सर्व कार्यालये, संस्था आणि शाळांना सहभागी होण्याचं आवाहन!
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीत गड-किल्ले उभारून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि आपल्या गड-किल्ल्यांची माहिती घराघरांत पोहोचावी, यासाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था 'अमृत'च्या वतीने ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
या उपक्रमाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी आणि जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी व्हावे, यासाठी अमृतचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी मराठवाडा विभागीय आयुक्त मा. श्री. जी. श्रीकांत यांची भेट घेतली.
यावेळी अक्षय लंबे यांनी आयुक्त साहेबांना उपक्रमाचे अधिकृत पत्र दिले आणि दुर्गोत्सवाबद्दल सविस्तर माहिती सांगितली. तसेच, आयुक्त साहेबांच्या अधिपत्याखाली येणारी सर्व शासकीय कार्यालये, संस्था आणि शाळांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी त्यांना विनंती करण्यात आली.
दिवाळीत घरात, शाळेत आणि उपलब्ध जागेत गड-किल्ले उभारून या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. आपल्या गड-किल्ल्यांचा इतिहास, त्यांचे महत्त्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment