अमृत संस्थेतर्फे आयोजित ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये प्रसिद्ध उद्योजक धवल शहा यांचे प्रतिपादन
पुणे : 'क्लाउड किचन ही आधुनिक आणि वेगाने वाढणारी संकल्पना आहे. त्या क्षेत्रात विशेषतःयुवकांनी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारावा,' असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक धवल शहा यांनी केले. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे क्लाउड किचन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाची प्राथमिक ओळख करून देणारे व्याख्यान अर्थात ओरिएंटेशन प्रोग्रामचे आयोजन २७ जानेवारी रोजी करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. वेगाने बदलणाऱ्या खाद्यपदार्थ व्यवसाय क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले प्रसिद्ध उद्योजक धवल शहा यांनी प्रशिक्षणार्थ्यांना क्लाउड किचन या आधुनिक आणि वेगाने वाढणाऱ्या व्यवसाय संकल्पनेची सखोल माहिती दिली. क्लाउड किचन म्हणजे काय, पारंपरिक हॉटेल व्यवसायाच्या तुलनेत याचे असलेले फायदे, कमी भांडवलात व्यवसाय कसा सुरू करता येईल, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर, ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप्सशी समन्वय, ब्रँडिंग व मार्केटिंग रणनीती, ग्राहक व्यवस्थापन, तसेच या व्यवसायातील संधी आणि आव्हाने या बाबींवरही धवल शहा यांनी प्रकाश टाकला. त्यांनी स्वतःच्या व्यावसायिक अनुभवातून दिलेली उदाहरणे उपस्थितांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरली. विशेषतः युवकांनी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी धवल शहा यांचे स्वागत केले. उद्योजक होऊ इच्छिणारे अनेक जण या वेळी उपस्थित होते. सहभागी प्रशिक्षणार्थ्यांनी प्रश्नोत्तर सत्रातही सक्रिय सहभाग घेऊन आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
अमृत संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या अशा उद्योजकता प्रशिक्षण उपक्रमांमुळे स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असून, आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळत असल्याचे मत या वेळी उपस्थितांनी व्यक्त केले. आगामी काळातही अशा प्रकारचे उपयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या व्याख्यानाचे यू-ट्यूबवरून लाइव्ह प्रसारणही करण्यात आले होते. त्यामुळे राज्यभरातील प्रेक्षकांनाही ते पाहता आले. खालील लिंकवर ते पाहता येईल.
व्याख्यानाची लिंक : https://youtu.be/D1LLOKts7Vw
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment