१४ जानेवारी १७६१ रोजी अहमदशहा अब्दाली आणि मराठ्यांमध्ये झालेल्या ऐतिहासिक लढाईची ही थोडक्यात कहाणी.
आपल्या भारतात अनेक अविस्मरणीय युद्धे लढली गेली. त्या युद्धांमुळे त्या त्या वेळी इतिहासाची दिशाच बदलून गेली. मग अगदी त्रेतायुगात झालेले राम-रावणाचे युद्ध असो वा द्वापार युगात झालेले कौरव-पांडवांचे युद्ध असो. मध्ययुगीन कालखंडातल्या अशाच काही युद्धांनी आणि लढायांनी भारताच्या इतिहासाला अजरामर केले आहे. असेच एक युद्ध आणि त्यातील एक महत्त्वपूर्ण लढाई म्हणजे पानिपतची तिसरी लढाई. १४ जानेवारी १७६१ रोजी अहमदशहा अब्दाली आणि मराठ्यांमध्ये झालेल्या या ऐतिहासिक लढाईची ही थोडक्यात कहाणी.
पानिपतची लढाई म्हणजे केवळ एक युद्ध नव्हे, तर महाराष्ट्राच्या रक्ताने लिहिलेला एक स्वाभिमानाचा इतिहास आहे. हे पानिपतच्या लढाईचे वर्णन किती सार्थ आहे ना! इतिहासाने या लढाईला 'मराठ्यांची शोकांतिका' असे नाव दिले असले, तरी खरेच असे होते का? एखादी लढाई हरली म्हणजे युद्ध हरले, असे होऊ शकते का? मराठ्यांचा अख्खा इतिहास संघर्षाचा आहे, जो अगदी शहाजीराजांपासून सुरू होऊन, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या अवघ्या जीवनास व्यापून पराक्रमी पेशव्यांच्या अनेक योद्ध्यांना स्पर्शून गेलेला आहे. पानिपतच्या एका लढाईने त्याला पूर्णविराम लागला का? उलट या लढाईनंतर पेशव्यांनी आपल्या युद्धतंत्रात, रणनीतीत बदल केला. त्यानंतर मराठा वीरांनी त्या पराभवाची जखम नंतरच्या अनेक संग्रामातून भरून काढली.
मुळात पानिपत या स्थानापासून आपण सुरुवात करू या. पानिपत हे हरियाणा राज्याच्या कर्नाल जिल्ह्यातील प्रसिद्ध शहर आहे. हे दिल्लीच्या वायव्येस ८५ किलोमीटर अंतरावर असून दिल्ली-अंबाला हमरस्त्यावर यमुना नदीजवळ वसलेले आहे. पाणिप्रस्थ हे पानिपतचे प्राचीन नाव आहे. अज्ञातवासानंतरच्या वाटाघाटीत युधिष्ठिराने दुर्योधनास पाच गावे (प्रस्थे) मागितली होती. पानिपत हे त्यापैकी एक असावे. हे पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कुरुक्षेत्रात मोडते. महाभारतकालीन इंद्रप्रस्थ व हस्तिनापूर या कौरव-पांडवांच्या राजधान्या कुरुक्षेत्राच्या ज्या परिसरात होत्या, त्याच परिसरात दिल्ली ही हिंदुस्तानची इतिहासकालीन राजधानी वसलेली आहे. त्यामुळे ही राजधानी जिंकण्याच्या उद्देशाने भारताच्या पश्चिमेकडून अथवा वायव्येकडून येणाऱ्या आक्रमकांना डाव्या बाजूस हिमालयाच्या रांगा व उजव्या बाजूस थरचे वाळवंट आणि आरवली पर्वत असल्याने पानिपतमार्गेच येणे शक्य होते. तसेच सैन्याची पाण्याची गरज यमुना नदीमुळे भागवली जात होती. मुसलमानी अमदानीत पानिपतला फार महत्त्व होते.
पानिपतात अनुक्रमे तीन लढाया झाल्या. १५२६, १५५६ आणि १७६१. पानिपतची तिसरी लढाई मैदानी लढाईचे आदर्श उदाहरण होते. या लढाईत पेशव्यांनी पराक्रमाची शर्थ केली. परंतु शत्रूपक्षांच्या हालचालींचा अंदाज न आल्याने लढाईच्या वेळी भाऊसाहेब बुणगे (घोडदळ) पाठीमागे घालून पुढे तोफखाना देऊन चालून गेले.
या लढाईकडे आपण जरा विस्तृतपणे पाहू या - सदाशिवरावभाऊंनी दोन महिने पानिपतावर राहून अब्दालीशी लढा दिला. या दरम्यानच्या काळात मराठ्यांना अन्नधान्यांचा पुरवठा करणाऱ्या गोविंदपंत बुंदेले आणि सरदार बळवंतराव मेहेंदळे हे ठार झाल्याने मराठ्यांच्या सैन्याची फार उपासमार होऊ लागली. वास्तविक पाहता ही लढाई व्हावी असे दोन्ही पक्षांना वाटत नव्हते. याउलट तह करून प्रश्न मिटवावा अशी दोघांचीही विचारसरणी होती. परंतु तहाच्या बोलणीस नजीबखानामुळे यश आले नाही आणि उपासमारीमुळे मरण्यापेक्षा लढून वीरमरण यावे, असेच भाऊरावांना वाटत होते.
१४ जानेवारी १७६१ रोजी मराठा सैन्य इब्राहिम गारद्यांच्या तोफखान्यासह पुढे झाले. गारद्यांचा तोफखाना आणि बंदूकधारी माणसांचे कडे करण्यात आले. इब्राहिमखानाच्या तोफगोळ्यांच्या जोरदार माऱ्यामुळे अब्दालीच्या सैन्याला खिंडार पडले. अब्दालीचे हजारो सैन्य गारद झाले. पायदळ आणि तोफखाना पुढे सरकत असतानाच घोडदळातील काही पथके पुढे गेली. त्यामुळे तोफखाना बंद करावा लागला. परिस्थितीची जाणीव होताच सदाशिवरावभाऊंनी सैन्याची रचना बदलली. भाऊसाहेब आणि विश्वासराव हत्तीवर अंबारीत बसून सैन्याचे नेतृत्व करत होते. अब्दालीच्या सैन्याचे नेतृत्व शहाबलीखान करत होता. त्याच्यावर भाऊसाहेबांनी जोरदार हल्ला चढवला. साखळी भेदून मराठा सैन्य पुढे गेले. या परिस्थितीत अब्दालीने राखीव सैन्याची तुकडी शहाबलीखानाच्या मदतीस पाठवली. 'हर हर महादेव' अशा घोषणा देत मराठे तुटून पडले. परंतु उपासमारीने आणि दीर्घ काळच्या लढाईने ते थकले. अशा प्रतिकूल स्थितीतही ते लढले आणि असामान्य शौर्य त्यांनी दाखवले. या धामधुमीत विश्वासराव यांना गोळी लागली. भाऊसाहेब हत्तीवरून उतरून घोड्यावर स्वार होऊन लढू लागले. आपले दोन्ही शिलेदार हत्तीवर नाहीत, हे पाहून मराठा सैन्य हबकले. तिथेच या लढाईला कलाटणी मिळाली.
खरे तर पानिपतची ही लढाई मराठा सैनिकांच्या अदम्य साहसाचे उदाहरण आहे. परंतु इतिहासात ती शोकांतिका ठरवली गेली. त्या काळी पेशव्यांना आणि पर्यायाने मराठ्यांना उत्तर हिंदुस्तानातील इतर हिंदू शूरवीरांचे सहकार्य मिळाले असते तर चित्र काहीसे वेगळे असते. मराठा सैन्यात त्या काळी जाट, रजपूत, शीख अशा उत्तर हिंदुस्तानी समूहाचे सैनिक होते; पण त्या भागात जो अपेक्षित आधार मिळणे गरजेचे होते, तो मिळाला नाही. मराठ्यांची युद्धनीती गनिमी काव्याची होती. मोकळ्या मैदानातील युद्धाचे तंत्र त्यांना तितकेसे अवगत नव्हते. असे असूनसुद्धा त्यांनी दाखवलेले शौर्य असाधारण होते. समोरासमोरच्या युद्धात ते मुसलमानांपेक्षा कोणत्याही दृष्टीने कमी नव्हते; मात्र मुसलमानांची एकजूट, क्रूरता आणि असहिष्णुता यात मराठे कमी पडले. नजीबखानासारखे कपटी राजकारण मराठ्यांना करता आले नाही.
या लढाईमुळे मराठ्यांना मोठा हादरा बसला होता, तरीही या लढाईनंतर अनेक मराठा सरदारांनी आपल्या फौजेत आमूलाग्र बदल केले. ग्वाल्हेरकर शिंद्यांनी युरोपीय सैन्याच्या धर्तीवर शिस्तबद्ध फौजेची निर्मिती केली. त्यासाठी फ्रेंच सेनापती डी. बॉइन यांच्या मदतीने २० हजार पायदळ, १० हजार नजीब (विशेष पोशाखी सैनिक) व तीन हजार तुर्कस्वार शिपाई तोफखाना तयार केला. अशा फौजेच्या जोरावर पुन्हा एकदा मराठ्यांनी बादशाहावर पूर्ण वर्चस्व मिळवले आणि दिल्लीच्या कारभाराची सूत्रे पुन्हा एकदा आपल्या हातात घेतली. पुढे माधवराव पेशव्यांनी कसोटीच्या या काळात पेशवाई स्वीकारली आणि मराठ्यांचे झालेले नुकसान आपल्या कर्तबगारीने भरून काढले. त्यानंतर राक्षसभुवनची लढाई आणि खर्ड्याची लढाई यांमुळे माधवरावांनी पानिपत लढाईची जखम भरून काढली. खुद्द अहमदशहा अब्दाली याने ही लढाई जिंकूनसुद्धा नंतर पुन्हा कधीच हिंदुस्तानवर चढाई केली नाही. मराठ्यांच्या पराक्रमाची इतकी भयानक जरब त्याच्यावर होती. याला कारण मराठ्यांचे असामान्य शौर्य होते. अशी ही पानिपतची लढाई होती, की जी हरूनसुद्धा मराठे जिंकले होते. इतिहासाला कलाटणी देणाऱ्या लढाईचा आपल्याला सार्थ अभिमान हवा. कारण इथे हरणारे जिंकले होते आणि जिंकलेले मनाने हरले होते. शौर्य शौर्य म्हणतात ते हेच असते ना?
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या म्हणण्याप्रमाणे - मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष आजही पानिपतची माती देते, जिथे रक्ताचा सडा पडला; पण मान झुकली नाही.
(संदर्भ : पेशवाईचा प्रवास - डॉ. कमलेश सोमण, मराठी विश्वकोश)
पानिपत लढाईची पार्श्वभूमी सांगणारे लेख वाचा पुढील लिंकवर...
Comments 1 Comments
Sharad Vinayak Godbole
खुप सविस्तर व छान लेख लिहिला आहे.पानीपत लढाई चा पुर्ण इतिहास कळाला
किती फेक नेरेटविह इतके दिवस सांगत होते
Write a Comment