कोल्हापुरात अमृत संस्थेचे विविध क्षेत्रांशी सहकार्याचे दुवे

बँकिंग व उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची अमृत कार्यालयाला सदिच्छा भेट

कोल्हापुरात अमृत संस्थेचे विविध क्षेत्रांशी सहकार्याचे दुवे मुख्य फोटो
मुख्य फोटो

कोल्हापूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. कराड अर्बन बँकेच्या कोल्हापुरातील नागाळा पार्क शाखाधिकारी सौ. मंजूषा लिंगसूर, तसेच ग्लोबल ब्रँडच्या कोल्हापूर येथील शोरूमचे मालक प्रदीपकुमार लिंगसूर हे अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील आहेत. त्यांनी नुकतीच अमृत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ही भेट बीबीएफ ग्रुपचे अध्यक्ष राजेश छत्रे यांच्या विशेष प्रयत्नातून पार पडली.

अमृत संस्थेमार्फत लक्ष्यित गटासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व कौशल्यविकासाशी संबंधित योजनांची सविस्तर माहिती या भेटीमध्ये मान्यवरांनी जाणून घेतली. या योजनांचा लाभ गरजू लक्ष्यित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेसोबत समन्वयाने काम करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.

मंजूषा लिंगसूर यांनी बँकिंग क्षेत्रातील अनुभवाच्या आधारे आर्थिक समावेशन, स्वयंरोजगार, महिला सक्षमीकरण, तसेच आर्थिक साक्षरता यासंबंधीच्या उपक्रमांमध्ये सहकार्य करण्याची भूमिका मांडली. प्रदीपकुमार लिंगसूर यांनी उद्योग व व्यावसायिक क्षेत्रातून आवश्यक ते मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

त्यांनी अमृत संस्थेच्या कार्यपद्धतीचे, पारदर्शक व्यवस्थापनाचे आणि समाजाभिमुख उपक्रमांचे विशेष कौतुक केले. ग्रामीण व शहरी भागातील युवक, महिला तसेच दुर्बल घटकांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमुळे समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या वेळी 'बीबीएफ' ग्रुपचे अध्यक्ष राजेश छत्रे यांनी विविध क्षेत्रांतील संस्थांमध्ये समन्वय साधून सामाजिक विकासासाठी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत मांडले. अशा प्रकारच्या सहकार्यामुळे अमृत संस्थेच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन त्याचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ही भेट आगामी काळात अमृत संस्था व विविध क्षेत्रांतील मान्यवरांमध्ये सहकार्याचे नवे दुवे निर्माण करणारी ठरणार आहे. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटाला सामाजिक व आर्थिक विकासाच्या दृष्टीने सक्षम बनवण्यासाठीचे हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, अशी आशा अमृत संस्थेचे कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी व्यक्त केली.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 02-02-2026 News publication date | Time: 05:48 PM News publication time | Views: 292 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news
Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 02-02-2026 News publication date | Time: 05:48 PM News publication time | Views: 292 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words