टायपिंग परीक्षेच्या ६५०० रुपयांच्या शुल्काचा परतावा
कोल्हापूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यापैकी जीसीसी-टीबीसी टायपिंग परीक्षा शुल्क परतावा योजनेचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील ओमकार जयवंत चिंचळकर यांनी घेतला आहे.
ओमकार यांनी शासकीय संगणक टंकलेखन (जीसीसी-टीबीसी) परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी अमृत संस्थेकडे शुल्कपरताव्यासाठी अर्ज सादर केला होता. सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना ६५०० रुपये शुल्काची रक्कम परत करण्यात आली आहे. या आर्थिक मदतीमुळे प्रशिक्षणाचा खर्च कमी झाला असून पुढील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दिलासा मिळाल्याचे ओमकार यांनी सांगितले. तरुणांना रोजगारासाठी आवश्यक असलेली संगणकाशी संबंधित व तांत्रिक कौशल्ये आत्मसात करता यावीत, हा या योजनेचा प्रमुख हेतू आहे.
अमृत संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांकरिता विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कौशल्यविकास उपक्रम राबवले जातात आणि स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते. जीसीसी-टीबीसी, तसेच शॉर्टहँड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी भरलेले शुल्क अर्थसाह्य स्वरूपात परत दिले जाते.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment