खुल्या प्रवर्गातील युवकांना खुली होणार हरित ऊर्जा क्षेत्रातील करिअरची दारे
चंद्रपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूरमध्ये २७ जानेवारी रोजी अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवतींसाठी हे निःशुल्क प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून, त्यात सोलर पॅनेल उभारणी, देखभाल आणि दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला अमृत संस्थेचे नागपूर विभागीय उपव्यवस्थापक विक्रम मोहन पांडे, चंद्रपूर जिल्हा उपव्यवस्थापक आदित्य सेंगर, अमृतमित्र सतीश नारायण दास, अमृतमित्र श्रीरंग खोंड, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे (एमसीईडी) जिल्हा प्रकल्प अधिकारी संदीप जाणे आणि प्रशिक्षक आकाश चतुर हे मान्यवर उपस्थित होते. हे प्रशिक्षण १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा सखोल व व्यावहारिक अनुभव मिळणार आहे.
खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कोणताही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, त्यातील उमेदवारांना सक्षम करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सौर ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या संधी लक्षात घेऊन युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या दिशेने सक्षम करणे हे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रमुख ध्येय आहे. या प्रशिक्षणामध्ये सोलर पॅनेल उभारणी, सोलर सिस्टीम इंस्टॉलेशन, वायरिंग, देखभाल व दुरुस्ती, सुरक्षितता उपाययोजना यांचे प्रशिक्षण आणि तांत्रिक माहिती दिली जाणर असून, प्रात्यक्षिकांवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे त्यांना सौरऊर्जा क्षेत्रात कुशल तंत्रज्ञ म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना हरित ऊर्जा क्षेत्रात करिअरची नवी दारे खुली होणार असून, स्वच्छ ऊर्जा व शाश्वत विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
विक्रम मोहन पांडे - 9112228774
चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : गुरुद्वारा रोड, कृष्णा टॉवरजवळ,
तुकूम, चंद्रपूर - 442402
ई-मेल : amrut.chandrapurdm@mail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment