कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त विद्या शितोळे यांच्याकडून कौतुक
छत्रपती संभाजीनगर : कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता विभागीय (छत्रपती संभाजीनगर) आयुक्तालयातील उपायुक्त श्रीमती विद्या शितोळे यांनी अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या विविध योजनांची सविस्तर माहिती जाणून घेतली. या वेळी अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या इम्पोर्ट–एक्स्पोर्ट प्रशिक्षण, सोलर तंत्रज्ञान प्रशिक्षण, बेकरी प्रशिक्षण, ड्रोन प्रशिक्षण, तसेच अमृत उद्योग कौशल्यवर्धन (ईडीपी) कार्यक्रमाबाबत सखोल माहिती देण्यात आली. युवक-युवतींना स्वयंरोजगार व उद्योग उभारणीसाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांची माहिती श्रीमती शितोळे यांनी उत्सुकतेने जाणून घेतली.
अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी संस्थेची उद्दिष्टे, कार्यपद्धती, लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया व प्रशिक्षणानंतर मिळणाऱ्या संधी याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती असलेली दिनदर्शिका श्रीमती शितोळे यांना भेट म्हणून देण्यात आली.
अमृत संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या कौशल्यविकास व उद्योजकता क्षेत्रातील कार्याची श्रीमती विद्या शितोळे यांनी प्रशंसा केली. सर्व माहिती घेतल्यानंतर त्यांनी अमृत स्वायत्त संस्थेचे आभार मानले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment