खुल्या प्रवर्गासाठीच्या योजनांची माहिती देण्यासाठी ब्राह्मण सभेच्या सहकार्याने आयोजन
नरसिंहपूर (जि. सांगली) : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि नरसिंहपूर ब्राह्मण सभा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी, सात फेब्रुवारी २०२६ रोजी सांगली जिल्ह्यातील नरसिंहपूर येथील नरसिंह मंदिरात अमृत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नरसिंहपूर ब्राह्मण सभेचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार प्रमुख वक्ते असतील. अमृतमित्र अभिजित कुलकर्णीदेखील या वेळी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगुनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य इत्यादी २४ जातींचा समावेश आहे. अशा जातींमधील कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी म्हणजे विद्यार्थी, तरुण, महिला, पुरुष, उद्योजक, शेतकरी, पुरोहित अशा सर्वांसाठी अमृत संस्था वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून काम करते. या योजनांची माहिती ब्राह्मण समाजाच्या प्रत्येकाला व्हावी, यासाठी हा अमृत मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार व अमृतमित्र अभिजित कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत आणि योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थितांना मनातील प्रश्न व शंका विचारता येणार असून, थेट संवादातून शंकानिरसन करून घेता येणार आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम या भागात प्रथमच होत असून ही सुवर्णसंधी आहे. अधिकाधिक बंधू-भगिनींनी कार्यक्रमाला उपस्थित राहून, या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्यासह समाजाचा उत्कर्ष साधावा असे आवाहन नरसिंहपूर ब्राह्मण सभेतर्फे करण्यात आले आहे.
दिवस : शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६
वेळ : सायंकाळी साडेपाच वाजता
स्थळ : नरसिंह मंदिर, नरसिंहपूर, ता. वाळवा, जि. सांगली
अधिक माहितीसाठी संपर्क : ९११२२२८७६६ / ७९७२८३०७५७ / ८२७५३७८०१९
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment