पेशवाईवरील लेखमालेतील पंधरावा (अखेरचा) लेख...
या लेखमालिकेतील मागील लेखात आपण बाजीराव पेशवे यांचे युद्धकौशल्य, रणनीती आणि पराक्रम यांविषयी जाणून घेतले. लेखमालिकेच्या या अखेरच्या भागात आपण बाजीराव पेशवे एक उत्तम प्रशासक कसे होते, याचा आढावा घेऊ या.
इतिहासाने अनेक महान संस्कृतींचा उदय आणि अस्त पाहिला आहे. आपल्या प्रदीर्घ इतिहासात, हिंदू संस्कृतीने आपल्या संस्कृतीवरील, सभ्यतेवरील, स्वातंत्र्यावरील असंख्य हल्ले झेलले आहेत. परंतु, आपल्या संस्कृतीला वाचविण्यासाठी, भारतमातेचे रक्षण करण्यासाठी अनेक पराक्रमी वीरही याच भूमीत जन्माला आले आहेत. अशा पराक्रमी योद्ध्यांचा समृद्ध वारसा आपल्याला लाभला आहे. त्या समृद्ध परंपरेतील असामान्य योद्धा असे बाजीराव पेशव्यांचे सार्थ वर्णन करता येईल! बाजीराव पेशवे हे भारताच्या इतिहासातील १८व्या शतकातील हिंदू धर्माचे महान योद्धे आणि संरक्षकांपैकी एक होते.
थोरल्या बाजीरावांनी मराठी सत्तेचा झेंडा उत्तरेत फडकवल्याने जसे त्यांना बृहत्तर महाराष्ट्राचा संस्थापक म्हटले गेले, तसेच पुण्याचेही संस्थापक बाजीराव पेशवे आहेत. उत्तरेकडील मोहिमांसाठी पुणे शहर सोईचे वाटल्याने त्यांनीच छत्रपती शाहू महाराजांची मर्जी संपादून पुणे हे आपले निवासस्थान बनवले. त्यांनी बांधलेला भव्य शनिवारवाडा त्या काळी देशाच्या राजकारणाचा मध्यबिंदू बनला. बाजीराव आणि चिमाजीअप्पा यांनी खरेच मराठी सत्तेचा दबदबा दख्खनपासून रुमशेपर्यंत पसरवला. मराठ्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली. बर्नाड मॉन्टगोमेरी या ब्रिटिश फिल्डमार्शलने बाजीरावांची स्तुती पुढील शब्दांत केली आहे – 'The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility.' उभ्या भारतात बाजीरावांच्या समशेरीचा डंका वाजत होता. दिल्लीचा वजीर मोहम्मद खान बंगश छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला, तेव्हा त्याच्यासमोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. या बंगशने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावांना एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असे तेच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होते.
'जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥' – याचा अर्थ जगात दोन ब्राह्मण नावाजले गेले. एक भगवान परशुराम ज्यांनी – उन्मत्त क्षत्रिय सत्ताधीशांना बुडविले, तर दुसरे बाजीराव पेशवे ज्यांनी तुर्कांची तीच स्थिती केली होती, असा त्या काळी बाजीराव पेशव्यांच्या कर्तृत्वाचा दरारा संपूर्ण भारतभर होता. सैन्याची चपळता, आक्रमकता, निसर्गाचे भान व त्याचा अनुकूल उपयोग, अचूक राजनीती या आधारे बाजीरावांनी थोड्याशा सैन्यानिशी अनेक विजय मिळवले. बाजीरावांचे भौगोलिक ज्ञान अफाट होते. आपल्याला हव्या त्या ठिकाणी शत्रूला येण्यास भाग पाडून युद्ध करणे ही त्यांची युद्धनीती होती. असे म्हणतात, की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी व १९७१च्या बांगलादेश युद्धाच्या वेळी हीच युद्धनीती अवलंबली गेली.
बाजीराव पेशवे एक योद्धा म्हणून जितके प्रभावी होते, तेवढेच त्यांचे व्यक्तिमत्त्वसुद्धा प्रभावी होते. बाजीराव सहा फूट उंच होते, असा उल्लेख आहे. उंचीबरोबरच त्यांचे हातही बरेच लांब होते. भक्कम पीळदार शरीरयष्टी, तांबूस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीही मोहित व्हावे असा चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव... असे उमदे व्यक्तिमत्त्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्यांना तिटकारा होता. बाजीराव स्वत: पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरत. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता. नोकराशिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खासगी चार घोडे होते – निळा, गंगा, सारंगा आणि अबलख. त्यांचे दाणा, वैरण, पाणी बाजीराव स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐशाराम त्यांना अजिबात खपत नसे. संपूर्ण सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाले होते.
थोरले बाजीराव हे अपराजित सेनापती होते. तल्लख बुद्धीने डावपेचांची आखणी करून आणि अद्वितीय शौर्याने त्याची अंमलबजावणी करून अवघ्या २० वर्षांत बाजीरावांनी मराठ्यांच्या नेतृत्वाला मराठी मुलखाच्या बाहेर प्रवेश मिळवून दिला. दक्षिणेत मराठ्यांचे नेतृत्व संपादणे व उत्तरेत मराठी सत्तेचा विस्तार करून सार्या बुंदेलखंडात मराठ्यांचा दबदबा निर्माण करणे ही बाजीरावांची महत्त्वाकांक्षा होती आणि ती त्यांनी बहुतांशी पूर्ण केली.
बाजीराव हे मराठा साम्राज्याचा विस्तार करत असले, तरी राज्य शाहू महाराजांचे होते. रयतेची काळजी, राज्याची सुव्यवस्था इत्यादी विषय बाजीरावांचे नव्हते. खुद्द पुण्यातल्या रयतेसाठी हितकारक ठरतील असे किंवा राज्यव्यवस्थेला आकार देता येईल असे निर्णय त्यांना दुर्दैवाने घेता आले नाहीत. अर्थातच यासाठी त्यांना पुरेसा वेळही मिळाला नाही. कारण त्यांची २० वर्षांची कारकीर्द युद्ध करण्यातच गेली. शाहू महाराजांच्या राज्याच्या विस्तारासाठी बाजीरावांनी ब्रह्मेंद्र स्वामी, बाबुजी नाईक बारामतीकर, इत्यादी सावकारांकडून मोठी कर्जे घेतली होती व ती फेडण्यासाठी त्यांना सतत युद्धमोहीम राबवावी लागत असे. या सततच्या मोहिमांमुळे राज्याचा विस्तार झाला; पण खजिना मात्र रिता राहिला. कर्ज फेडण्यासाठी मोहिमा आणि मोहिमांच्या खर्चासाठी कर्ज, या दुष्टचक्रात बाजीराव अडकले. यामुळे झालेली ही कर्जे पुढील पेशव्यांना फेडावी लागली. याउलट नादिरशहा याने एकदाच भारतावर स्वारी केली; पण त्या वेळी त्याने केलेली लूट त्यांच्या कित्येक पिढ्यांना पुरली. किती विरोधाभास आहे ना! ज्या शूर लढवय्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर केले त्याच्याकडे लढाईसाठीसुद्धा पैसे नव्हते. ज्या मातृभूमीच्या रक्षणासाठी बाजीराव शेवटच्या श्वासापर्यंत लढले त्या राष्ट्रकार्यासाठी त्यांना सावकारांकडून कर्ज काढावे लागले. त्यांनी स्वत: आयुष्यभर परवड सहन करून मराठी जनतेची मान मात्र स्वाभिमानाने ताठ केली.
अशा या धोरणी, कर्तृत्ववान थोरल्या बाजीरावांचे वर्णन करतांना यदुनाथ सरकार म्हणतात, 'बाजीरावांनी हिंदुस्थानच्या इतिहासात मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून दिले. मराठेशाहीत छत्रपती शिवाजी राजांनंतरच्या कर्तृत्ववान पुरुषांत बाजीराव पेशव्यांची गणना केली पाहिजे. छत्रपतींनी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली व या राज्याला बृहत्तर महाराष्ट्राचे रूप देण्याचा प्रारंभ बाजीरावांनी केला.'
त्यांच्याविषयी छत्रपती शाहू महाराज म्हणतात, 'मला जर बाजीराव आणि एक लाख सैनिक यांच्यामधून निवड करावी लागली तर मी बाजीरावची निवड करीन.' म्हणून इंग्रजी इतिहासकारांनी बाजीरावांना 'Heavenly born cavalry leader' अर्थात 'घोडदळाचा ईश्वरदत्त सेनानी' असे संबोधले होते. अशा या थोर आणि पेशव्यांचा महायोद्धा म्हणून इतिहासात अजरामर झालेल्या अशा थोरल्या बाजीरावांचे निधन २४ एप्रिल १७४० रोजी नर्मदाकाठी रावेरखेडी येथे ज्वरामुळे झाले. या थोर महायोद्ध्याला शतश: नमन!
पेशवाईवरील लेखमालिकेतील हा शेवटचा लेख लिहिताना अनेक भाव मनात दाटून येत आहेत. या लेखमालिकेच्या निमित्ताने अनेक पुस्तके वाचनात आली, अनेक व्हिडिओ, लेख पाहिले. हे सगळे करत असताना मनात एक सल निर्माण झाली. पेशवेकाळातील या सर्व योद्ध्यांचा पराक्रम जसजसा समजत गेला, तसतसे असे वाटले, की या योद्ध्यांना इतिहासाने खूप दुर्लक्षित ठेवले. त्यांनी लढलेली एखादी लढाई एवढाच काय तो उल्लेख इतिहासात शिकवला गेला. वास्तविक पेशवे घराण्यातील प्रत्येक योद्धा म्हणजे स्वत:च एक पुस्तक होते. विभिन्न परिस्थितीत, विविध शत्रूंशी लढताना, घरातले कलह सोसून, आपल्याच आप्तांनी रचलेली कारस्थाने कळूनसुद्धा त्यांच्या पराक्रमात कोठेही कोणतीही उणीव नव्हती. इतका शूरपणा, देशाभिमान, समर्पित वृत्ती हे सगळे यांच्यात कसे भिनले असेल? इतकेच काय, पेशवे घराण्यातील महिलासुद्धा धोरणी, चतुर, राजकारण जाणणाऱ्या होत्या. त्यांनी पेशवाईला वाईट काळात सावरले. आम्हा भारतीय लोकांना या साऱ्या शूरांचा अभिमान आहे. मुळात भारत ही पराक्रमी योद्ध्यांचीच भूमी आहे. मग मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम असो, युगंधर श्रीकृष्ण असो, स्वराज्याची प्राणप्रतिष्ठा करणारे छत्रपती शिवराय असोत, धर्मवीर संभाजी महाराज असोत किंवा महापराक्रमी पेशवे असोत. त्यांच्या पराक्रमातून, त्यागातून, बलिदानातून आणि त्यांनी प्राणपणाने लढलेल्या सर्वच धर्मयुद्धांमधून आपल्याला आणि आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांना भारताच्या या भूमीत अभिमानाने आणि ताठ मानेने जगता येत आहे. या सर्व महापुरुषांना जातीच्या, राज्याच्या, वर्णाच्या, भाषेच्या चौकटीत अडकवून आपण त्यांच्या शौर्याला नाकारत आहोत का? त्यांनी त्या वेळी मातृभूमीसाठी लढताना जातीपातीचा विचार केला असता, तर आज आपला भारत आपला तरी राहिला असता का, हा प्रश्न एकदा स्वत:च्या मनाला विचारून पाहा. यातून आपण इतका जरी संदेश आत्मसात करू शकलो, तरी या लेखमालिकेचा हेतू सफल झाला, असे म्हणता येईल. तेव्हा या थोर पुरुषांचे स्मरण आणि त्यांना नमन करणे हेच आपले कर्तव्य आहे.
जय हिंद, जय महाराष्ट्र
(संकलित माहिती)
(लेखमाला समाप्त)
(या लेखमालेतील आधीचे लेख खालील लिंकवर वाचता येतील.)
१. पानिपतची लढाई म्हणजे शौर्याचे प्रतीक... पराभवाची गाथा नव्हे!
२. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - पूर्वार्ध
३. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - उत्तरार्ध
४. मराठेशाहीचे स्वातंत्र्ययुद्ध आणि पेशवाईचा उदय
५. पेशवेकालीन महाराष्ट्र - भाग १
६. पेशवेकालीन महाराष्ट्र - भाग २
७. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ
८. पराक्रमी आणि मुत्सद्दी नानासाहेब पेशवे
९. पराक्रमी आणि धोरणी चिमाजीअप्पा
१०. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे
१२. मुत्सद्दी, समयसूचक आणि शूर सदाशिवरावभाऊ
१४. महायोद्धा : बाजीराव पेशवे (पूर्वार्ध)
१५. महायोद्धा : बाजीराव पेशवे (उत्तरार्ध)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment