नामवंत सनदी लेखापाल प्रवीण आवटे यांनी केली प्रशंसा
सातारा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था राज्यातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त कार्य करत असल्याचे प्रतिपादन नामवंत सीए प्रवीण आवटे यांनी केले. अमृत संस्थेचे समन्वयक अविनाश कुलकर्णी यांनी सीए प्रवीण आवटे यांची नुकतीच भेट घेतली आणि अमृत संस्थेच्या विविध योजना, उपक्रम व कार्यपद्धतीची सविस्तर माहिती त्यांना दिली.
या वेळी संस्थेच्या कार्याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सीए आवटे म्हणाले, की खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी आणि युवकांसाठी रोजगारक्षम प्रशिक्षण, औद्योगिक कौशल्यविकास, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, उद्योजकतेसाठी प्रोत्साहन, तसेच व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी उपलब्ध करून देणारी अमृत ही आजच्या काळाची गरज असलेली संस्था आहे.
ते पुढे म्हणाले, की शिक्षण, संशोधन आणि कौशल्यवृद्धी यांचा समन्वय साधणारा हा उपक्रम केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित नसून, युवकांना सक्षम नागरिक व उद्योजक बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य अमृत संस्था प्रभावीपणे पार पाडत आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात युवकांना योग्य दिशादर्शन, तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण सहकार्याची नितांत गरज असून, अमृतसारख्या संस्थांमुळे राज्यातील युवकांना करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. यामुळे युवकांचा स्वावलंबनाचा मार्ग अधिक दृढ होत असून, महाराष्ट्रातील युवकांचे भविष्य अधिक उज्ज्वल करण्याची क्षमता अमृत संस्थेत आहे, असा विश्वास सीए प्रवीण आवटे यांनी व्यक्त केला.
युवकांच्या हितासाठी अशा उपक्रमांना सहकार्य करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment