पेशवेकालीन महाराष्ट्र - भाग १

केवळ लढाया जिंकून मराठा साम्राज्य वाढवणे एवढाच उद्देश न ठेवता आपल्या जनतेच्या भल्यासाठी, चांगल्या राहणीमानासाठीही पेशव्यांनी अनेक प्रयत्न केले. त्याचा आढावा घेणारा हा पेशवाईवरील लेखमालेतील पाचवा लेख...

पेशवेकालीन महाराष्ट्र - भाग १ मुख्य फोटो
मुख्य फोटो

या लेखमालेच्या चौथ्या भागात आपण मराठेशाहीचे स्वातंत्र्ययुद्ध आणि पेशवाईचा उदय याविषयी माहिती घेतली. 'पेशवेपद' हे अत्यंत जबाबदारीचे पद होते. शाहू महाराजांनी छत्रपतिपदाची सूत्रे हाती घेऊन नवीन राजवटीला प्रारंभ केला होता. या राजवटीत अनेक मराठी सरदार नव्याने आले. आपल्या पराक्रमाने त्यांनी इतिहास घडवला. त्यात पेशवा बाळाजी विश्वनाथ आणि पेशवा बाजीराव या दोन पेशव्यांची सुमारे ३३ वर्षांची पराक्रमी कारकीर्द होती. मराठ्यांच्या राज्याचा चहूबाजूंनी विस्तार झाला. त्याच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या. ते राज्यापासून स्वराज्य आणि स्वराज्यापासून साम्राज्य बनले. पेशव्यांनी दाखवलेली कर्तबगारी आणि शाहू महाराजांचे धोरण यांमुळे अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठ्यांचे राज्य निर्धाराने पुन्हा उभे राहिले, वाढत गेले. जवळजवळ मोडून पडलेले छत्रपतींचे साम्राज्य पेशव्यांनी पुन्हा उभे केले.

औरंगजेब १७०७ साली मरण पावला, त्या वेळी महाराष्ट्रात येऊन त्याला २४ वर्षे झाली होती. त्याआधीही अनेक आक्रमकांनी महाराष्ट्रावर सतत आक्रमणे केली होती. यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्राची प्रगती खुंटली होती. छत्रपती शाहू महाराज मुघलांच्या अटकेतून सुटून साताऱ्याच्या गादीवर बसले, त्याच वेळी महाराष्ट्राच्या अर्वाचीन सांस्कृतिक जीवनाला प्रारंभ झाला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जवळजवळ ४०० वर्षे महाराष्ट्र मुसलमानी संस्कृतीच्या टापेखाली सापडला होता. हजारो तुर्क, पठाण, अरब महाराष्ट्रात कुटुंबांसह राहायला आले होते. अनेक मुसलमानी सुलतानांनी हिंदू स्त्रियांशी विवाह केले. अशा प्रकारे मूळ महाराष्ट्रीय संस्कृती लयाला गेली होती. शाहू महाराजांच्या राज्यारोहणानंतर त्यांनाच या बिकट परिस्थितीतून वाट काढायची होती. घरे, वाडे, देवी-देवतांच्या मूर्ती, बागबगीचे सर्व काही नव्याने उभारायचे होते. धर्माचे पुनरुज्जीवन करून शास्त्री, पंडित, वैदिक, हरिदास यांची नवी पिढी तयार करायची होती. सर्वत्र हिंदू धर्म व हिंदू संस्कृतीची प्रभा फाकवायची होती. या भगीरथ प्रयत्नांची सुरुवात छत्रपती शाहू महाराज आणि पेशव्यांच्या काळात झाली. महाराष्ट्राच्या सुधारणेची मुहूर्तमेढ प्रथम शाहू महाराजांनी रोवली व त्यांच्या पश्चात पेशवे आणि इतर सरदार यांनी ती सुधारणा उत्कर्षास नेली आणि नाना फडणवीसांच्या साह्याने सर्वार्थाने सवाई माधवरावांच्या कारकिर्दीत तिचा कळसाध्याय लिहिला गेला. 

मोठी शहरे आणि टुमदार गावे वसवणे हे देशसुधारणेचे पहिले काम होते. स्वत: पेशव्यांनी आपली कर्मभूमी म्हणून पुण्याची निवड केली होती. कारण दळणवळण आणि इतर गोष्टींमुळे पुणे सोयीचे होते. त्या वेळी पुणे शहर आतासारखे मोठे नव्हते. तेव्हा पुणे म्हणजे अनेक कसब्यांनी बनलेले गाव होते. पुणे, कुमारी व कासारी अशी तीन खेडी होती. ही जवळजवळची खेडी मिळून पुणे गाव होते. मुसलमानांच्या आक्रमणानंतर अनेक शहरांप्रमाणे पुण्यातही अनेक मंदिरांची आणि देवी-देवतांच्या मूर्तींची तोडफोड झाली. पेशव्यांनी पुण्यात आपली कार्यसूत्रे हलवल्यानंतर पुण्याच्या आसपासची इतर लहानसहान खेडी एकत्र करून त्यांचे नव्या पेठांमध्ये रूपांतर केले गेले. अशा पद्धतीने पेशव्यांनी पुण्याला शहराचे रूप दिले. पुण्यात सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, कसबा पेठ अशा पेठांची सुरुवात झाली. पेठ निर्माण केल्यानंतर त्या पेठेचे वतन देण्यात आले. वतन म्हणजे ती पेठ वसवायची. त्यात अनेक लहानसहान उद्योग सुरू करायचे. त्या निमित्ताने अनेक रोजगार निर्माण करायचे ही जबाबदारी एका विशिष्ट माणसाला दिली गेली. जो कोणी ही जबाबदारी उत्तम पद्धतीने पार पाडेल, त्याला अब्दागिरी व दिवटी देऊन पेशवे त्यांचा गौरव करत. गरीब किंवा मध्यम स्थितीतील लोकांना नव्या पेठेत घर बांधण्याची ऐपत नसेल, तर त्याला तगाई (आर्थिक मदत) देत. त्या काळी पुण्यातील धनाढ्य कुटुंबांनीही पेठांची जबाबदारी घेतली. त्या पेठेला त्यांचे नाव दिले गेले. उदा. सरदार रास्ते यांनी १७७८ साली आपला वाडा बांधून निर्माण करून रास्ता पेठ उभारली. 

पूर्वी अनेक मुघल सरदार मोठ्या शहरात आक्रमणे करून त्या शहराची नासधूस करत. पुणे शहरावरही अशी आक्रमणे होत होती. अशा वेळी हे आलेले संकट गेल्यावर त्याची भरपाई पेशवे करत. शहरातून पळून गेलेले व्यापारी व इतर व्यावसायिकांना परत राहायला देऊन त्यांना जकातमाफी, गुरे-ढोरे देणे, सवलती देणे अशा उपाययोजना करत. जी घरे उद्ध्वस्त झाली ती घरे बांधण्यासाठी कारागिरांना आणि कामगारांना पेशवे सहकार्य करत. फक्त पुणेच नाही, तर इतर अनेक गावांच्या वाढीसाठी पेशव्यांनी अशाच सवलती दिल्या आहेत. अशा नवीन शहरांमध्ये वास्तव्याला असणाऱ्यांना तीन ते पाच वर्षांची घरपट्टी माफ केली गेली. त्याचप्रमाणे नव्या शहरांचा विकास व्हावा म्हणून त्या काळी चलनात असणारे होन व रुपये यांची टाकसाळ घालण्याची परवानगी पेशव्यांनी दिलेली होती. त्यामुळे तेथील स्थानिक उद्योगांना चालना मिळाली. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर ताब्यात आल्यानंतर पेशव्यांनी तिथेही अशा सोयी केल्या होत्या. 

अशा प्रकारे नवीन शहरे वसवणे व जुन्या शहरांचा विकास करणे हे पेशव्यांचे प्रमुख कार्य होते. पेशव्यांप्रमाणेच त्यांचे इतर सरदारही आपापल्या जहागिरीतील शहरे, गावे व क्षेत्रे वसवण्याचे काम करत. शहरे, गावे वसवली तरी त्यांना सुंदर व भव्य इमारतींशिवाय प्रतिष्ठा नाही. या दृष्टीने पेशव्यांनी आणि त्यांच्या सरदारांनी आपापल्या शहरी, गावी व क्षेत्रात अनेक लहानमोठ्या प्रेक्षणीय इमारती बांधल्या. उदा. शनिवारवाडा. शनिवारवाड्यासारख्या अनेक उत्कृष्ट इमारती बांधताना त्या कामी असणारे कारागीर, कामगार, व्यापारी यांना योग्य मोबदला दिला जाई. त्यांची देखभाल, जेवण्याची सोय, राहण्याची सोय उत्तम होईल याकडे पेशव्यांचे जातीने लक्ष असायचे. अशा वेळी या कामाकरिता हजारो लोक परमुलुखातून महाराष्ट्रात आले. इथल्या अनेक पेठांमध्ये राहू लागले. अशा पद्धतीने रोजगार आणि त्यातून सर्वांगीण विकास पेशव्यांनी केला होता. अनेक क्षेत्रांच्या ठिकाणीसुद्धा अशाच प्रकारे नवनवीन बांधकामे पेशव्यांच्या काळात झाली आहेत. उदा. पंढरपूर, नाशिक, थेऊर इत्यादी. ही अनेक शहरे वसवताना पेशवे तेथील स्थानिक रोजगाराला, कारागिरांना चालना देत असत. उदा. अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर येथे काही इमारतींचे बांधकाम करताना लागणारा चुना हा पारनेर येथून आला होता. फक्त देवालये किंवा घाट न बांधता त्या आसपासचा परिसरही सुशोभित करणे हे पेशव्यांचे वैशिष्ट्य होते. उदा. मनकर्णिकेचा घाट, बनेश्वर मंदिर, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील मंदिरे, कृष्णेचा घाट, वाईचा घाट, इत्यादी.

पेशवाईत गावागावांमधील व प्रांताप्रांतांमधील दळणवळणाकरिता रस्ते चांगले होते. यासाठी बहुतेक ठिकाणी पेशव्यांनी दगडी रस्ते बनवले होते. तसेच पाणीपुरवठ्यासाठीही अनेक ठिकाणी हौद, विहिरी बांधणे या कामांसाठी पेशवे अर्थसाह्य करत. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची सोय होती. परंतु फक्त नदीकाठी वस्त्या न राहता त्यांचा विस्तार व्हावा, शहरे, गावे मोठी होत जावीत, सर्वांना पाण्याची उत्तम सोय मिळावी, हाच पेशव्यांचा उद्देश होता. प्रत्येक शहरात अशा प्रकारे पाणीपुरवठ्याचे काम तेथील सरदारांच्या देखरेखीखाली होत असे. अनेक ठिकाणी तळी बांधण्याचे काम पेशव्यांनी केलेले आहे. अनेक बखरींमध्ये पेशव्यांचे पत्रव्यवहार सापडतात. 

अशा पद्धतीने केवळ लढाया जिंकून मराठा साम्राज्य वाढवणे एवढाच उद्देश न ठेवता आपल्या जनतेच्या भल्यासाठी, चांगल्या राहणीमानासाठी पेशव्यांनी अनेक प्रयत्न केले. जनतेची काळजी घेतली. केवळ योद्धा म्हणून नाही, तर शासक म्हणूनही पेशवे तेवढेच पराक्रमी आणि द्रष्टे होते. नगररचना, देवालये आणि पाणीपुरवठा या बाबतीत पेशव्यांचे व्यवस्थापन कसे होते, ते या लेखातून आपल्या लक्षात आले असेलच. पुढच्या लेखात माहिती घेऊ या पेशव्यांच्या इतर व्यवस्थापनाबाबतीतल्या दूरदृष्टीबद्दल...

(क्रमश:)

(संदर्भ - महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास - पेशवेकालीन महाराष्ट्र - वा. कृ. भावे, मराठी रियासत - खंड ३)

.......

(या लेखमालेतील आधीचे लेख खालील लिंकवर वाचता येतील.)

१. पानिपतची लढाई म्हणजे शौर्याचे प्रतीक... पराभवाची गाथा नव्हे!

२. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - पूर्वार्ध

३. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - उत्तरार्ध

४. मराठेशाहीचे स्वातंत्र्ययुद्ध आणि पेशवाईचा उदय




Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 11-02-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 342 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 11-02-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 342 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words