खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना मिळणार विविध उपयुक्त योजनांची माहिती
कोल्हापूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या योजनांची माहिती देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे अमृत मेळावा होणार आहे. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी चार वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशींचे मार्गदर्शन या वेळी लाभणार आहे. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गडहिंग्लज तालुका ब्राह्मण संघाने याचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. यामध्ये प्रशिक्षण, स्वयंरोजगार, तसेच व्याजपरतावाच्या स्वरूपात अर्थसाह्य देणाऱ्या योजनांचा समावेश आहे. या योजनांची माहिती देण्यासाठी अमृत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी मार्गदर्शन करणार आहेत.
आमदार शिवाजीराव पाटील, प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, तहसीलदार ऋषीकेश शेळके, अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, नगराध्यक्ष महेश तुरबतमठ, मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, उपनगराध्यक्ष महेश सलवादे, चंदगडचे नगरसेवक अमेय सबनीस हे मान्यवरही या वेळी उपस्थित राहणार आहेत. गडहिंग्लज तालुक्यासह आसपासच्या परिसरातील लक्ष्यित गटातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन अमृत संस्थेचे पुणे विभागीय व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी, कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी आणि गडहिंग्लज ब्राह्मण संघाचे अध्यक्ष संजय कुलकर्णी व उपाध्यक्ष विजय कुलकर्णी यांनी केले आहे.
दिनांक : १८ फेब्रुवारी २०२६
वेळ : सायंकाळी चार वाजता
स्थळ : स्वयंवर मंगल कार्यालय (मंत्री हॉल) आजरा रोड, गडहिंग्लज.
अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रशांत जोशी : 9112228764
कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment