प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट??

डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-७

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट?? मुख्य फोटो
मुख्य फोटो

रोहनचा दिवस जिममध्ये सुरू होतो आणि सोशल मीडियावर संपतो. प्रत्येक व्यायामानंतर तो अनेक सेल्फी, व्हिडिओ आणि "No Pain, No Gain" अशा कॅप्शनसह पोस्ट टाकतो.

अनन्या घराबाहेर पडण्यापूर्वी चाळीस-पन्नास सेल्फी काढते, त्यावर विविध फिल्टर्स वापरते आणि त्यातून सर्वात परफेक्ट फोटोच पोस्ट करते. त्यानंतर बराच वेळ ती लाईक्स, कमेंट्स आणि व्ह्यूजची संख्या मोजत बसते.

कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मीरासाठी तर दिवसातील प्रत्येक क्षण हा कंटेंट असतो. सकाळचा चहा, अभ्यास, मैत्रिणींसोबतच्या गप्पा, अगदी जेवणसुद्धा आधी कॅमेऱ्यात कैद होतं आणि मग अनुभवलं जातं.

अमित तर AI च्या मदतीने स्वतःचे आलिशान गाड्या, पंचतारांकित हॉटेल्स आणि परदेश प्रवास दाखवणारे फोटो तयार करून पोस्ट करतो; प्रत्यक्षात मात्र त्याने यापैकी काहीच अनुभवलेलं नसतं.

या सगळ्या उदाहरणांमध्ये समान धागा एकच आहे.स्वतःचं आयुष्य जगण्यापेक्षा स्वतःची आकर्षक डिजिटल प्रतिमा घडवणं आणि इतरांकडून सतत कौतुक, लक्ष व मान्यता मिळवण्याची गरज. जेव्हा "मी कोण आहे?" यापेक्षा "लोक मला कसं पाहतात?" हा प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटू लागतो, तेव्हा डिजिटल नार्सिसिझमची सुरुवात झालेली असू शकते.

नार्सिसिझम म्हणजे स्वतःविषयी अवास्तव मोठेपणाची भावना बाळगणं आणि सतत स्वतःकडेच लक्ष वेधून घेण्याची इच्छा. स्वतःचं सतत कौतुक व्हावं, इतरांनी आपली दखल घ्यावी, स्वतःच्याच यश, रूप किंवा आयुष्याभोवती विचार फिरत राहणं, इतरांच्या भावनांकडे फारसं लक्ष न देणं ही त्याची काही लक्षणं आहेत. प्रत्येकामध्ये थोड्याफार प्रमाणात आत्ममुग्धता असू शकते आणि ती नेहमीच हानिकारक असते असं नाही. मात्र ती अतिरेकी झाली, तर नातेसंबंध, मानसिक स्वास्थ्य आणि व्यक्तिमत्त्वावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. अर्थात, 'नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर' हा वैद्यकीय मनोविकार आहे, तर नार्सिसिझम ही एक स्वभाववैशिष्ट्याची प्रवृत्ती आहे.

लाईक्स आणि कमेंट्सवरच स्वतःचा आनंद अवलंबून असणं, प्रत्येक पोस्ट परिपूर्ण दिसावी यासाठीचा अट्टहास, वास्तवापेक्षा अधिक आकर्षक डिजिटल प्रतिमा तयार करणं, इतरांच्या लोकप्रियतेचा हेवा वाटणं, टीका सहन न होणं आणि सतत स्वतःलाच केंद्रस्थानी ठेवण्याची इच्छा—ही डिजिटल नार्सिसिझमची काही ठळक लक्षणं म्हणता येतील.

सोशल मीडियामुळे ही प्रवृत्ती आणखी वाढण्यास पोषक वातावरण मिळालं आहे. आपण टाकलेल्या पोस्टवरील लाईक्स, कमेंट्स, शेअर्स आणि फॉलोअर्स यांतून मिळणारा झटपट आनंद (डोपामिन) पुन्हा पुन्हा तसाच अनुभव घ्यायची इच्छा निर्माण करतो. मग काय खाल्लं, कुठे गेलो, कोणाला भेटलो, काय विकत घेतलं किंवा काय केलं—प्रत्येक गोष्ट इतरांना दाखवण्याची आणि त्यातून मान्यता मिळवण्याची सवय लागते. जेव्हा वास्तवापेक्षा डिजिटल प्रतिमा अधिक महत्त्वाची वाटू लागते, तेव्हा डिजिटल नार्सिसिझमची बीजं रुजू लागतात.स्वतःच्या ऑनस्क्रीन प्रतिमेच्या प्रेमात पडण्याची ही वाढती प्रवृत्ती आज जगभरातील मानसशास्त्रज्ञांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

सोशल मीडियाची रचनाच अशी आहे की, ती आपल्याला सतत स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रोत्साहन देते. प्रत्येक लाईक, कमेंट, शेअर किंवा नवीन फॉलोअर हा मेंदूसाठी एका छोट्याशा बक्षिसासारखा असतो. या प्रतिसादामुळे मेंदूमध्ये डोपामिन हे रसायन स्रवतं आणि आनंदाची भावना निर्माण होते. त्यामुळे पुन्हा तसाच प्रतिसाद मिळावा म्हणून आणखी पोस्ट करणं, फोटो एडिट करणं किंवा स्वतःची प्रतिमा अधिक आकर्षक दाखवण्याचा प्रयत्न सुरू राहतो.

डिजिटल नार्सिसिझमचे परिणामही हळूहळू दिसू लागतात. सोशल मीडियावरील प्रतिमा अधिक आकर्षक दिसावी म्हणून महागडे ब्रँड्स, आलिशान कॅफे-रेस्टॉरंट्स, अॅडव्हेंचर ट्रिप्स किंवा केवळ 'फोटोसाठी' केलेला खर्च वाढू शकतो. काहीजण अनुभवाचा आनंद घेण्यापेक्षा तो इतरांना कसा दिसेल, यालाच अधिक महत्त्व देऊ लागतात. प्रवासाचा आनंद घेण्यापेक्षा 'Instagram-worthy' फोटो मिळवणं अधिक महत्त्वाचं वाटू लागतं. सोशल मीडियावर आपलं आयुष्य कायम परिपूर्ण, आनंदी आणि यशस्वीच दिसलं पाहिजे, हा अट्टहास वाढत जातो. पण परिपूर्ण प्रतिमा जपण्याच्या या धडपडीत वास्तवातील आनंद, सहजता आणि नात्यांमधील नैसर्गिकपणा हरवू लागतो.

डिजिटल नार्सिसिझमचा परिणाम फक्त सोशल मीडियापुरता मर्यादित राहत नाही. सतत स्वतःची तुलना इतरांशी करणं, टीका सहन न होणं, कौतुक न मिळाल्यास निराश होणं, नात्यांमध्ये स्वतःलाच केंद्रस्थानी ठेवणं आणि वास्तवापेक्षा ऑनलाइन प्रतिमेला जास्त महत्त्व देणं अशा समस्या वाढू शकतात. अशा वेळी व्यक्ती स्वतःचं आयुष्य जगण्यापेक्षा ते इतरांना कसं दिसेल, याचाच अधिक विचार करू लागते.

याचा अर्थ सोशल मीडियावर फोटो टाकणं, स्वतःचं यश शेअर करणं किंवा आनंदाचे क्षण इतरांसोबत वाटून घेणं चुकीचं आहे, असा अजिबात नाही. प्रश्न एवढाच आहे की, आपण पोस्टसाठी जगतोय की आयुष्यासाठी? एखादी पोस्ट कमी लोकांनी पाहिली म्हणून आपला आनंद कमी होऊ नये आणि जास्त लाईक्स मिळाले म्हणून स्वतःची किंमत वाढली, असंही वाटू नये. अधूनमधून काही क्षण कॅमेऱ्याशिवाय जगणं, प्रत्येक गोष्ट पोस्ट न करणं आणि स्वतःची तुलना फॉलोअर्स किंवा लाईक्सच्या आकड्यांशी न करणं, ही डिजिटल नार्सिसिझमपासून दूर राहण्याची सोपी सुरुवात ठरू शकते.

- विनय मधुकर जोशी

• संगणक अभियंता

• खगोलशास्त्र आणि भारतीय विद्येचे अभ्यासक

• डिजिटल माध्यमांचा परिणाम याविषयी जनजागृतीत सहभाग

• अमृत महाराष्ट्र अतिथी स्तंभलेखक

ई-मेल:- vinayjoshi23@gmail.com


डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-१ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

भद्रं पश्येम अक्षभि - आम्ही डोळ्यांनी नेहमी मंगलकारक आणि शुभ पाहावे.

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2081

डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-२ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

टेक्नोफरन्सचा अदृश्य पिंजरा

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2189

डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-३ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

बहुतेक फोन आलाय ..?

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2329


डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-४ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

शुभरात्री... की शुभस्क्रोलिंग?

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2497


डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-५ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

आपल्या मेंदूला स्मरण ठेवण्याचे ‘स्मरण’ करा !! 'डिजिटल अम्नेशियाने ग्रासतोय का आपला मेंदू?

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2679


डिजिटल डिटॉक्स- लेख क्रमांक-६ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

दिसामाजी काहीतरी ते लिहावे

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2824

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 09-08-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 44 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 09-08-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 44 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement