हार्वेस्टरसाठी घेतलेल्या कर्जावर दीड वर्षात १ लाख ७८ हजार रुपयांचा व्याज परतावा.
आष्टी : बँकेतील चांगल्या स्थितीत असलेली नोकरी सोडून शेतीत स्वतःचे भविष्य घडवण्याचा निर्णय आष्टी तालुक्यातील केरूळ येथील मनोज शंकर आडकर यांनी घेतला. कुटुंबीय आणि भावाच्या साथीने त्यांनी शेतीत विविध प्रयोग केले. शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्यासाठी त्यांनी हार्वेस्टर खरेदी केले. या व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा भार कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या व्याज परतावा योजनेचा त्यांना मोठा आधार मिळत आहे.
नोकरी सोडून शेतीत केले वेगवेगळे प्रयोग
बँकेतील नोकरी सोडल्यानंतर मनोज आडकर यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता त्यात नवनवीन प्रयोग करण्यावर त्यांनी भर दिला. शेतात शेततळे उभारले असून डाळिंबासह विविध फळपिकांची लागवड केली आहे. दसरा आणि दिवाळीच्या हंगामात झेंडूच्या फुलांचे उत्पादन घेण्याबरोबरच ते टोमॅटोची लागवडही करतात. पिकांमध्ये विविधता ठेवत शेतीत सातत्याने नवे प्रयोग करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे ते प्रगतिशील शेतकरी म्हणून वाटचाल करत आहेत.
शेतीसोबत उत्पन्नाचे आणखी एक साधन निर्माण व्हावे, या उद्देशाने त्यांनी हार्वेस्टर खरेदी करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेतले. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय अशा दोन्ही माध्यमांतून प्रगती साधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
दुष्काळी परिस्थितीत अमृतच्या व्याज परताव्याचा आधार
हार्वेस्टर हा शेतीपूरक व्यवसाय असून त्याला वर्षभर नियमित काम मिळत नाही. हंगामानुसार काम उपलब्ध होत असल्याने उत्पन्नात चढ-उतार होतात. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत व्यवसायाचे नियोजन आणि कर्जाचे हप्ते भरणे अधिक आव्हानात्मक ठरू शकते.
अशा परिस्थितीत मनोज आडकर यांना अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ मिळत आहे. मागील सुमारे दीड वर्षात त्यांच्या १५ लाख रुपयांच्या कर्जावरील व्याजापोटी अमृत संस्थेने १ लाख ७८ हजार रुपयांचा व्याज परतावा दिला आहे.
मनोज आडकर यांच्या म्हणण्यानुसार, हार्वेस्टरला वर्षभर नियमित काम मिळत नसल्याने कर्जाचे हप्ते भरण्याचे नियोजन करावे लागते. अशा वेळी अमृतकडून मिळणारा व्याज परतावा मोठा आधार ठरत आहे. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरणे अधिक सुलभ होत असून व्यवसाय चालवताना आर्थिक मदत मिळत आहे. या सहकार्याबद्दल त्यांनी अमृत संस्थेचे आभार मानले आहेत.
तरुण शेतकऱ्यांनी योजनांची माहिती घ्यावी
शेतीत विविध प्रयोग करणे, वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेणे आणि शेतीला पूरक व्यवसायाची जोड देणे, अशा पद्धतीने मनोज आडकर आपली वाटचाल करत आहेत. नोकरी सोडून शेतीत रमण्यापासून ते शेतीपूरक व्यवसाय उभारण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास इतर तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची पात्र लाभार्थ्यांनी माहिती घ्यावी आणि त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी अमृतच्या बीड जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी संपर्क : 73910 65468 पत्ता : अमृत संस्थेचे बीड जिल्हा कार्यालय, अथर्व अभ्यासिकेच्या वर, नवगण कॉलेज रोड, वाघ नेत्रालयाशेजारी, बीड. 431122
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment