अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊन उद्योग वाढवण्याचे आवाहन
सांगली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि सांगलीतील सिंधी पंचायत ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताकदिनी सांगलीत अमृत मेळावा आयोजित केला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. या योजनांची माहिती अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचण्यासाठी अमृत मेळावा आयोजित करण्यात आला होता.
सिंधी पंचायत ट्रस्टचे अध्यक्ष हेमंतदास पोपटाणी यांनी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जहागीरदार यांनी अमृत संस्थेच्या वेगवेगळ्या प्रशिक्षण योजना, व्यावसायिकांसाठी वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना, युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम व इतर सर्व योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. उपस्थितांच्या मनातील शंकांचे निरसनही केले. समाजातील तरुण पिढीने अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घ्यावा व उद्योग उभा करावे असे आवाहन केले. आवश्यक कागदपत्रे आणि निवडीचे निकष यांचीही सविस्तर माहिती त्यांनी दिली.
विश्वस्त जयराम कुकरेजा यांनी आभारप्रदर्शन केले. समाजबांधव आणि भगिनींनी या योजनांचा आपल्या उत्कर्षासाठी लाभ करून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी सिंधी समाजातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित ज्येष्ठ नागरिकानी अमृतमित्र म्हणून समाजजागृतीचे काम स्वयंसेवी पद्धतीने करण्याची तयारी दर्शवली. या कार्यक्रमाला सर्व वयोगटातील समाजबांधव उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क :
शैलेंद्र जहागीरदार ९११२२२८७६६ / ७९७२८३०७५७ / ८२७५३७८०१९
पत्ता : अमृत संस्थेचे जिल्हा कार्यालय,
अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर,
राजवाडा, सांगली - ४१६४१६
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment