छत्रपती संभाजीनगर येथे अमृत आणि यशस्विनी उद्योजिका समूहाच्या संयुक्त विद्यमाने २३ ते २५ ऑगस्टदरम्यान ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ आयोजित करण्यात आली आहे. विश्वेश्वर महादेव मंदिर परिसरात भरलेल्या या बाजारपेठेत महिला उद्योजिकांनी तयार केलेली विविध उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध असून, त्यांना थेट ग्राहकांशी जोडण्याची आणि आपल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याची संधी मिळत आहे. उद्घाटनप्रसंगी अमृतचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, मराठवाडा विभाग व्यवस्थापक अमित सामंत आणि यशस्विनी उद्योजिका समूहाच्या अध्यक्षा विजयाताई कुलकर्णी यांनी उद्योजिकांशी संवाद साधून व्यवसायवाढीसाठी मार्गदर्शन केले. नागरिकांनी बाजारपेठेला भेट देऊन महिला उद्योजिकांच्या उत्पादनांची खरेदी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर : महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या वस्तूंना चांगली बाजारपेठ मिळावी आणि त्यांना आपल्या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता याव्यात, यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आणि यशस्विनी उद्योजिका समूह यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ आयोजित करण्यात आली आहे. दि. २३, २४ आणि २५ ऑगस्ट दरम्यान विश्वेश्वर महादेव मंदिर, चेतक घोडा जवळ, विश्वभारती कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे ही बाजारपेठ भरविण्यात आली असून विविध महिला उद्योजिकांनी तयार केलेली उत्पादने येथे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.
या उपक्रमाचे उद्घाटन अमृतचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, मराठवाडा विभाग व्यवस्थापक अमित सामंत आणि यशस्विनी उद्योजिका समूहाच्या अध्यक्षा विजयाताई कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनावेळी दीपक जोशी यांनी महिला उद्योजिकांशी संवाद साधत व्यवसायात सातत्य ठेवणे, उत्पादनाची गुणवत्ता चांगली ठेवणे, ग्राहकांशी आपुलकीने संवाद साधणे आणि उपलब्ध बाजारपेठेचा योग्य वापर करणे याबाबत मार्गदर्शन केले. महिला उद्योजिकांनी आपल्या उत्पादनांची गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास यावर भर दिल्यास व्यवसाय वाढविण्यास मोठी मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
मराठवाडा विभाग व्यवस्थापक अमित सामंत यांनीही उद्योजिकांशी संवाद साधत अमृत स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या सर्व योजना तसेच व्यवसाय वाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन केले. महिला उद्योजिकांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत व्यवसाय पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी लातूर जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. या वेळी अमृत जिल्हा टीम, अमृत मित्र रामेश्वर साळुंखे, उद्योजिका विनया कुलकर्णी, यशस्विनी उद्योजिका समूहाच्या सदस्या तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळत असल्याने ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ हा उपक्रम त्यांच्या व्यवसायासाठी चांगला प्लॅटफॉर्म ठरत आहे. नागरिकांनी या बाजारपेठेला भेट देऊन महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या उत्पादनांची खरेदी करावी आणि त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) छत्रपती संभाजीनगर येथे अमृत संस्थेतर्फे २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत १० दिवसांचे मोफत उद्यम कौशल्य प्रशिक्षण (EDP) आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणात व्यवसाय सुरू करणे, व्यवसायवाढ, विक्री-नफा वाढविणे तसेच डिजिटल व सोशल मीडिया मार्केटिंग याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. हे प्रशिक्षण २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन, चालू व्यवसायाचा विस्तार, विक्री व नफा वाढविण्याचे तंत्र, ग्राहकसंख्या वाढविण्याच्या प्रभावी युक्त्या तसेच डिजिटल व सोशल मीडिया मार्केटिंग याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे. व्यवसायातील विविध अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांचीही माहिती देण्यात येणार आहे. २४ ते २७ ऑगस्ट या कालावधीत प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने, तर २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ऑफलाईन प्रशिक्षणाचे ठिकाण अमृत विभागीय व जिल्हा कार्यालय, पुंडलिक नगर रोड, सेक्टर-४, सिडको, हनुमाननगर, पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर – ४३१००९ येथे आहे. सर्व इच्छुकांनी वेळेवर उपस्थित राहून या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्क : 7391065475 / 9403200606
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment