उत्पादनाच्या औद्योगिक प्रवासाबद्दल प्रत्यक्ष पाहणी करून घेतले जाणून
अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अमरावतीत सध्या अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. त्यामध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवासाठी औद्योगिक भेट घडवून आणण्यात आली. सातुर्णा एमआयडीसीतील प्रतीक इंडस्ट्रीज येथे त्यांना घेऊन जाण्यात आले.
या भेटीमध्ये एचडीपीई ग्रॅन्युल्स, तसेच रीयुझेबल प्लास्टिकपासून विविध उत्पादने तयार करण्याची प्रक्रिया, त्यांचे उत्पादन, पॅकेजिंग आणि विक्रीपर्यंतचा संपूर्ण प्रवास प्रत्यक्ष पाहण्याची संधी लाभार्थ्यांना मिळाली. उद्योग उभारणीसाठी लागणारी यंत्रसामग्री, कच्चा माल, खर्च-नियोजन व बाजारपेठेची माहिती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी अमृत संस्थेचे विभाग व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, तसेच जिल्हा उपव्यवस्थापक ऋषीकेश कथलकर उपस्थित होते. प्रतीक इंडस्ट्रीजचे संचालक प्रतीक अग्रवाल यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली व उद्योजकतेबाबतचे मौल्यवान अनुभव सांगितले.
या औद्योगिक भेटीमुळे लाभार्थ्यांना उद्योग कसा चालवला जातो याची प्रत्यक्ष माहिती मिळाली. त्यामुळे भविष्यात स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचे सहभागी लाभार्थ्यांनी सांगितले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment