मुत्सद्दी, समयसूचक आणि शूर सदाशिवरावभाऊ - अमृत महाराष्ट्र

मुत्सद्दी, समयसूचक आणि शूर सदाशिवरावभाऊ

पेशवाईवरील लेखमालेतील बारावा लेख...

मुत्सद्दी, समयसूचक आणि शूर सदाशिवरावभाऊ मुख्य फोटो
मुख्य फोटो

मागील लेखात आपण सवाई माधवराव पेशवे यांच्याविषयी माहिती जाणून घेतली. या लेखात आपण पेशवे घराण्यातील सदाशिवरावभाऊ या आणखी एका शूरवीर योद्ध्याचा परिचय करून घेऊ. सदाशिवरावभाऊ म्हणजे पहिल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू अनंत बाळाजी भट तथा चिमाजीअप्पा यांचे पुत्र. त्यांचे संपूर्ण नाव सदाशिव अनंत भट. परंतु सदाशिवरावभाऊ म्हणून ते सर्वपरिचित होते. त्यांच्या आईचे नाव रखमाबाई. सदाशिवराव साधारण महिन्याचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे आजी राधाबाईसाहेब आणि काकू अर्थात थोरल्या बाजीरावांच्या पत्नी काशीबाई यांनीच त्यांचे संगोपन केले. पहिल्या बाजीराव पेशव्यांसोबत चिमाजीअप्पा नेहमीच मोहिमेवर असत. त्यामुळे लहानग्या सदशिवाकडे लक्ष द्यायला त्यांना पुरेसा वेळ मिळत नसे. दौलतीचे शिक्षण घेण्यासाठी ते शाहू महाराजांकडे दाखल झाले होते. तलवारबाजीमध्ये ते अतिशय तरबेज होते. २० मार्च १७३६ रोजी त्यांचे मौंजीबंधन झाले, तर २५ जानेवारी १७४० रोजी त्यांचे लग्न फडणवीस घराण्यातील महादजी भानू यांच्या कन्या उमाबाई यांच्याशी झाले. एप्रिल १७४०मध्ये थोरल्या बाजीरावांचे आणि त्यानंतर सातच महिन्यांत म्हणजे डिसेंबर १७४०मध्ये चिमाजीअप्पा यांचे निधन झाले. चिमाजीअप्पा यांच्या द्वितीय पत्नी अन्नपूर्णाबाई सती गेल्या. वयाच्या दहाव्या वर्षी सदाशिवरावभाऊ खऱ्या अर्थाने पोरके झाले.

त्यानंतर दोनच वर्षांनी नानासाहेब पेशवे आणि गोपिकाबाई यांच्या पोटी विश्वासराव यांचा जन्म झाला. पाच डिसेंबर १७४६ रोजी सदाशिवरावभाऊ यांची पहिली मोहीम पिलाजीराव जाधव यांच्या छत्रछायेखाली झाली. या मोहिमेत त्यांनी रतनगड, बिदनापूर आणि बहादूरबेंडा ही ठाणी जिंकून घेतली. सदाशिवरावभाऊ यांचा दक्षिणेतील मोहिमांमधील सहभाग महत्त्वपूर्ण आहे. कृष्णा, तुंगभद्रा या नद्यांमधील ठाणी देशमुखांनी उठवली होती. ती परत घेण्याकरिता ते तिकडे गेले. इ. स. १७४७मध्ये दक्षिणेतील कोप्पळजवळील बहादूरबंदी हा किल्ला त्यांनी घेतला. परशुराम त्रिंबक प्रतिनिधी व त्यांचा मुतालिक यमाजी शिवदेव यांचे बंड मोडण्यासाठी छत्रपती रामराजांना बरोबर घेऊन सदाशिवरावभाऊ सांगोल्याच्या स्वारीवर गेले. तेथील बंड मोडून छत्रपती रामराजांकडून त्यांनी मराठी राज्याची कायमची पूर्ण मुखत्यारी लिहून घेतली. याचदरम्यान सदाशिवरावभाऊ यांच्या प्रथम पत्नीचे निधन झाले. त्यांचा दुसरा विवाह पेणचे सावकार कृष्णराव कोल्हटकर यांची कन्या पार्वतीबाईशी झाला. सदाशिवरावभाऊंनी आपले दिवाण रामचंद्रबाबा शेणवी यांच्या सांगण्यावरून नानासाहेब पेशवे यांच्याकडे दिवाणगिरीची मागणी केली. परंतु महाजीपंत पुरंदरे यांना त्या जागेवरून कमी करण्याचा पेशव्यांचा मानस नसल्याने भाऊंनी कोल्हापूरकरांची पेशवाई स्वीकारली; अर्थात त्या काळी असे वाद होऊ नयेत, भावाभावांत तंटा लागू नये म्हणून महादजीपंत यांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला आणि भाऊ पुण्याच्या पेशव्यांचे दिवाण झाले.

जानेवारी १७५१मध्ये निजामशाहीचा बिमोड करण्यासाठी नानासाहेब पेशवे व सदाशिवरावभाऊ हे दोघेही कर्नाटक मोहिमेवर गेले होते. १७५९पर्यंत त्यांना सातत्याने निजाम व इतर सरदारांशी संघर्ष करावा लागला. निजामाविरुद्ध झालेली उदगीरची लढाई हे सदाशिवरावभाऊ यांचे युद्धकौशल्य अधोरेखित करते. या युद्धात त्यांनी तत्कालीन आधुनिक युद्धप्रणालीचा अवलंब केला होता. तोफखान्याचे महत्त्वसुद्धा त्यांनी ओळखले होते. बुसी या फ्रेंच तोफखान्याचा पराक्रम त्यांना समजल्यावर त्यांनी इब्राहिमखान गारदी यांना आपल्या ताफ्यात घेतले होते. उदगीरच्या या लढाईत तीन फेब्रुवारी १७६० रोजी निजामाचा पराभव झाला. बऱ्हाणपूर, छत्रपती संभाजीनगर, विजापूर यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या उदगीरच्या लढाईत निजाम अलीचा पराभव करून साठ लाख उत्पन्नाचा मुलूख त्यांनी मराठी राज्याला जोडला.

उदगीरच्या लढाईत असताना अब्दालीच्या दिल्लीवरील आक्रमणाची बातमी गोविंदपंत बुंदेले यांनी पुण्यात कळवली होती. अब्दाली ४० हजारांच्या फौजेनिशी दिल्लीवर स्वारी करून येत होता. इकडे निजामाशी सुरू असलेल्या संघर्षामुळे मराठा सैन्य मोठ्या प्रमाणावर गुंतून पडले होते. त्यामुळे तातडीने उत्तरेला जाणे अवघड होते. खरे तर त्याआधी म्हणजे मे १७५२मध्ये दिल्लीच्या बादशहाने अब्दाली व रोहिले यांच्यापासून मराठ्यांनी बादशाहीचे संरक्षण करावे म्हणून मराठ्यांशी करार केला. यामुळेच रघुनाथदादा आणि मराठा फौजा अटक, पेशावरपर्यंत जाऊन अफगाणांचा बंदोबस्त करून आले होते. रघुनाथराव तेथून माघारी फिरताच अब्दाली पुन्हा हिंदुस्थानवर चालून आला. शिंदे व होळकर यांच्या आपापसांतील वैरामुळे अब्दालीने मराठ्यांचा पराभव केला. यामध्ये दिल्लीजवळ बुराडी घाटावर मराठ्यांचे शूर सेनापती दत्ताजी शिंदे यांची हत्या झाली. नजीबखान रोहिल्याने ही हत्या करवली होती. आक्रमणाची ही बातमी महाराष्ट्रात येण्यास महिना लागला. 

निजामाविरुद्धच्या युद्धातील यशामुळे नानासाहेब पेशवे यांनी अब्दालीचा बीमोड करण्यासाठी उत्तर हिंदुस्थानावरच्या मोहिमेस सदाशिवरावभाऊंची रवानगी केली. मराठी सैन्य पटदूर येथे एकत्र आले. तेथूनच १४ मार्च १७६० रोजी मराठी फौजा उत्तरेकडे निघाल्या. भाऊंच्या सैन्यात यात्रेकरू, बाजारबुणगे यांचा भरणा खूप होता. भाऊंनी सर्व सरदारांचे रुसवे काढून सर्वांना कामाला लावले. बुऱ्हाणपूर, भोपाळ, सीरोंज, ओर्छा, नरवर, ग्वाल्हेर या मार्गाने भाऊ दिल्लीकडे निघाले. वाटेत गंभीर नदी ओलांडण्यास भाऊंना खूप दिवस लागले. याच दरम्यान अब्दाली गंगा-यमुनेच्या दुआबात होता. भाऊंना उत्तरेतील संस्थानिकांना आपल्या बाजूने वळवण्यात अपयश आले. यमुनेच्या पाण्याला उतार नसल्याने प्रथम दिल्ली काबीज करून नंतर अब्दालीला कोंडावे असे ठरले. मथुरेत भाऊंना सूरजमल येऊन मिळाला. पुढे मात्र सूरजमलने तटस्थ भूमिका घेतली.

२२ जुलै १७६० रोजी दिल्ली काबीज करून भाऊंनी दिल्लीचा बंदोबस्त नारोशंकर यांच्याकडे सोपवला. यावेळी भाऊंनी अब्दालीचे तहाचे बोलणे धुडकावले. दिल्ली बादशहा शाह आलम याने युद्धाचा निर्णय लागल्याशिवाय दिल्लीत येण्यास नकार दिला. त्यामुळे भाऊंनी अली गोहरचा मुलगा जवानबख्त यास दिल्लीचा युवराज केले. दिल्लीच्या विजयानंतर भाऊंनी आपला मोर्चा दिल्लीपासून उत्तरेला पाऊणशे मैलांवर यमुनेच्या काठी असलेल्या कुंजपुराकडे वळवला. येथून अब्दालीला रसद पुरवठा होत होता. १७ ऑक्टोबर १७६० ला भाऊंनी इब्राहिमखानाकरवी तोफा डागून कुंजपुराचा किल्ला फोडला. तेव्हा कित्येक खंडी गहू मराठ्यांच्या हाती पडला. दत्ताजी शिंदे यांचे मारेकरी अब्दुल समतखान व कुतुबशहा हे कुंजपुरा येथे जिवंत सापडले. त्यांना मारून त्यांची मस्तके भाऊंनी अब्दालीला पाठवून दिली. यामुळे अब्दालीने चिडून जाऊन यमुनापार होण्याची खटपट सुरू केली. भाऊंनी कुंजपुरा घेतले आणि ते ससैन्य कुरुक्षेत्रावर आले. कित्येक दिवस तिथे मुक्काम करून मराठी फौजा दिल्लीच्या रोखाने निघाल्या. याचदरम्यान बागपतजवळ गौरीपुरापासून अब्दाली यमुनापार होऊन दिल्लीच्या वाटेवर येऊन बसला. सदाशिवरावभाऊ अब्दालीवर गणोरपर्यंत चालून गेले. पानिपत गाव पाठीशी ठेवून भाऊंनी अब्दालीशी झुंज देण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबर मध्यापासून ते जानेवारीपर्यंत हे युद्ध झाले.

पुढील सर्व पानिपतची लढाई आपण जाणतोच. त्या लढाईत मराठा सैन्य हरले असले, तरी त्यांची जरब अब्दालीलासुद्धा जाणवली. मराठ्यांव्यतिरिक्त इतका कडवा प्रतिकार हिंदुस्थानातील कोणतीही फौज करू शकली नसती, हे खुद्द अब्दालीने एका पत्रात कबूल केले होते. पानिपतच्या लढाईत विश्वासराव आणि सदाशिवरावभाऊ हे दोघेही धारातीर्थी पडले. त्यांचे अंत्यसंस्कार तिथेच करण्यात आले होते. परंतु सदाशिवरावभाऊ हे अचानक युद्धक्षेत्रातून गायब झाले, असाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो. एक उल्लेख असाही आढळतो, की ते त्यांच्या घोड्यावरच बेशुद्ध पडले. तो घोडा त्यांना तशाच अवस्थेत घेऊन रोहतक-हरियाणापासून २५ किलोमीटर दूर सांघी या गावी घेऊन गेला. तेथील लोकांनी त्यांना आश्रय दिला. त्यांनी तिथेच वास्तव्य केले, इतकेच नाही तर एकदा त्या गावावर काही लुटारूंनी आक्रमण केले असता, तेथील स्थानिक युवकांच्या मदतीने सदाशिवरावभाऊ यांनी त्या लुटारूंना पळवून लावून गावाचे रक्षण केले. त्यामुळे सांघी या गावी एका आश्रमात त्यांच्या नावाची गादीसुद्धा आहे. ते जिवंत होते अशी काही सामान्यजनांची समजूत होती. खुद्द सदाशिवरावभाऊ यांच्या पत्नी पार्वतीबाई यांनीही अशी समजूत मनाशी बाळगली होती. त्यामुळे त्या सारे सौभाग्यालंकार अंगावर परिधान करीत. सदाशिवरावभाऊंचा अंत कसा झाला, याबाबत काही भिन्न मते असली, तरी पेशवे घराण्यातील शूरवीरांमध्ये त्यांचा पराक्रमही उल्लेखनीय आहे. फक्त युद्धातच नाही तर पेशवाईच्या अंतर्गत कारभारात रामचंद्रबाबा शेणवी यांच्या साह्याने त्यांनी खूप सुधारणा केल्या. अशा या पेशवे घराण्यातील शूराने इतिहासात आपले नाव अजरामर केले. 

पुढील लेखात आपण पेशवे घराण्याविषयी आणखी काही गोष्टी जाणून घेऊ या.

(क्रमश:)

(संदर्भ : मराठी विश्वकोश, बीबीसी मराठी, मराठा हिस्ट्री यू-ट्यूब चॅनेल)

(या लेखमालेतील आधीचे लेख खालील लिंकवर वाचता येतील.)

१. पानिपतची लढाई म्हणजे शौर्याचे प्रतीक... पराभवाची गाथा नव्हे!

२. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - पूर्वार्ध

३. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - उत्तरार्ध

४. मराठेशाहीचे स्वातंत्र्ययुद्ध आणि पेशवाईचा उदय

५. पेशवेकालीन महाराष्ट्र - भाग १ 

६. पेशवेकालीन महाराष्ट्र - भाग २

७. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ

८. पराक्रमी आणि मुत्सद्दी नानासाहेब पेशवे

९. पराक्रमी आणि धोरणी चिमाजीअप्पा

१०. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे

११.सवाई माधवराव पेशवे

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 01-04-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 463 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 01-04-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 463 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement