बन्सावरगावची जलक्रांती - दुष्काळातून जलसुरक्षेकडे यशस्वी वाटचाल

सततचा दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे टँकरवर अवलंबून असलेल्या महाराष्ट्रातील एका गावाची, जनसहभागातून टँकरमुक्तीच्या दिशेने झालेल्या अद्भुत प्रवासाची यशोगाथा.

बन्सावरगावची जलक्रांती - दुष्काळातून जलसुरक्षेकडे यशस्वी वाटचाल मुख्य फोटो
मुख्य फोटो

उन्हाळा म्हटले की, रखरखीत वातावरणासोबत येते पाणीटंचाई. मग संपूर्ण उन्हाळ्यात किती जिल्ह्यांत किती टँकरने पाणी पुरवठा होतोय? याची यादीच करावी लागते. दरवर्षी प्रशासन उपाययोजना करण्याचे आश्वासन देते, परंतु दरवर्षी पाणीटंचाई कमी होण्याऐवजी वाढतच जाते. घराघरातील माता-भगिनी डोक्यावर हंडे घेऊन मैलनमैल चालत जातात. हे दृश्य खूपच विदारक आणि दुःखद असते. महाराष्ट्रातील मराठवाडा प्रदेशात तर अनेक दशकांपासून हीच स्थिती आहे. तीव्र उन्हाळ्यात खालावत जाणारी भूजलपातळी, पावसाची अनिश्चितता आणि भूजलाचा अतिवापर यामुळे विहिरी व बोअरवेल्स कोरड्या पडतात. परिणामी, बहुतांश गावे टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहतात.
या सगळ्या परिस्थितीवर लातूर जिल्ह्यातील बन्सावरगावने जनसहभागातून एक शाश्वत उपाय शोधून काढला आहे. हे दुष्काळी वास्तव स्वीकारण्याऐवजी त्याला आव्हान दिले आहे. गावकऱ्यांनी टँकरला कायमस्वरूपी उपाय मानण्याऐवजी पाण्याशी असलेले गावाचे नातेच नव्याने उभे करण्याचा निर्धार केला आहे. एकेकाळी पाण्याच्या टँकरवर आणि आटत चाललेल्या बोअरवेल्सवर अवलंबून असलेले महाराष्ट्रातील बन्सावरगाव आज जलसंपन्नतेचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. गावकऱ्यांनी ओढे-नाले पुनरुज्जीवित केले, भूजल पुनर्भरणाच्या प्रभावी व्यवस्था उभारल्या आणि स्थानिक पातळीवर शाश्वत जलनियोजन राबवले. या एकत्रित प्रयत्नांमुळे भूजलसाठ्याची सुरक्षितता निश्चित झाली आहे. महाराष्ट्र आणि देशातील इतर दुष्काळग्रस्त गावांसाठी तसेच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शहरांसाठी बन्सावरगावचा हा आदर्श नक्कीच मार्गदर्शक ठरू शकतो.
काही वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून त्यांनी कालवे दुरुस्त केले, ओढे-नाले पुनर्जीवित केले, भूजल पुनर्भरणाच्या रचना उभारल्या, पाण्याची नासाडी कमी केली आणि शेतीपद्धतीत बदल केला. हळूहळू पूर्वी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आटणाऱ्या विहिरीत अधिक काळ पाणी साठविण्याची क्षमता निर्माण झाली. आज बन्सावरगाव पूर्णपणे टँकरमुक्त झाले आहे. त्यांची ही यशोगाथा केवळ एका गावाची कथा नसून, दीर्घकालीन जलसुरक्षेचा शोध घेणाऱ्या भारतातील दुष्काळग्रस्त गावांसाठी एक प्रेरणादायी आणि व्यवहार्य आदर्श ठरली आहे.

सामान्यतः टँकरद्वारे पाणीपुरवठा हा दुष्काळावरील उपाय मानला जातो. परंतु प्रत्यक्षात टँकरवरील अवलंबित्व हे भूजल व्यवस्थेच्या अपयशाचे लक्षण असते. जेव्हा पाऊस कमी पडतो, तेव्हा भूजलाचा उपसा त्याच्या पुनर्भरणापेक्षा अधिक वेगाने होतो. भूजलपातळी खाली गेल्यानंतर शेतकरी अधिक खोल बोअरवेल्स खोदतात, ज्यामुळे जमिनीखालील जलस्त्रोतांवर आणखी ताण निर्माण होतो. कालांतराने तेथील स्थानिक जलस्त्रोतांची स्वतःला पुनर्जीवित करण्याची क्षमता नाहीशी होते. याच कारणामुळे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये तसेच देशातील अनेक राज्यांमधील गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा ही सामान्य बाब झाली आहे. टँकर तात्पुरती गरज भागवतात; मात्र ते भूजल पुनर्भरण करत नाहीत किंवा जलसाठवण क्षमता वाढवत नाहीत. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाते, कारण ओढे-नाले खराब झालेले असतात, कालवे गाळाने भरलेले असतात, तलावांची क्षमता कमी झालेली असते आणि पुनर्भरण यंत्रणा दुर्बल किंवा अस्तित्वातच नसते.
ही किमया या गावाने कशी केली असेल? या गावात कोणीही तज्ञ व्यक्ती नाही, मग या गावाने आपणहून हा चमत्कार कसा केला असेल? चला, जाणून घेऊया बन्सावरगावचा जलपुनरुज्जीवनाचा हा सहा टप्प्यांचा प्रवास-
बन्सावरगावमधील हा बदल एखाद्या मोठ्या धरणामुळे किंवा नवीन पाइपलाइन प्रकल्पामुळे झाला नाही. तो पाणीटंचाईकडे पाहण्याच्या दृष्टीकोनातील बदलामुळे घडला. गावकऱ्यांनी "अधिक पाणी कसे आणायचे?" ह्या प्रश्नावर उत्तर शोधण्याऐवजी "पावसाचे पाणी इतक्या वेगाने का नाहीसे होते?" या मूलभूत प्रश्नावर विचार केला. याच विचारमंथनातून पुढील जलपुनरुज्जीवन मॉडेल विकसित झाले-
१. पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या कुठून वाहते ते ओळखा- पहिली पायरी म्हणजे स्थानिक भूभाग समजून घेणे. अनेक गावे आणि शहरांमध्ये नैसर्गिक पाणवठे, नाले आणि पाणी वाहून जाणाऱ्या मार्गांवर अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे मुसळधार पावसात पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वेगाने वाहून जाते. बन्सावरगावने जुन्या ओढ्यांचे मार्ग, कालवे आणि पाण्याच्या नैसर्गिक वाहतुकीचे मार्ग शोधून त्यांचे पुनरुज्जीवन केले.
२. पाण्याचा प्रवाह मंद करा- वेगाने वाहून जाणारे पावसाचे पाणी म्हणजे एका अर्थाने पाण्याची नासाडीच आहे. गावात बंधारे दुरुस्त करण्यात आले, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे उभारले गेले आणि लहान अडथळे निर्माण करून पाण्याचा वेग कमी करण्यात आला. यामुळे पाणी अधिक काळ परिसरात टिकून राहिले आणि जमिनीला ते शोषून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. परिणामी भूजल पुनर्भरण वाढले.
३. सतत उपसा करण्याऐवजी भूजल पुनर्भरण करा- भूजल संकटाचे प्रमुख कारण म्हणजे अनियंत्रित उपसा. बन्सावरगावने दरवर्षी अधिक खोल बोअरवेल्स खोदण्याऐवजी रिचार्ज शाफ्ट, सोक पिट्स आणि पाझर व्यवस्थांमध्ये गुंतवणूक केली. यामुळे पाणी पुन्हा-पुन्हा जमिनीखाली साठू लागले.
४. सांडपाणी आणि घरगुती पाण्याला संसाधन म्हणून वापर- गावात सोक पिट्स आणि स्थानिक जलसंवर्धन व्यवस्था उभारून पाण्याची नासाडी कमी करण्यात आली.
५. शेती आणि हरित क्षेत्रांत कमी पाण्याचा वापर- भारतामध्ये भूजलाचा सर्वात मोठा वापर शेती क्षेत्रात होतो. बन्सावरगावने ठिबक सिंचनासारख्या जलकार्यक्षम तंत्रांचा प्रसार केला. यामुळे कमी पाण्यात अधिक उत्पादन शक्य झाले. यामुळे अमर्यादित पाणी उपसण्याऐवजी पाण्याच्या नियंत्रित आणि जबाबदार वापराची संस्कृती विकसित होते.
६. जलव्यवस्थापनाला सामूहिक स्वरूप- बन्सावरगावने दिलेला सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे टँकरमुक्ती केवळ पायाभूत सुविधांमुळे मिळत नाही. गावात "वॉटर बजेटिंग"ची संकल्पना राबविण्यात आली. किती पाणी उपलब्ध आहे? किती वापरता येईल? आणि उन्हाळ्यापूर्वी किती जतन करणे आवश्यक आहे? यावर सामूहिक चर्चा होऊ लागली.
भारतातील जलसंकट आता केवळ पावसाच्या कमतरतेचे राहिलेले नाही; ते पुनर्भरणाच्या कमतरतेचे संकट बनले आहे. अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये पावसाळ्यात पूरस्थिती असते, तर उन्हाळ्यात तिथे तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. दुष्काळी पट्ट्यातील अनेक गावांनाही खरंतर पुरेसा हंगामी पाऊस मिळतो; पण स्थानिक पुनर्भरण व्यवस्था कोलमडल्यामुळे काही दिवसांतच ते पाणी वाहून जाते. बन्सावरगावचे उदाहरण अशा शहरांसाठी आणि गावांसाठी दिशादर्शक आहे. दुष्काळाचा संबंध फक्त किती पाऊस पडतो याच्याशी नसून, पडलेल्या पावसाचे पुढे काय होते? याच्याशीही आहे. बन्सावरगावने त्यांच्या पद्धतीने याचे उत्तर शोधले आहे—आणखी एक टँकर हा त्यावर उपाय नाही, तर अशी जलव्यवस्था उभारणे ज्यामुळे पाणी जमिनीत टिकून राहील, साठेल आणि पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित राहील, हाच त्यावर उपाय आहे. जे या गावाला जमले ते जर प्रत्येक गावाने आणि शहराने करून दाखवले तर भारत खऱ्या अर्थाने सुजलाम-सुफलाम होईल, हो ना!!
-अनुवादित
माहिती स्त्रोत – रितम न्यूज ॲप

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 02-06-2026 News publication date | Time: 03:42 PM News publication time | Views: 59 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 02-06-2026 News publication date | Time: 03:42 PM News publication time | Views: 59 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement