सिल्लोडच्या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने सुरू केला व्यवसाय; अमृत संस्थेने दिले भक्कम पाठबळ

व्याजपरतावा योजनेतून सनी कुलकर्णी यांना आतापर्यंत मिळाला ४४ हजार ४४७ रुपयांचा लाभ

सिल्लोडच्या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने सुरू केला व्यवसाय; अमृत संस्थेने दिले भक्कम पाठबळ मुख्य फोटो
मुख्य फोटो

सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) : कठीण परिस्थितीवर मात करून सिल्लोड येथील युवा उद्योजक सनी उमेशराव कुलकर्णी यांनी स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे उभा केला आहे. त्यांच्या धडपडीला महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचेही पाठबळ मिळाले आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेचा लाभ त्यांना मिळाला असून, आतापर्यंत त्यातून ४४ हजार ४४७ रुपये मिळाले आहेत.

सिल्लोडमधील म्हसोबा गल्ली येथे वास्तव्याला असलेल्या सनी कुलकर्णी यांची घरची शेती आहे; मात्र शेतीसोबत स्वतंत्र व्यवसाय करण्याची त्यांची इच्छा होती; मात्र आई-वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्यावर मोठे कौटुंबिक आणि आर्थिक संकट ओढवले. अशा प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता त्यांनी सिल्लोड शहरातील स्वतःच्या पत्र्याच्या जागेत बॅग हाउस अर्थात बॅगविक्रीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला केवळ ५० हजार रुपयांच्या मालखरेदीतून त्यांनी व्यवसायाला प्रारंभ केला.

काही कालावधीनंतर आर्थिक अडचणी वाढल्याने व्यवसायावर परिणाम होऊ लागला. याचदरम्यान एका कार्यक्रमात अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांनी सनी कुलकर्णी यांना अमृत संस्थेच्या वैयक्तिक व्याजपरतावा योजनेची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर चिखली अर्बन बँकेच्या सिल्लोड शाखेतून सनी कुलकर्णी यांना १५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. या आर्थिक पाठबळामुळे त्यांनी आपला व्यवसाय अधिक भक्कमपणे उभा केला. अमृत संस्थेच्या वैयक्तिक व्याजपरतावा योजनेतून त्यांना आतापर्यंत ४४ हजार ४४७ रुपयांचा थेट लाभ मिळाला आहे. आज ते सक्षमपणे स्वतःचा व्यवसाय चालवत असून, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाले आहेत.

याबाबत सनी कुलकर्णी म्हणाले, 'अमृत म्हणजे माझ्यासारख्या छोट्या व्यावसायिकांसाठी खऱ्या अर्थाने अमृत ठरले आहे. या संस्थेमुळेच आज माझा व्यवसाय सक्षमपणे उभा राहिला आहे.' तालुक्यातील सर्व समाजबांधवांनी आणि अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

या संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य करणारे अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे सनी कुलकर्णी यांनी मनःपूर्वक आभार मानले.

अधिक माहितीसाठी संपर्क :

अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475

छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

योगेश भास्करराव रोडे - 9403200606

जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

अमृत संस्थेचा लक्ष्यित गट कोणता? 

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना?

वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: योगेश भास्करराव रोडे News publisher name | Date: 26-01-2026 News publication date | Time: 10:51 PM News publication time | Views: 724 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: योगेश भास्करराव रोडे News publisher name | Date: 26-01-2026 News publication date | Time: 10:51 PM News publication time | Views: 724 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words