खुल्या प्रवर्गातील नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्याअंतर्गत अमृत उद्योग कौशल्यवर्धन अर्थात ईडीपी या दहा दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्साहात सुरुवात झाली. अमृत जिल्हा कार्यालयात झालेल्या उद्घाटनप्रसंगी यशस्वी उद्योजक आदित्य धाराशिवकर आणि फार्मा क्षेत्रातील उद्योजक नितीन बंगाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मराठवाडा विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर व विभागीय उपव्यवस्थापक ओंकार शेटे यांनी झूम मीटिंगद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधून प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला अमृत संस्थेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे, अमृतमित्र रामेश्वर साळुंके, अमृतसखी मंजू कुलकर्णी आणि ऋचा शर्मा आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशिक्षकांची लाभार्थ्यांशी ओळख करून देण्यात आली. या प्रशिक्षणात २० लाभार्थी सहभागी झाले असून, लक्ष्यित गटातील व्यावसायिकांना उद्योगासाठी आवश्यक कौशल्ये, नियोजन यांबद्दल मार्गदर्शन करणे हा त्यामागचा उद्देश आहे. पहिल्या दिवशी प्रशांत गणोरकर यांनी व्यवसाय व उद्योजकतेची ओळख या विषयावर मार्गदर्शन केले. गेल्या २५ वर्षांपासून ते यशदा संस्थेमार्फत ग्रामीण भागात प्रशिक्षण देत आहेत.
या प्रशिक्षण कार्यक्रमात नवउद्योजकांसाठी व्यवसायाच्या संधी, कौशल्यविकास, आर्थिक नियोजन, मार्केटिंग, तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. या कार्यक्रमामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होऊन आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी, तर सूत्रसंचालन जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी केले.
दरम्यान, अमृत उद्योग कौशल्यवर्धन ईडीपी प्रशिक्षणाच्या पुढील तुकडीसाठी नोंदणी सुरू असून, इच्छुक लाभार्थ्यांनी अमृत संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
योगेश भास्करराव रोडे - 9403200606
जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
पत्ता : विभागीय व जिल्हा कार्यालय - अमृत,
पुंडलिक नगर रोड, सेक्टर - ४ सिडको,
हनुमाननगर, पाण्याच्या टाकीजवळ,
छत्रपती संभाजीनगर - ४३१००९
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment