पेशवे घराण्यातील महिला - अमृत महाराष्ट्र

पेशवे घराण्यातील महिला

पेशवाईवरील लेखमालेतील तेरावा लेख...

पेशवे घराण्यातील महिला मुख्य फोटो
मुख्य फोटो

या लेखमालेच्या आतापर्यंतच्या लेखांमध्ये आपण अनेक शूर पेशव्यांचा इतिहास जाणून घेतला. हे सर्व पेशवे अतिशय कर्तृत्ववान, पराक्रमी होते. हिंदवी स्वराज्याचे साम्राज्य त्यांच्या तळपत्या तलवारीने आणि दृढ निश्चयाने झाले. या सगळ्या पराक्रमी पेशव्यांच्या पाठीमागे आधार म्हणून खंबीरपणे उभी राहिली ती मातृशक्ती! हे पेशवे अल्पायुषी ठरले. वयाची पंचेचाळिशीही ओलांडू न शकणाऱ्या या पेशव्यांचे अवघे आयुष्य रणांगणावर गेले. त्यामुळे गृहस्थ आयुष्य फारसे लाभले नाही. अशा बिकट परिस्थितीतून त्यांच्या अर्धांगिनींनी संसार केला. एवढेच नव्हे तर पेशव्यांचा कारभारही पाहिला. राजमाता जिजाऊंचा वारसा पुढे नेत या स्त्रीशक्तीने राजकारण, पेशव्यांचा मानमरातब आणि कर्तव्यपालन या सगळ्या गोष्टींचे भान ठेवत ही परंपरा पुढे नेली. पेशवे घराण्यातील अनेक महिलांविषयी गैरसमज आहेत की त्या कारस्थानी होत्या, अहंकारी होत्या; पण प्रत्यक्षात तसे होते का? या लेखातून आपण पेशवे घराण्यातील काही महिलांची ओळख करून घेऊ या.

राधाबाई : बाळाजी विश्वनाथ यांची पत्नी. त्यांच्याकडे स्वतंत्र अर्थाने 'प्रथम पेशवेपत्नी' या पदाचा मान जाईल. कोकणातील गणपतीपुळ्याच्या आग्नेयेला असलेले नेवरे हे राधाबाईंचे माहेरचे गाव होय. त्यांचे वडील दादाजी जोगदेव बर्वे हे सावकार होते. राधाबाईंना चांगले लिहिता-वाचता येत होते. त्यांचा विवाह श्रीवर्धनच्या भट घराण्यातील बाळाजी विश्वनाथ भट यांच्याशी झाला. लग्नावेळी बाळाजी हे १२-१३ वर्षांचे व राधाबाई या ६-७ वर्षांच्या असाव्यात. त्यांचा विवाह नेवरे येथे झाला असावा. बर्वे घराण्यातील राधाबाई यांनी थेट राज्यकारभारात भाग घेतला असेल की नाही यावर दुमत होऊ शकेल. परंतु पेशव्यांच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर आहे ते बाजीराव आणि चिमाजीअप्पा या कमालीच्या शूरवीरांच्या मातोश्री म्हणून! राधाबाईंना दोन मुलीही होत्या - भिऊबाई आणि अनुबाई. राधाबाई अत्यंत चतुर, बुद्धिमान, कर्तव्यकठोर, परंतु धर्मनिष्ठ, प्रेमळ होत्या. त्यांना राजकारणाची खूप चांगली जाण होती. राजकारणाची बातमीपत्रे मागवून त्या बातम्या राखत. सर्व पेशवे कुटुंबीय, सरदार, मुत्सद्दी त्यांना वचकून असत. थोरले बाजीराव, चिमाजीआप्पा पुण्याबाहेर असताना राधाबाईच पुण्यातील कारभार दक्षतेने चालवत. कुटुंबातील मुलांचे संगोपन, शिक्षण, धार्मिक कृत्ये, विवाह, व्रतबंध वगैरे राधाबाईच जातीने पाहत. थोरल्या बाजीरावांनी १७२१ साली हैदराबादच्या निजामाची भेट घेतली, त्या भेटीबद्दल राधाबाईंनी बाजीरावांना काळजीपूर्वक तपशीलवार मार्गदर्शन केले होते. निजामाच्या डावपेचांच्या व मुघली राजकारणाच्या त्या चांगल्या माहीतगार होत्या. १९ एप्रिल १७५३ रोजी राधाबाईंचे पुणे येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८० वर्षांचे असावे.

काशीबाई : काशीबाई हे एक समर्थ करारी, विचारी, निष्ठावान व्यक्तिमत्त्व होते. महादेव कृष्ण जोशी आणि शिवबाई यांची ती कन्या होती. महादेव कृष्ण जोशी हे सावकार होते. काशीबाईंचा थोरल्या बाजीरावांशी विवाह झाला. बाळाजी बाजीराव (नानासाहेब पेशवे), रामचंद्रराव, रघुनाथराव, आणि जनार्दनराव हे या दाम्पत्याचे चार पुत्र. काशीबाई, रूपवान आणि मृदुभाषी होती. कर्तव्यपरायण होती. काशीबाई यांची सवत म्हणजेच मस्तानी. बाजीराव आणि मस्तानी यांच्या मुलाचे नाव समशेरबहाद्दर होते; मात्र मस्तानीच्या मृत्यूनंतर काशीबाई यांनीच समशेरबहाद्दरचे आईच्या ममतेने पालनपोषण केले आणि त्याला एक समर्थ योद्धाही बनवले. वयाच्या २७व्या वर्षी पानिपतच्या त्या युद्धात समशेरलाही भाऊ आणि विश्वासराव यांच्यासह वीरगती मिळाली. काशीबाई बाजीराव पेशवे हे एक आगळेवेगळे, मोठ्या मनाचे, धीरगंभीर मृदुभाषी, शांत, कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून इतिहासात सन्माननीय आहे!

अन्नपूर्णाबाई : या बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजीअप्पा यांच्या पत्नी. आपण नेहमी बाजीरावांच्या पराक्रमाच्या शौर्याच्या आणि विजयाच्या कथा वाचत असतो, चर्चा करत असतो; पण वास्तविक चिमाजीअप्पा हे या बाबतीत थोरल्या बंधूंच्या बरोबरीनेच रण गाजवत होते. अवघे ३३ वर्षांचे आयुष्य लाभलेले चिमाजीअप्पा आणि अन्नपूर्णाबाई यांचे चिरंजीव म्हणजेच पानिपत युद्धातील ज्येष्ठ नाव सदाशिवरावभाऊ पेशवे. चिमाजी पानिपत काळात हयात नव्हते. सदाशिवरावांनाही अवघ्या ३०व्या वर्षी पानिपत संग्रामात वीरमरण आले त्या वेळी अन्नपूर्णाबाई आणि सीताबाई (चिमाजीअप्पांच्या द्वितीय पत्नी) हयात होत्या की नाही याविषयी इतिहासात फारशी माहिती नाही. १७४०मध्ये चिमाजीअप्पांच्या निधनानंतर पुणे येथील ओंकारेश्वर मंदिर परिसरात अन्नपूर्णाबाई सती गेल्या होत्या, असाही एक संदर्भ आढळतो.

गोपिकाबाई : पेशवाई काळातील सर्वार्थाने ज्येष्ठ स्त्री म्हणजे गोपिकाबाई. बाजीरावांची सून आणि नानासाहेब पेशव्यांची पत्नी. सरदार रास्ते घराण्यातील या मुलीकडे राधाबाईंचे लक्ष गेले ते देवपूजा, परिपाठ, संस्कार आणि बुद्धिमत्ता या तिच्या गुणांमुळे. बाळाजीसाठी हीच कन्या पत्नी म्हणून पेशवे घराण्यात आणायची हा विचार तिथेच पक्का झाला होता. गोपिकाबाईंनीही तो विश्वास सार्थ ठरवला आणि नानासाहेब पेशवेपदावर आरूढ झाल्यावर मराठा राज्यकारभार आणि विविध मसलतीत प्रत्यक्ष भाग घेणारी पहिली पेशवीण ठरली. नानासाहेब पेशवे झाल्यापासून गोपिकाबाईंनी आपल्या राजकारणाची चुणूक दाखवायला सुरुवात केली होती. त्या नानांच्या अंतर्गत सल्लागार होत्या. पेशवाईतील प्रमुख सरदार आणि अमात्य मंडळींशी त्या मिळूनमिसळून वागत. राघोबादादा हे नात्याने त्यांचे धाकटे दीर. ते आपल्या पराक्रमाने मराठा राज्यातील आघाडीचे वीर गणले जात असत. त्यामुळे त्यांची पत्नी आनंदीबाई यांच्या महत्त्वाकांक्षेला आणखी धुमारे फुटू नयेत याबाबत गोपिकाबाई दक्ष असत. तीच गोष्ट सदाशिवरावभाऊंची (चिमाजी पुत्र) पत्नी पार्वतीबाई हिच्याबाबतही. गोपिकाबाईंचे दुर्दैव इतके मोठे, की त्यांना त्यांच्या हयातीतच आपल्या तिन्ही मुलांचे मृत्यू पाहणे नशिबी आले. विश्वासराव पानिपत युद्धात धारातीर्थी पडले. दुसरे चिरंजीव माधवराव. रमासमवेत संसारही छानपैकी चालणार, फुलणार असे वाटत असतानाच क्षयाने त्यांना गाठले व त्यांचाही मृत्यू पाहण्याचा प्रसंग गोपिकाबाईंवर आला. तिसरा मुलगा नारायणराव यांची पुण्यात अगदी डोळ्यांसमोर शनिवारवाड्यात हत्या झाली. पती नानासाहेब तर पानिपत युद्धाच्या धक्क्यानेच स्वर्गवासी झाले होते आणि एकापाठोपाठ ही तिन्ही मुलेही गेली. नारायणरावांच्या खुनानंतर गोपिकाबाईंनी पुणे कायमचे सोडले आणि त्या नाशिकच्या एका आश्रमात येऊन राहू लागल्या. पुढे गोपिकाबाईंनी गोदावरी घाटावरच उपोषण चालू केले आणि त्यातच त्यांचा ११ ऑगस्ट १७७८ रोजी अंत झाला. 

पार्वतीबाई : सदाशिवरावभाऊंची पत्नी; पानिपत संग्रामाच्या वेळी पतीसमवेत प्रत्यक्ष रणभूमीवर गेल्या होत्या. पार्वतीबाईंच्या दुर्दैवाने त्यांना पतीच्या शवाचे दर्शन झाले नाही. युद्धातील कधीही भरून न येणार्‍या हानीनंतर काही विश्वासू सरदार-सैनिकांनी त्यांना पानिपतवरून पुण्यात सुखरूप आणले; पण 'मृत पती पाहिलेला नाही' या कारणावरून पार्वतीबाईंनी स्वतःला 'विधवा' मानले नाही आणि त्यांच्या स्मृतीतच वाड्यावर रमाबाईसमवेत त्या राहत होत्या. 'तोतयाच्या बंडा'ला (सदाशिवरावांसारखी दिसणारी एक व्यक्ती) त्या निक्षून सामोऱ्या गेल्या होत्या आणि तो प्रकार माधवरावांच्या मदतीने त्यांनी धीटपणे मोडून काढला होता. माधवरावांच्या बहरत जाणाऱ्या असलेल्या कारकीर्दीकडे पाहतच त्या शांतपणे १७६३ साली वयाच्या २९व्या वर्षी मृत्यूला सामोऱ्या गेल्या. त्यांना अपत्य नव्हते.

रमाबाई : पेशवे घराण्यातील सर्वांत सोज्ज्वळ आणि धार्मिक स्त्री म्हणजे रमाबाई! आज या क्षणी एकही मराठी घर नसेल, की जिथे 'रमा-माधव' हे नाव माहीत नसेल. इतिहासातील इतर पात्रे कशीही असू देत; पण रमा या नावाने त्या वेळेच्या आणि आजच्याही जनतेत जे नाजूक हळवे असे घर केले आहे त्याला तोड नाही. रमाबाईंचा विवाह नऊ डिसेंबर १७५८ रोजी पुण्यात थोरले माधवराव पेशवे यांच्याशी झाला. १७६६ ते १७६७ मध्ये कर्नाटक मोहिमेदरम्यान त्या माधवरावांच्या सोबत होत्या. त्या श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर येथे तीर्थयात्रेला जात असत. माधवराव पेशवे पदावर असताना होणारा गृहकलह, राजकारण यांना रमाबाईला सामोरे जावे लागले. त्यातच माधवरावांना दम्याचा आजार सुरू झाला. तब्येतीला उतार पडत नाही म्हणून त्या माधवरावांबरोबर थेऊर येथे राहिल्या. तिथेच माधवराव यांचा मृत्यू झाला आणि रमाबाईसुद्धा तिथेच सती गेल्या.

आनंदीबाई : आनंदीबाई पेशवे या गुहागरच्या रघुनाथराव ओक व यशोदाबाई यांच्या कन्या. गुहागरपासून काही अंतरावर असलेल्या मळण या गावी आनंदीबाईंचा १७४७ साली जन्म झाला. त्यांना गोपाळ, बापूजी व नारायण असे तीन भाऊ व पार्वती नावाची बहीण होती. आनंदीबाईंचे लग्न १७ डिसेंबर १७५५ रोजी रघुनाथराव पेशवे उर्फ राघोबादादा यांच्याशी झाले. आनंदीबाई पेशवे या प्रेमळ, तशाच शूरवीरदेखील होत्या. त्यांनी कायम राघोबादादांच्या हितासाठी व पेशवाई सांभाळण्यासाठी धडपड केली. आनंदीबाई यांचा नारायणराव पेशव्यांच्या हत्येच्या कटात हात होता, असे म्हटले जाते. परंतु काही संदर्भ पाहिल्यास वेगळेच चित्र समोर येते. आनंदीबाई कोपरगावला बंदिस्त असताना त्यांनी दिनचर्या लिहून ठेवली आहे, त्यावरून आनंदीबाईंच्या स्वभावाचे यथार्थ दर्शन घडण्यास मदत होते. त्यांच्या दिनचर्येवरून त्यांच्या अंतःकरणाची ऋजुता आणि मनाचा कणखरपणा दिसून येतो. तिथे लिहिलेल्या काही पत्रांत रामायण-महाभारतातील दृष्टान्त व दाखले आढळतात. यावरून त्यांचा वाचनाचा व्यासंग चांगला असल्याचे कळते. वाचनात जशा त्या प्रवीण होत्या, तशा लिहिण्यातही हुशार होत्या हे त्यांनी लिहिलेल्या पत्रांवरून समजते. महत्त्वाची पत्रे त्या स्वतः लिहीत असत. अल्पकाळ का होईना, पण रघुनाथराव जरूर पेशवेपदी बसले; पण बारभाईंनी रघुनाथराव आणि पर्यायाने आनंदीबाईंची त्या पदावरून हकालपट्टी केली आणि एक वर्षाच्या सवाई माधवराव यांच्या नावाने पेशवेपदाची नव्याने स्थापना केली. आनंदीबाई मध्य प्रदेशात धार प्रांतात गेल्या. तिथेच त्यांनी दुसर्‍या बाजीरावांना जन्म दिला. त्यांच्या जन्मानंतर आठ वर्षांनी धार इथेच रघुनाथरावांचा मृत्यू झाला. इकडे बारभाईंनी सवाई माधवरावांना पेशवे गादीवर बसवून नाना फडणवीस यांच्या अखत्यारीत राज्यकारभार चालू केला. सवाई माधवरावांनी १७९६मध्ये आत्महत्या केल्याने आणि ते निपुत्रिक वारल्याने त्यांच्या जागी पेशव्यांचा अखेरचा वारस म्हणून नानांनी (आणि दौलतराव शिंद्यांनी) अन्य उपाय नाही म्हणून दुसर्‍या बाजीरावाला पेशवाईची वस्त्रे दिली; मात्र मुलगा मराठेशाहीचा पेशवा झाल्याचे सुख आनंदीबाईच्या नजरेला पडले नाही. त्यापूर्वीच ही एक महत्त्वाकांक्षी स्त्री १२ मार्च १७९४ रोजी महाड येथे नैराश्यात मरण पावली होती.

या व्यतिरिक्त गंगाबाई पेशवे म्हणजेच नारायणराव यांची पत्नी व सवाई माधवराव यांची आई यांचा उल्लेखसुद्धा आढळतो. परंतु नारायणरावांच्या निधनानंतर त्या पुरंदरच्या किल्ल्यावर राहायला गेल्या. तिथेच त्यांनी सवाई माधवरावांना जन्म दिला. त्यांच्या जन्मानंतर अवघ्या काही दिवसांत म्हणजे १२ जुलै १७७७ रोजी त्यांचा मृत्यू झाला. 

अशा या पेशवे घराण्यातील स्त्रिया. प्रत्येकीची कथा वेगळी होती, प्रत्येकीचे प्रश्न, विवंचना निराळ्या होत्या. प्रत्येकीने वेगवेगळा संघर्ष केला. पतीचे अकाली निधन. त्यानंतर गृहकलह, राजकारण यांना सामोरे जाणे. इतक्या सगळ्या समस्यांमध्ये मराठेशाहीचा सांभाळ करण्यासाठी पुढील पिढीला घडवणे, ही सगळी तारेवरची कसरत होती. त्यामुळेच त्यांच्या परिचयाशिवाय ही लेखमालिका अपूर्ण राहिली असती. यापुढील लेखात आपण अशीच काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊ या.

(क्रमश:)

(संदर्भ : मायबोली वेबसाइट, चिं. ग. कर्वे यांचे 'आनंदीबाई पेशवे' हे पुस्तक, गोपाळ देशमुख यांचे 'मराठी दौलतीची नारी शिल्पे')

(या लेखमालेतील आधीचे लेख खालील लिंकवर वाचता येतील.)

१. पानिपतची लढाई म्हणजे शौर्याचे प्रतीक... पराभवाची गाथा नव्हे!

२. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - पूर्वार्ध

३. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - उत्तरार्ध

४. मराठेशाहीचे स्वातंत्र्ययुद्ध आणि पेशवाईचा उदय

५. पेशवेकालीन महाराष्ट्र - भाग १ 

६. पेशवेकालीन महाराष्ट्र - भाग २

७. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ

८. पराक्रमी आणि मुत्सद्दी नानासाहेब पेशवे

९. पराक्रमी आणि धोरणी चिमाजीअप्पा

१०. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे

११.सवाई माधवराव पेशवे

१२. मुत्सद्दी, समयसूचक आणि शूर सदाशिवरावभाऊ

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 08-04-2026 News publication date | Time: 03:23 AM News publication time | Views: 545 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 08-04-2026 News publication date | Time: 03:23 AM News publication time | Views: 545 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement