श्रीमंत थोरले माधवराव पेशवे - अमृत महाराष्ट्र

श्रीमंत थोरले माधवराव पेशवे

पेशवाईवरील लेखमालेतील दहावा लेख...

श्रीमंत थोरले माधवराव पेशवे मुख्य फोटो
मुख्य फोटो

मागील लेखात आपण चिमाजीअप्पांविषयी जाणून घेतले. या भागात आपण धोरणी, संयमी आणि मुत्सद्दी व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचा परिचय करून घेणार आहोत. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचा जन्म १६ फेब्रुवारी १७४५ रोजी झाला. पेशव्यांच्या घराण्यातील ज्या पुरुषाच्या कर्तबगारीने, पराक्रमाने व तेजाने मराठेशाहीच्या इतिहासाला उज्ज्वल स्थान प्राप्त झाले, ते म्हणजे थोरले माधवराव पेशवे. पानिपत युद्धासारख्या प्रचंड आपत्तीनंतर मराठेशाही आणखी पन्नास वर्षे टिकली, त्यात माधवरावांचे योगदान मोठे आहे. १७६१मध्ये नानासाहेब पेशवे यांचा मृत्यू झाल्यानंतर माधवरावांना २० जुलै १७६१ रोजी पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्या वेळी माधवरावांचे वय अवघे १६ वर्षे होते. बाळाजी विश्वनाथ, बाजीराव पेशवे आणि नानासाहेब अशा तीन पेशव्यांच्या कर्तबगारीने मराठेशाहीचा लौकिक भारतभर पसरला होता. पानिपतच्या लढाईत सदाशिवराव व विश्वासराव ही पेशव्यांच्या घराण्यातील दोन रत्ने धारातीर्थी पडली होती. जनकोजी शिंदे, यशवंतराव पवार, बळवंतराव मेहेंदळे, गोविंदपंत बुंदेले वगैरे नामांकित सरदार मारले गेले होते आणि जवळजवळ दोन लाख माणसांचा या प्रचंड रणसंग्रामात नरसंहार झाला होता. अशा विदारक परिस्थितीत नानासाहेबांनंतर पेशवाईची वस्त्रे माधवरावांना मिळाली होती. 

खडतर परिस्थितीतही खंबीरपणे आणि आश्वासक पद्धतीने शासन करण्याचे बाळकडू माधवरावांना लहानपणीच मिळाले होते. पेशव्यांच्या घराण्यात लहान मुलांना योग्य गृहशिक्षण देण्याकडे विशेष लक्ष पुरवले जाई. मोडी लिपी, लेखन, वाचन, हिशेब, संस्कृत, घोड्यावर बसणे, शस्त्र-शास्त्रांत प्रावीण्य असे विविधांगी शिक्षण दिले जाई. माधवरावांच्या लहानपणी तर घरात नानासाहेब, सदाशिवराव व रघुनाथराव यांच्यासारखे कर्ते पुरुष असल्याने व विशेषत: सदाशिवरावांच्या कडक आणि शिस्तप्रिय शिक्षणामुळे माधवरावांच्या अंगी हेच गुण उतरले होते. लहानपणापासूनच कडक, तरतरीत, शिस्तप्रिय असा त्यांचा स्वभाव होता. 

माधवरावांना पेशवाईची वस्त्रे मिळाली तेव्हा मराठेशाहीची अवस्था खूपच बिकट होती. नानासाहेब, सदाशिवराव, विश्वासराव हे तिन्ही कर्ते पुरुष गेले होते. ज्या घरातील एकही माणूस पानिपत युद्धात मारला गेला नाही, असे महाराष्ट्रात क्वचित एखादे घर त्या काळी सापडले असेल. एकूणच पानिपतच्या पराभवाने मराठ्यांचा आत्मविश्वास काही अंशी डगमगला होता. मराठ्यांचे शत्रू पुन्हा एकदा डोके वर काढू लागले होते. जानोजी भोसले, निजाम, जंजिऱ्याचा हबशी यांना पेशव्यांविरुद्ध जाण्याची संधी मिळाली. हैदरअलीसारख्या नवीन शत्रूला स्फुरण चढले होते. पेशव्यांच्या घरातही त्या काळी गृहकलह चालू होता. रघुनाथरावांना पेशवेपद हवे होते. परंतु त्यांना माधवरावांना हे पद द्यावे लागले. त्यामुळे साहजिकच त्यांनी आणि त्यांचे विश्वासू सखारामबापूंनी माधवरावांना सहकार्य करणे टाळले. उलटपक्षी निजामासारख्या कावेबाज शत्रूशी हातमिळवणी करून त्यांनी मराठ्यांना अडचणीत आणण्याचा कायम प्रयत्न केला. माधवराव पेशवेपदी असले, तरी प्रत्यक्ष कारभार रघुनाथराव आणि सखारामबापूच पाहात होते. पानिपत युद्धाच्या अवाढव्य खर्चामुळे पेशव्यांचा खजिना रिकामा झाला होता. अशा परिस्थतीतही या सगळ्याला धैर्याने तोंड देऊन, माधवरावांनी हे पेशवेपद अकरा वर्षे सांभाळले. पानिपतच्या कटू आठवणी विसरायला लावून पुन्हा मराठ्यांचे वर्चस्व, वैभव व दरारा हिंदुस्थानातील सर्व राजांना कबूल करायला भाग पाडले ते माधवरावांनीच! या सगळ्यामुळे माधवराव पेशवे यांचे कार्य खरोखर प्रशंसनीय आहे. 

माधवराव पेशवे यांची कारकीर्द गाजली ती राक्षसभुवनच्या लढाईने. काय होती ही मोहीम? साधारण १७६३च्या मध्यात पेशवे आणि निजाम यांच्यातील कलह वाढला होता. निजामाशी मैत्री करूनही राघोबादादांना फारसे काही मिळाले नाही. कपटी निजामाने राघोबादादांशी मैत्रीचे नाटक करून उदगीर व आजूबाजूचा प्रांत मराठ्यांच्या ताब्यातून काढून घेतला होता. इतकेच नाही, तर त्याने पुण्यावर आक्रमण केले. पुण्यावर आक्रमण झाले तेव्हा पेशव्यांच्या फौजा पुण्यापासून लांब होत्या. निजामाच्या फौजांनी पुण्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. या धामधुमीमुळे माधवरावांच्या मातोश्री गोपिकाबाई यांना सिंहगडावर जावे लागले. पर्वती मंदिर, पंढरपूरचे देवालय अशी मंदिरे निजामाने उद्ध्वस्त केली. पेशव्यांच्या फौजा पुण्याजवळ आल्या आहेत, अशी खबर निजामाला पाच ऑगस्ट १७६३ रोजी मिळाली. हे समजताच तो बीडमार्गे हैदराबादकडे पळून गेला. निजामाने त्याचा सेनापती विठ्ठल सुंदर याच्याकडे लढाईची सारी सूत्रे दिली होती. १० ऑगस्ट १७६३ रोजी मराठे आणि निजामाच्या फौजा भिडल्या. रघुनाथराव आणि विठ्ठल सुंदर यांच्यात तुंबळ युद्ध झाले. त्या वेळी माधवराव पेशवे रघुनाथरावांच्या मदतीला आले. ते स्वत: घोड्यावर स्वार होऊन त्यांच्या फौजेसहित विठ्ठल सुंदरशी लढू लागले. मराठे आणि निजामाचे सैन्य यांच्यात घनघोर लढाई झाली. विठ्ठल सुंदर यात मारले गेले. निजामाच्या क्रूरपणाने मराठे आधीच चिडले होते. त्यामुळे त्यांनी त्वेषाने लढा दिला. निजामाच्या सैन्याचा पाठलाग करून त्यांना ठार मारले. माधवराव आणि त्यांच्या सैन्याचा पराक्रम हताशपणे बघणे, एवढेच निजामाच्या हातात होते. 

या राक्षसभुवनच्या लढाईमुळे पेशव्यांपासून दुरावलेले सरदार पुन्हा पेशव्यांना येऊन मिळाले. १७६५मध्ये हैदरअलीने मराठ्यांच्या ताब्यात असलेले सावनूर, बेदनूर, करनूर आणि कडाप्पा या प्रांतांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. त्या वेळी माधवराव पेशव्यांनी गोपाळराव पटवर्धन यांना या मोहिमेवर पाठवले. त्यांनी हैदरअलीवर अचानक आक्रमण केले. हैदरअलीचा या युद्धात पराभव झाला. अशा पद्धतीने मराठ्यांनी पुन्हा या प्रांतावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या युद्धामुळे हैदरअली खूप घाबरला होता. त्यानंतर कित्येक वर्षे त्याने बेदनूरचे जंगल ओलांडण्याची हिंमत केली नाही.

माधवरावांच्या कारकीर्दीतला परमोच्च क्षण म्हणजे दिल्लीच्या गादीवर मुघल बादशाह शाहआलम दुसरा याला पुन्हा बसवणे व पानिपतच्या लढाईनंतर गमावलेला प्रदेश पुन्हा हस्तगत करणे. शाहआलम दुसरा याने बंगाल-बिहार प्रांतात इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी शूजाउद्दौला यास प्रमुख नेमले होते. १७६४मध्ये इंग्रजांनी शूजाच्या सैन्याचा बक्सरच्या लढाईत पराभव केला. शेवटी शाहआलमला इंग्रजांपुढे नमते घेऊन त्यांच्याशी हातमिळवणी करावी लागली. इंग्रजांनी याचा फायदा घेऊन बंगाल व बिहार प्रांतामध्ये आपले बस्तान बसवले. महादजी शिंदे, मल्हारराव होळकर या जुन्या आणि जाणत्या सरदारांनी इंग्रजांचे हे कारस्थान ओळखले. त्यांनी माधवराव पेशव्यांना शाहआलमचे राज्य पुनर्प्रस्थापित करण्यास सांगितले. खरे तर त्याआधीच म्हणजे १७६८मध्ये माधवरावांनी रामचंद्र गणेश कानडे, महादजी शिंदे, विसाजी कृष्ण बिनीवाले, तुकोजी होळकर यांना ५० हजारांचे मराठा सैन्य देऊन उत्तरेकडे कूच करण्यास सांगितले. खासकरून बनारस, प्रयाग यांसारखी तीर्थक्षेत्रे मुक्त करण्याचेही आदेश दिले. या मोहिमेत पुढे जाटांचा पराभव झाला. जयपूरचे प्रतापसिंह मराठ्यांना येऊन मिळाले. पाच एप्रिल १७७० रोजी गोवर्धनच्या लढाईत मराठ्यांनी नवलसिंगाचा पराभव केला. आग्रा, मथुरा जिंकले. दरम्यान माधवरावांनी पुण्याहून आणखी कुमक पाठवली. मराठ्यांनी फरुखाबाद हस्तगत केले. यात नजीबखान आणि बंगश या दोघांचे मृत्यू झाले. अशा पद्धतीने मराठ्यांनी शाहआलम दुसरा याला पुन्हा प्रस्थापित तर केलेच. परंतु इतर प्रदेशही मुक्त केला. या मोहिमेमुळे अंतर्गत कुरबुरीतून दुरावलेल्या मराठा सरदारांना माधवराव पेशव्यांनी पुन्हा एकत्र आणले. मराठे पुन्हा एकत्र झाले ते माधवराव पेशव्यांच्या धोरणी राज्यकारभारामुळे!

थोरले माधवराव पेशवे यांच्या कारकीर्दीतच महादजी शिंदे या शूर सरदाराचा उदय झाला. राणोजी शिंदे यांचे पुत्र म्हणजे महादजी शिंदे. १७६२मध्ये ते पेशव्यांच्या संपर्कात आले. मिरजेवरील स्वारीत त्यांनी पेशव्यांना मदत केली होती. माधवरावांनी कायम महादजी शिंदे यांची बाजू घेतली. त्यांना शिंदे यांच्या कर्तृत्वावर विश्वास होता. माधवराव पेशवे यांनी इंग्रजांना पुरते ओळखले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत इंग्रजांशी कधीच तह केला नाही. हैदरअलीविरुद्ध लढण्यासाठी इंग्रजांनी जेव्हा मदतीची तयारी दाखवली तेव्हा त्यांनी ती नाकारली. त्यांच्या मते एका शत्रूचा पराभव करण्यासाठी दुसऱ्या शत्रूची मदत घेणे देशहिताचे नाही.

माधवराव पेशवेपदी आले तेव्हा त्यांचे वय १६ वर्षे होते. त्यांचा आयुष्यभराचा प्रवास खूपच खडतर होता. निजाम-हैदरसारखे शत्रू, अंतर्गत कलह, साताऱ्याच्या छत्रपतींना मदत, उत्तरेतील सत्तेची पुनर्स्थापना, दिल्लीच्या बादशहाला गादीवर बसवणे, मराठ्यांचा दरारा पुन्हा निर्माण करणे, पानिपत युद्धानंतर विस्कळीत झालेली मराठा सरदारांची फळी पूर्ववत करणे अशा अनेक प्रकारच्या बिकट परिस्थितीतून जाताना माधवरावांची शारीरिक परिस्थिती खालावली. त्यांना राजयक्ष्मा क्षय व्याधीने ग्रासले. १७७०मध्ये माधवराव दक्षिण मोहिमेवर निघाले असताना असह्य वेदनांमुळे ते मिरजेलाच थांबले. अखेरीस या पराक्रमी, धीरोदात्त पेशव्यांचे १८ नोव्हेंबर १७७२ रोजी निधन झाले. लहान वयातही असामान्य असा समजूतदारपणा, स्वकीयांच्या स्वार्थी कारस्थानांपुढे हरून न जाता परकीय शत्रूंचा केलेला मुकाबला अशा अनेक गोष्टी श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांना अजरामर करतात! 

पुढच्या लेखात आणखी एका पराक्रमी पेशव्यांची माहिती घेऊ या. 

(क्रमश:)

(संदर्भ : सखाराम सहस्रबुद्धे लिखित पुस्तक 'श्रीमंत थोरले माधवराव पेशवे' आणि इतर संकलित माहिती) 

(या लेखमालेतील आधीचे लेख खालील लिंकवर वाचता येतील.)

१. पानिपतची लढाई म्हणजे शौर्याचे प्रतीक... पराभवाची गाथा नव्हे!

२. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - पूर्वार्ध

३. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - उत्तरार्ध

४. मराठेशाहीचे स्वातंत्र्ययुद्ध आणि पेशवाईचा उदय

५. पेशवेकालीन महाराष्ट्र - भाग १ 

६. पेशवेकालीन महाराष्ट्र - भाग २

७. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ

८. पराक्रमी आणि मुत्सद्दी नानासाहेब पेशवे

९. पराक्रमी आणि धोरणी चिमाजीअप्पा



Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 18-03-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 124 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 18-03-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 124 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement