पेशवाईवरील लेखमालेतील सहावा लेख...
या लेखमालेच्या पाचव्या भागात आपण पेशव्यांच्या काळातील नगररचना, देवालये आणि पाणीपुरवठा या व्यवस्थांचे व्यवस्थापपन कशा प्रकारे केले जात असे, ते पाहिले. महाराष्ट्रात मुळात निर्वाहाची साधने कमी होती. पावसाच्या अनियमिततेमुळे पिके बेभरवशाची असायची. कारखाने आणि उद्योगधंदे यांची कमतरता होती. कर्नाटक, तेलंगण, गुजरात, मध्य प्रदेश ही महाराष्ट्राची शेजारील राज्ये तुलनेने सुपीक, कला-कौशल्यांचा विकास झालेली आणि संपन्न होती. उत्तर भारतातील राज्यांइतकी सुपीकता महाराष्ट्रात नव्हती. परंतु तरीही येथील लोक बळकट, कणखर आणि काटक होते. कारण अन्न खूप पौष्टिक नसले, तरी कसदार होते. मराठा लोक मुळात शूर होते. साहसप्रिय आणि धीट होते. या अशा कणखर मावळ्यांच्या साथीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नागरी व्यवस्थांची घडी व्यवस्थित बसली होती. नंतरच्या काळात मात्र ती पूर्णपणे विस्कटली होती. पेशव्यांच्या काळात मात्र जसजसा मराठा साम्राज्याचा विस्तार होत होता, तसतसा मराठा लोकांचा महाराष्ट्राबाहेरील लोकांशी संपर्क वाढत होता. लढायांच्या निमित्ताने कधीकधी आठवडा, तर कधीकधी एक-एक महिना तळ द्यावा लागत असे. अशा वेळी ज्या भागात तळ होता त्या भागातील लोक, संस्कृती, समाजरचना यांची माहिती मराठ्यांना होऊ लागली. त्यांच्या दृष्टिकोनात बदल होऊ लागला. पेशव्यांच्या नेतृत्वाखाली हा विस्तार होताना दक्षिणेला श्रीरंगम, श्रीरंगपट्टण, कावेरी, तुंगभद्रा, नीलगिरी व उत्तरेला काशी, प्रयाग, मथुरा, विंध्य, हिमालय, पूर्वेला कोलकाता, कटक, जगन्नाथपुरी आणि पश्चिमेला सिंधू खोरे, पेशावर, अटक असा विस्तीर्ण भूप्रदेश मराठ्यांच्या आधिपत्याखाली आला. सहाजिकच या सर्व भागांतील संस्कृतीचा परिचय मराठ्यांना झाला.
या सर्व भागांतील अर्थकारण, समाजाची रचना, स्थापत्यकला मराठ्यांना समजत गेली. याचा परिणाम पेशवेकालीन इमारती आणि वाड्यांमध्ये दिसून येतो. अशा बांधकामामध्ये मुघल आणि दाक्षिणात्य कलाशैली बघायला मिळते. महाराष्ट्रातील समाजरचना इतर राज्यांपेक्षा भिन्न आहे. पेशवाईतील ब्राह्मण, मराठे व इतर सर्व जातींचे हिंदू एकाच विचारसरणीत वाढलेले होते. त्यांच्यात धार्मिकता जास्त होती. परंपरागत गोष्टींवर त्यांचा ठाम विश्वास होता. असे असले, तरी मराठे भित्रे नव्हते, ते प्रयत्नवादी होते. संकटांशी झुंजणे व त्यातून मार्ग काढणे हे त्यांच्या अंगवळणी पडले होते. ते धीट, उद्योगशील आणि प्रयत्नवादी होते. देवतांवरील गाढ विश्वासामुळे पेशव्यांच्या काळात व्रतवैकल्ये, धार्मिक अनुष्ठाने व पूजा-अर्चा होत असत. संपूर्ण गाव त्या धार्मिक अनुष्ठानात सहभागी होत असे. खुद्द पेशवे असोत वा पेशव्यांच्या घरातील स्त्रिया, दानधर्म करणे, बक्षीस देणे अशा उपक्रमांत सहभागी होत असत. फक्त हिंदू धर्मच नाही, तर मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माचाही आदर पेशवेकाळात राखला जात होता. ही सहिष्णुता फक्त सामाजिक समानतेपुरती मर्यादित नव्हती, तर अनेक व्याधींवरील उपचारपद्धतीतसुद्धा राखली जात होती. उपचारपद्धतींचा अवलंब होताना आयुर्वेदीय उपचारांबरोबरच युनानी आणि इतर पाश्चात्य उपचारपद्धती पेशवेकाळात बऱ्यापैकी प्रचलित होती. या अनेक उपचारपद्धतींचा अवलंब फक्त स्वत:पुरता न करता साथीचे आजार, पूर, दुष्काळ यातील रोगराईमध्ये जनतेसाठीसुद्धा औषधोपचारांची तरतूद केली जात होती.
व्यापार आणि उद्योगधंद्यांमध्येही पेशवेकाळात अनेक नवनवीन प्रयोग झाले. जसजशी मराठी साम्राज्याची क्षितिजे विस्तारत गेली, तसतसा मुघल, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज अशा विविध देशांतील व्यापाऱ्यांशी मराठ्यांचा संपर्क वाढला. युरोपातील स्पेन, पोर्तुगीज या व्यापारी राष्ट्रांशी मराठ्यांची ओळख झाली. १४८६पासून पुढील काही वर्षांत पोर्तुगीजांचा भारताशी व्यापार चालू झाला. पुढे फ्रेंच व इंग्रजसुद्धा समुद्री मार्गाने भारताशी जोडले गेले. भारतातील नारळ, सुपारी, कपड्यांसाठी लागणारा कच्चा माल, मसाल्यांचे पदार्थ यांचे दळणवळण सुरू झाले. सहाजिकच इतर किनारपट्ट्यांप्रमाणे कोकण किनारपट्टीतूनही या साऱ्यांचा महाराष्ट्रात शिरकाव झाला. पेशव्यांच्या काळात कोकण किनारपट्टीहून अनेक बंदरांमध्ये मालाची ने-आण केली जात होती. पेशव्यांचे कारकून मुंबईत होते. ते तेथून पेशव्यांच्या हुकमाप्रमाणे मालाची रवानगी करत होते.
सोळाव्या आणि सतराव्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली होती. अनेक नवनवीन शोध लागत होते. दुर्बिणीचा शोध, छापखाने, घड्याळ अशा अनेक शोधांनी युरोपात उलथापालथ होत होती. तेथील ज्ञान-विज्ञान साहाजिकपणे भारतातही येऊ लागले. पेशव्यांच्या काळात तुलनेने हा प्रसार कमी होता. तरीही काही काही बाबतीत त्यांचे ज्ञान इथे फोफावू लागले होते. उदा. कारागिरी, स्थापत्यकला इत्यादी. स्थानिक आणि अशा बाहेरून आलेल्या कलाकारांना पेशव्यांनी कायम प्रोत्साहन दिले. कारागिरी आणि उद्योगधंद्यांच्या विकासासाठी पेशवे प्रयत्नशील होते. साताऱ्याचे छत्रपती, पेशवे आणि त्यांचे सरदार यांच्या उत्तेजनाने विणकलेसारख्या कलांचा प्रसार महाराष्ट्रात झालेला होता. पेशव्यांचा एक वकील मुंबईला पहिल्या बाजीरावांच्या काळापासून होता. तो इंग्रजांकडे असलेल्या विविध वस्तूंची माहिती पेशव्यांना देत असे. इंग्रज मुंबईत कोणकोणत्या वस्तूंचा व्यापार करतात, याची माहिती पेशव्यांना मिळत होती. वाळूचे घड्याळ, हंड्या-झुंबरे, मोठमोठे आरसे, हिरेजडित व सोन्याची घड्याळे अशा अनेक परदेशी वस्तू पेशव्यांच्या संग्रही होत्या. इतकेच काय पण थर्मामीटर, चिनी पांढरी साखर, युरोपियन चष्मे, लोहचुंबक यांची ओळखही पेशवेकाळात होती.
अशा प्रकारे व्यापार, देवालये, वैद्यकीय विभाग, गायन-नृत्य आदी कला, मूर्तिकला व चित्रकला, सणसमारंभ अशा सर्वच बाबतीत पेशव्यांचे वेगळेपण उठून दिसते. महाराष्ट्रातील आणि बाहेरील सर्वच उत्तम गोष्टी जोपासण्याचा पेशव्यांचा प्रयत्न होता. याशिवाय स्वधर्मनिष्ठा आणि परधर्म सहिष्णुता हीसुद्धा पेशव्यांची खासियत होती. राज्य वाढवण्यापेक्षाही मिळालेले राज्य सुस्थितीत ठेवणे हे कौशल्याचे काम आहे. या बाबतीतही पेशव्यांनी अनेक आदर्श प्रस्थापित केले होते. त्यांच्या काळातील जमीन महसूल पद्धती, मुलकी खाते, शेतकी खाते, हे छत्रपती शिवरायांच्या अपेक्षित राज्यव्यवस्थेचे उत्तम उदाहरण होते. पेशव्यांच्या काळातील न्यायपद्धती अजोड होती. नाना फडणवीसांसारख्या न्यायप्रिय व्यक्तींच्या न्यायनिवाड्याची उदाहरणे प्रसिद्ध आहेत. मराठ्यांची चतुरंग सेना अर्थात स्वार, पायदळ, तोफखाना व घोडेस्वार यांचे नियोजन पेशवेकाळात उत्तम होते. उमदे घोडे, शस्त्रास्त्रे, तोफखाना यांची उपलब्धता व व्यवस्थापन करणे यात पेशव्यांनी कोठेही कमतरता भासू दिली नाही. बाजीराव पेशव्यांपासून सवाई माधवराव पेशव्यांपर्यंत पागेसाठी, फौजेसाठी आणि तोफगोळ्यासाठी भरीव आर्थिक तरतूद केली जात होती. शिवाजी महाराजांइतकेच पेशव्यांचे आरमारही सुसज्ज होते. पेशव्यांनी आपले वेगळे आरमार १७३७ रोजी वसईच्या बाजूला अर्नाळ्याजवळ स्थापन केले होते. युद्धकाळात जखमी होणाऱ्या सैनिकांचीही पेशवे उत्तम काळजी घेत. त्यांना योग्य ती नुकसानभरपाई देत. जखम कोठे, कशी व किती तीव्र स्वरूपाची आहे, त्यावर नुकसानभरपाई दिली जात असे. ती काटेकोरपणे दिली जाते की नाही, यावर पेशव्यांचे जातीने लक्ष असे.
पेशवाईत महाराष्ट्रातील लोकांच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने घडलेले कार्य फार मौल्यवान व महत्त्वाचे होते. पेशव्यांचे राज्य सर्व मराठ्यांचे राज्य होते. कोणत्या एका विशिष्ट जातीचे नव्हते. पेशवे फक्त त्या राज्याचे पुढारी होते, इतकेच. पेशव्यांनी स्वत:च्या महत्त्वाकांक्षेकडे लक्ष न देता, मराठ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. महाराष्ट्राला इतर प्रांतांच्या बरोबरीने आणण्यासाठी पेशवे झटले. त्यांनी उत्कृष्ट कलाकौशल्याच्या इमारती, वाडे बांधले नाहीत, परंतु महाराष्ट्रातील बहुजन समाजाची उन्नती केली. नुसते दगडावर दगड रचून सुंदर इमारती बांधण्यापेक्षा मनुष्याचे कर्तृत्व व दर्जा वाढवणे याला महत्त्व दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला साम्राज्याची ओळख दिली. तेही महाराष्ट्राचा सांस्कृतिक, कला, सामाजिक आणि आर्थिक विकास साधून. पेशवेकालीन महाराष्ट्र शौर्यवान होता. कला-संस्कृतीचा वारसा जपणारा होता आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रगती साधणारा होता. पेशवेकालीन महाराष्ट्रातील सह्याद्री हिमालयाला आपले महत्त्व पटवून देणारा होता. हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा होता.
(क्रमश:)
(संदर्भ - महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास - पेशवेकालीन महाराष्ट्र - वा. कृ. भावे)
.......
(या लेखमालेतील आधीचे लेख खालील लिंकवर वाचता येतील.)
१. पानिपतची लढाई म्हणजे शौर्याचे प्रतीक... पराभवाची गाथा नव्हे!
२. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - पूर्वार्ध
३. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - उत्तरार्ध
४. मराठेशाहीचे स्वातंत्र्ययुद्ध आणि पेशवाईचा उदय
५. पेशवेकालीन महाराष्ट्र - भाग १
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment