सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन
धुळे : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. अमृत संस्थेमार्फत युवक, महिला व विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या शैक्षणिक, कौशल्यविकास व उद्योजकता वृद्धी करणाऱ्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा ज्येष्ठ नेते अमरीशभाई पटेल यांना नुकतीच देण्यात आली. या वेळी पटेल यांनी अमृत संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक करून या सर्व योजनांकरिता आपल्या पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा साह्य योजना, कौशल्यविकास व तांत्रिक प्रशिक्षण, उद्योजकता व व्यवसाय विकास उपक्रम अशा सर्व योजनांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, उच्च शिक्षण व आधुनिक कौशल्यांची संधी उपलब्ध करून देण्याचा अमृत संस्थेचा संकल्प असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
अमृत संस्थेचे कार्य समाजोपयोगी व भविष्याभिमुख असल्याचे सांगून अमरीशभाई पटेल यांनी सांगितले, की, 'अशा उपक्रमांना शासन व समाजाच्या सर्व स्तरातून पाठबळ मिळणे गरजेचे आहे. अमृतच्या उपक्रमांसाठी माझे संपूर्ण सहकार्य राहील.'
या वेळी शिरपूरचे आमदार काशीराम पावरा, निशांत रंधे, के. डी. पाटील हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात अमृत संस्थेचे धुळे जिल्हा व्यवस्थापक हेमंत पाठक यांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी शैक्षणिक अर्थसाह्य, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्याज परतावा योजना, कौशल्य विकास व उद्योजकता वृद्धी करणाऱ्या उपक्रमांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास चंद्रात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. या भेटीमुळे अमृत संस्थेच्या योजनांना नवीन बळ मिळाले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment