधवांच्या हाताखाली युद्धकलेचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत ते शाहू महाराजांच्या दरबारात मुतालिक म्हणून कार्यरत होते. तिथे त्यांनी दरबाराचे कामकाज, निर्णय घेण्याची पद्धत, येणाऱ्या लोकांशी चर्चा करणे हे सगळे अगदी जवळून बघितले. १७१८-१९मध्ये मराठ्यांची मोठी मोहीम दिल्लीत झाली, तेव्हा त्यांची मुतालकी काढून घेऊन त्यांना सेनापतिपद मिळाले. १७२० च्या एप्रिल महिन्यात त्यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली. १७२१-२२मध्ये त्यांची पहिली मोहीम कोकणात होती. ती पोर्तुगीजांसोबतची मोहीम त्यांनी आंग्रे यांच्यासोबत केली. त्यात वर्सोलीचा तह झाला. बाजीरावांनी १७२२ ते २४ अशी तीन वर्षे माळव्यात मोहीम होती. त्यांनी माळव्याचा बराचसा भाग जिंकून घेण्यास सुरुवात केली. १७२४मध्ये धारचे ठाणे जिंकले. त्यानंतर १७२५ ते २७ च्या सुमारास दक्षिणेकडे मोहिमा केल्या. श्रीरंगपट्टण आणि चित्रदुर्ग या ठिकाणी लढाया झाल्या. १७२७-२८मध्ये पालखेडची लढाई झाली. पालखेडच्या या प्रसिद्ध लढाईनंतर दिल्लीचा बादशहा, पोर्तुगीज, निजाम, सिद्दी व इतर विरोधकांना बाजीरावांच्या युद्धकौशल्याचा पुरेपूर अंदाज आला. त्यांना समजले, की बाजीरावांना हरवणे सोपे नाही. पालखेडच्या लढाईवेळी बाजीरावांचे वय होते अंदाजे २७ वर्षे आणि निजामाचे वय होते ५७ वर्षे. निजाम म्हणजे औरंगजेबाइतकाच क्रूर शासक होता. त्याला नमवणे अवघड होते. पालखेड लढाईतील निजामाच्या पराभवाने बाजीरावांचे कर्तृत्व दिल्लीपर्यंत पोहोचले. यापुढे १७२८मध्येच आणखी दोन मोहिमा झाल्या. त्यातील एका लढाईचे नेतृत्व स्वत: बाजीरावांनी तर दुसऱ्या लढाईचे नेतृत्व चिमाजीअप्पांनी केले. १७३१-३२मध्ये डभईची मोहीम झाली. त्याच सुमारास चिमाजीअप्पा यांनी माळव्याची मोहीम केली. १७३३ ते ३६मध्ये जंजिरा मोहीम झाली. १७३६-३७मध्ये अटेरची मोहीम झाली. 

बाजीरावांच्या जबरदस्त इच्छाशक्तीचे उदाहरण म्हणजे अटेरची मोहीम. सादतखान नावाचा अयोध्येचा नवाब होता. त्याने दिल्लीच्या बादशहाला अशी खबर दिली, की 'मी बाजीरावाला रेवा अर्थात नर्मदा नदी पार करू देणार नाही.' वास्तविक या सादतखानने असे कोणतेही कृत्य केलेले नव्हते. बाजीराव अटेरच्या किल्ल्यावर असताना त्यांच्याविषयी हे उगीचच केलेले भाष्य बाजीरावांना समजल्यावर ते चिडले आणि त्यांनी खरोखर दिल्लीपर्यंत मजल मारली. नंतर १७३७-३८मध्ये भोपाळची मोहीम झाली. १७३९-४०मध्ये नासीरजंगाशी युद्ध झाले. १७४१मध्ये नादिरशहा दिल्लीवर चालून आल्याची खबर बाजीरावांना मिळाली; मात्र यासाठी कूच करण्याआधी त्यांचे निधन झाले.

अशा प्रकारे त्यांनी स्वत: नेतृत्व केलेल्या २३ लढाया आणि त्यांच्या काळात झालेल्या एकूण ४१ लढाया, यांपैकी एकही लढाई ते हरले नाहीत. लढाईत शंभर टक्के यश मिळवणारा आणि एकही लढाई न हरलेला हा एकमेव वीर आहे. ते स्वतः घोड्यावर बसून सैन्याचे नेतृत्व करायचे. त्यांचे सैन्य घोडदळावर अधिक प्रमाणात अवलंबून होते. मुघलांचे सैन्य युद्धांच्या वेळी त्यांच्यासह कुटुंबातील सदस्य, बायका-मुले यांनाही घेऊन जायचे. त्यामुळे हे सैनिक एका दिवसात १० ते १२ किलोमीटरच पुढे जायचे. त्यांची हालचाल अतिशय मंद असे; मात्र बाजीराव यांच्या सैन्याचा पुढे जाण्याचा वेग मुघलांच्या चौपट होता. ते एक दिवसात ४० ते ५० किलोमीटर एवढे अंतर पार करायचे. याचे कारण म्हणजे त्यांच्यासमवेत युद्धसामग्रीव्यतिरिक्त फारसे साहित्य नसायचे. प्रत्येक सैनिकाकडे भाला किंवा तलवार आणि एक-दोन दिवस पुरेल एवढे धान्य असायचे. इतर वेळी आजूबाजूला मिळेल ते धान्य वापरून सैनिक जीवन जगत असत. त्यामुळे त्यांना गतिमान हालचाली करणे शक्य होत असे. बाजीरावांचे सैन्य छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून युद्धभूमीवर एकत्र यायचे. याला इंग्रजीमध्ये ‘Concentration at the point of decision’ (निर्णयाच्या एका टप्प्यावर एकाग्रता साधणे) असे म्हटले जाते. शेवटच्या क्षणी एकत्र आल्यामुळे शत्रूला त्यांच्याविरुद्ध कारवाई करणे शक्य व्हायचे नाही. तसेच शत्रूला स्वतःचा पाठलाग करायला लावून बाजीराव त्यांना थकवायचे आणि शेवटी शत्रूला अशा भागात यायला भाग पाडायचे, जिथे शत्रूवर तीन-चार ठिकाणांहून आक्रमण करणे सोपे व्हायचे. 

बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल याच्यावर दिल्लीच्या बादशहाचा वजीर फरीदाबादचा बंगश पठाण याने हल्ला चढवून त्याला कैद करून ठेवले. छत्रसालाने बाजीरावांना पत्र लिहून "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा 'गजान्तमोक्षाचा' हवाला देऊन मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर लगोलग ३५-४० हजारांची फौज घेऊन खुद्द बाजीराव मोहम्मद खान बंगशवर चालून गेले. ही हालचाल इतकी त्वरेने केली, की बाजीराव येऊन धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगशला काहीच समजले नाही. बेसावध बंगश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंझावातापुढे मुघल हैराण झाले. 'ए कन्साईज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर' या युद्धशास्त्रावर आधारित ग्रंथात फिल्ड मार्शल मॉंटगोमरी यांनी जगातील सात लढायांचा उल्लेख केला आहे. त्यात पालखेड (वैजापूर-औरंगाबादजवळ) येथील लढाईचा उल्लेख आहे. या लढाईत बाजीरावांनी निजामाला पाणी पाजले. या लढाईत अतिशय वेगवान हालचाल करून त्यांनी निर्णय घेतले आणि निजामाला दाती तृण धरायला लावले. याशिवाय नादिरशहाला पराभूत केले ती लढाईसुद्धा त्यांच्या अद्वितीय पराक्रमाची साक्ष देणारी आहे. 

१७३९मध्ये नादिरशहाने दिल्ली लुटली. बाजीरावांनी त्यांना चंबळच्या खोर्‍यात आणले आणि चक्क लढाई न करताच शत्रूचे सैन्य परत गेले. बाजीरावांकडे योजना आखण्याची बुद्धी होती आणि तिची अंमलबजावणी करण्यासाठी हात होते, हे इंग्रज इतिहासकार ग्रॅंट डफनेही लिहून ठेवले आहे. पुण्याचा शनिवारवाडाही बाजीरावांनीच बांधला. पुण्यातून हललेले मराठी सत्तेचे केंद्र त्यांनीच कोल्हापुरातून आणून पुण्यात वसवले. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंगविरुद्ध जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून मध्य प्रदेशातील खांडवा- इंदूर मार्गावर असलेल्या सनावदजवळ नर्मदा नदीच्या किनारी रावेरखेडी येथे २८ एप्रिल १७४० रोजी (वैशाख शुद्ध त्रयोदशी शके १६६२) रोजी पहाटे या महापराक्रमी वीराचे विषमज्वराने निधन झाले. मृत्यूवेळी ते अवघ्या चाळीस वर्षांचे होते.

(क्रमश:)

(संदर्भ : इतिहासतज्ज्ञ कौस्तुभ कस्तुरे यांची ‘वैचारिक किडा’ या पॉडकास्टवरील मुलाखत आणि इतर संकलित माहिती)

(या लेखमालेतील आधीचे लेख खालील लिंकवर वाचता येतील.)

१. पानिपतची लढाई म्हणजे शौर्याचे प्रतीक... पराभवाची गाथा नव्हे!

२. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - पूर्वार्ध

३. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - उत्तरार्ध

४. मराठेशाहीचे स्वातंत्र्ययुद्ध आणि पेशवाईचा उदय

५. पेशवेकालीन महाराष्ट्र - भाग १ 

६. पेशवेकालीन महाराष्ट्र - भाग २

७. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ

८. पराक्रमी आणि मुत्सद्दी नानासाहेब पेशवे

९. पराक्रमी आणि धोरणी चिमाजीअप्पा

१०. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे

११.सवाई माधवराव पेशवे

१२. मुत्सद्दी, समयसूचक आणि शूर सदाशिवरावभाऊ

१३. पेशवे घराण्यातील महिला



Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 15-04-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 634 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 15-04-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 634 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement