अमृत संस्थेच्या योजनेतून अर्थसाह्य मिळाल्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करता आल्याची भावना
पुसेगाव (जि. सातारा) : प्रबळ इच्छाशक्ती आणि कष्टाच्या जोरावर पुसेगाव येथील प्राची संजय कुलकर्णी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (एमपीएससी) घवघवीत यश मिळवले. त्यांनी संपूर्ण राज्यात २८३वा क्रमांक पटकावून आपल्या गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या योगदानाचा आपल्या यशात वाटा असल्याचे सांगून प्राची यांनी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत संस्थेच्या एमपीएससी स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन अर्थसाह्य योजनेचा त्यांनी लाभ घेतला. या आर्थिक पाठबळामुळे प्राची यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सोपे झाले.
ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्राची यांनी हे यश मिळवले आहे. आपल्या या यशाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, की "सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य मार्गदर्शनामुळेच मी हे ध्येय गाठू शकले. अमृत संस्थेच्या मदतीने ध्येयपूर्तीचे स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठे प्रोत्साहन मिळत आहे."
प्राची यांच्या या यशाबद्दल पुसेगाव परिसरातून आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सरकारी संस्थेत मोठ्या पदावर कार्यरत होऊन समाजाची सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 1 Comments
Rajendra Kanade
प्राची ताई, आपणास खूप खूप शुभेच्छा.
Write a Comment