संस्थेच्या कार्यक्षमतेबद्दल मिळाली शाबासकीची थाप आणि अनेकांनी व्यक्त केली लाभार्थी होण्याची इच्छा
कोल्हापूर : ब्राह्मण बिझनेस फोरमच्या (बीएफएफ) कोल्हापूरमध्ये झालेल्या विशेष बैठकीत महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या योजनांचा जागर झाला. हॉटेल मराठा रेसिडन्सी येथे झालेल्या विशेष बैठकीत बीएफएफ ग्रुपच्या सदस्यांना अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी अमृत संस्थेचे कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांना आमंत्रित करण्यात आले होते.
अखिल भारतीय ब्राह्मण संघाच्या उद्योग आघाडीचे अध्यक्ष संतोष पंडित यांच्या माध्यमातून प्रशांत जोशी यांनी ब्राह्मण बिझनेस फोरमचे अध्यक्ष राजन छत्रे यांची भेट घेऊन त्यांना अमृत संस्थेच्या योजनांची माहिती दिली. ब्राह्मणांसह खुला प्रवर्ग हा या संस्थेचा लक्ष्यित गट असल्याने आणि उद्योजकांकरिता अनेक उपयुक्त योजना संस्थेतर्फे राबवल्या जात असल्याने छत्रे यांनी या योजनांची माहिती देण्यासाठी जोशी यांना बीएफएफच्या बैठकीत आमंत्रित केले.
प्रशांत जोशी यांनी अमृत संस्थेच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती बैठकीत दिली. उपस्थितांना माहितीपत्रकही वितरित करण्यात आले. प्रश्नोत्तर सत्रात उपस्थितांनी शंकानिरसन करून घेतले. उपस्थितांपैकी काहींना अमृतविषयी माहिती होती, तर काही जण लाभार्थीदेखील होते. त्यांनी स्वतःचे अनुभव मांडून अमृत संस्थेबाबत सकारात्मक मत व्यक्त केले. यामुळे अमृत संस्थेच्या सादरीकरणाला अधिक पाठबळ मिळाले.
अमृत संस्थेच्या सर्व योजना समाजाच्या सर्वांगीण हितासाठी असून, त्यांचा लाभ घेण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ असल्याचे मत या वेळी लाभार्थी अभिजित कुलकर्णी यांनी व्यक्त केले. अमृत कार्यालय लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी सक्रिय पाठपुरावा करते हेही लाभार्थ्यांनी आवर्जून नमूद केले. त्यामुळे अमृत संस्थेचे सर्वांनी कौतुक करून आभार मानले. तसेच, योजनेचा लाभ लवकरात लवकर घेऊ, अशी इच्छाही अनेकांनी व्यक्त केली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment