लाखो रुपयांचे ड्रोन पायलट प्रशिक्षण मिळाले पूर्णपणे मोफत!
सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील होतकरू तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी रोजगाराभिमुख व कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. योग्य मार्गदर्शन, दर्जेदार प्रशिक्षण आणि संधी मिळाल्यास ग्रामीण भागातील युवकही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करू शकतात, हे अमृत संस्थेच्या अनेक लाभार्थ्यांनी दाखवून दिले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील गौरव सुधीर धोंडारकर हे त्यापैकीच एक प्रेरक उदाहरण.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या संस्थेच्या माध्यमातून गौरव यांनी अत्याधुनिक आणि दर्जेदार असे ड्रोन पायलट प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. आज ते प्रमाणित आणि कुशल ड्रोन पायलट म्हणून कार्यरत आहेत.
ड्रोन पायलट होण्याचे दर्जेदार प्रशिक्षण घेण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात; मात्र अमृत संस्थेच्या प्रशिक्षण कार्यक्रमातून गौरव यांना हे संपूर्ण प्रशिक्षण निःशुल्क मिळाले. प्रशिक्षणातून त्यांना ड्रोनची रचना व तांत्रिक माहिती, सुरक्षित उड्डाणतंत्र आणि नियंत्रण कौशल्य, शेतांच्या फवारणीसाठी ड्रोनचा प्रभावी वापर, नागरी विमान वाहतूक संचालनालयाची (डीजीसीए) नियमावली आणि परवाना प्रक्रिया याविषयी सखोल माहिती देण्यात आली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मैदानात प्रत्यक्ष सराव केल्यामुळे त्यांना अत्यंत उत्तमरीत्या कौशल्यप्राप्ती झाली.
ड्रोनच्या साह्याने शेतात फवारणी, पिकांचे निरीक्षण, जमिनीचे सर्वेक्षण आणि डेटा संकलन अत्यंत जलद, अचूक आणि कमी खर्चात करता येते. गौरव आता आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाची सेवा देत असून, त्यामुळे वेळ, श्रम आणि खर्चाची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर अत्याधुनिक सेवा उपलब्ध झाली असून, गौरव यांना उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. हे युवकांसाठी अत्यंत प्रेरक उदाहरण आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment