छत्रपती संभाजीनगरमध्ये अमृतपेठ उपक्रमात सहभागी होण्याबद्दल उद्योजिका सकारात्मक
छत्रपती संभाजीनगर : अमृत संस्थेतर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगर या ठिकाणी यशस्विनी उद्योजिका समूहाच्या स्टॉलला भेट देण्यात आली. श्रीमती विजयाताई कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्विनी उद्योजिका समूह गेल्या १२ वर्षांपासून गृहोद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना प्रोत्साहन देत आहे. विविध ठिकाणी स्टॉल लावून त्यांच्याकडून महिलांच्या व्यवसायवाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
या समूहाच्या स्टॉलला अमृत संस्थेतर्फे भेट देण्यात आली. या वेळी स्टॉलधारक महिलांशी संवाद साधून अमृत स्वायत्त संस्थेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. व्यवसाय विस्तार, प्रशिक्षण, आर्थिक साह्य आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
ही माहिती दिल्यानंतर उद्योजिका अमृतपेठ थेट बाजारपेठेमध्ये, तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. या सर्व महिलांची अमृत स्वायत्त संस्थेच्या विभागीय व जिल्हा कार्यालयांमध्ये लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे. अमृत या स्वायत्त संस्थेच्या योजनांची माहिती देण्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल विजयाताई कुलकर्णी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment