प्रशिक्षण कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात
गोंदिया : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेतर्फे गोंदियाच्या आमगाव तालुक्यात बेकरी प्रशिक्षण कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. आमगाव येथील क्रिमी क्रिएशन इन्स्टिट्यूटमध्ये हे प्रशिक्षण सुरू झाले असून, आमगाव तालुक्यातील प्रसिद्ध केक शॉप चालवणाऱ्या दिशा अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जाणार आहे.
युवक व युवतींना बेकरी व्यवसायाचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार व उद्योजकतेकडे प्रवृत्त करणे हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश आहे. केक, पेस्ट्री, ब्रेड, बिस्किटे, तसेच आधुनिक बेकरी उत्पादनांच्या निर्मितीचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकांसह दिले जाणार आहे.
उद्घाटनावेळी अमृत संस्थेचे गोंदिया जिल्हा व्यवस्थापक कार्तिक तिवारी यांच्यासह आकाश चौहान, आदित्य लुलू, मनोज लुलू हे मान्यवर आणि अमृतमित्र उपस्थित होते.
अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणारे हे प्रशिक्षण कार्यक्रम ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण करणारे ठरणार असून, आमगाव तालुक्यातील बेकरी व्यवसायाला नवी दिशा देणारे पाऊल ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment