खुल्या प्रवर्गातील लघुउद्योजकांना मोफत प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी; नावनोंदणी सुरू
जालना : स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असलेल्या जालना जिल्ह्यातील नागरिकांसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने अमृत उद्योग कौशल्यवर्धन हा लघुउद्योग प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. कौशल्याधारित उद्योजकता विकसित करून आर्थिक स्वावलंबन साधणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात उद्योग उभारणीची मूलभूत संकल्पना, व्यवसायाची योग्य दिशा निवडणे, उत्पादन प्रक्रिया, खर्च नियंत्रण व नफा व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. यासोबतच ब्रँडिंग, ट्रेडमार्क नोंदणी, आर्थिक नियोजन, तसेच शासनाच्या विविध योजनांचा उद्योगासाठी प्रभावी वापर कसा करावा, याबाबत तज्ज्ञांकडून माहिती देण्यात येणार आहे.
डिजिटल युगाची गरज लक्षात घेऊन प्रशिक्षणार्थींना अमृतपेठ या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची ओळख करून देण्यात येणार असून, त्याद्वारे जालना जिल्ह्यातील लघुउद्योगांनी तयार केलेली उत्पादने संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक उद्योगांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊन रोजगारनिर्मितीला चालना मिळेल.
अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घेता येणार येतो. ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, त्यागी, नायडू, राजपुरोहित आदी समाजघटकांतील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेले जालना जिल्ह्यातील नागरिक या प्रशिक्षणासाठी पात्र ठरणार आहेत. जालना जिल्ह्यातील युवक-युवती व उद्योजकांनी स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :
नितीन खेकाळे - 7391065474
जालना जिल्हा व्यवस्थापक, अमृत
चिंतेश जोशी - 9421944752
जालना जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment