नागपूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अमृत कौशल्यविकास योजनेच्या माध्यमातून नागपूरमध्ये मोबाइल फिल्म-मेकिंगचा प्रोफेशनल कोर्स सुरू झाला आहे.
नागपूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अमृत कौशल्यविकास योजनेच्या माध्यमातून नागपूरमध्ये मोबाइल फिल्म-मेकिंगचा प्रोफेशनल कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सच्या पहिल्या बॅचचे उद्घाटन १५ डिसेंबर रोजी झाले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने युवक-युवतींना सर्जनशीलतेसोबतच रोजगाराभिमुख कौशल्य प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात मोबाइलद्वारे सिनेमॅटिक शॉट्स घेण्याची तंत्रे, प्रकाशयोजना, फ्रेमिंग, साउंड बेसिक्स, प्रोफेशनल मोबाइल एडिटिंग, स्टोरीटेलिंग, स्क्रिप्ट रायटिंग यांसह सोशल मीडिया रील्स आणि शॉर्ट फिल्म्सची निर्मिती यांचे सखोल आणि प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना फ्रीलान्सिंग आणि पोर्टफोलिओ बिल्डिंगबाबत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
या कोर्ससाठी अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नहुष बडगे (फिल्ममेकिंग, सिनेमॅटोग्राफी व डिजिटल व्हिडिओ कंटेंट निर्मिती) आणि आश्लेष जामरे (स्टोरीटेलिंग, मोबाइल एडिटिंग व सोशल मीडिया कंटेंट क्रिएशन) हे प्रशिक्षण देत आहेत.
उद्घाटन कार्यक्रमाला अमृत संस्थेचे नागपूर विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित, नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे, जिल्हा उपव्यवस्थापक सौ. वृषाली सवनकर, विभागीय उपव्यवस्थापक ओंकार गांधी, जिल्हा उपव्यवस्थापक प्रतीक आकरे, अमृतसखी सौ. दर्शना जाब्रस, अमृत सखी सौ. नीतू वसाडकर आदी उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी मोबाइल फिल्ममेकिंगचे वाढते महत्त्व, डिजिटल माध्यमांमधील करिअरच्या संधी, तसेच युवकांनी कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे कसे स्वावलंबी व्हावे, याबाबत मार्गदर्शन केले.
अमृत संस्थेच्या वतीने राबविण्यात येणारे क्षमताविकासासाठीचे आणि उच्च मागणी असलेले कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment